मंगळवार, ३१ मार्च, २०२०

दिवस तिसरा "मोहिम बागलाणची"

"मोहिम बागलाणची"


दिवस तिसरा


'भिलाई, चौल्हेर, प्रेमगिरी'


या आधीचा भाग वाचला नसेल तर इथूनच जाता येईल त्याच्यावर.


       पुणेकरांना नाशिक तसं थोडं लांबच पडतं. त्यामुळे सहज उठलं आणि नाशिक भागातले किल्ले पाहून आलो असं सहसा होत नाही. आता आलोच आहोत तर जास्तीतजास्त किल्ले पाहून घेऊ म्हणून आज ट्रेकच्या आजच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी भिलाई आणि चौल्हेर पाहिल्यानंतर घरी जाताजाता प्रेमगिरी किंवा रामजी पांगेराचा कण्हेरगडही बघून जाऊ असं ठरवलं होतं. असं जमवायचं असेल तर सकाळचा वेळ अजिबात वाया घालवून चालणार नव्हतं त्यामुळे आज थोडं लवकरच आवरलं. झटपट कालचा उरलेला मसाले भाताचाच गरम करुन नाश्ता केला आणि उजाडताउजाडता गाडीनेच भिलाई (१०६० मी.) किल्ल्यावर चढून जाणार्‍या वाटेवरल्या खिंडीत पोहोचलो.



       सरळ जाणारा रस्ता हाकेच्या अंतरावरच्या साखरपाडा गावात जातो. तिथं दोघं गावकरी मॉर्निंग वॉकला आले होते. मंडळी इकडं कशीकाय चुकली म्हणायची? असं त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं. त्यांना फारवेळ अंधारात न ठेवता आम्ही त्यांना रामराम करुन इथे किल्ला बघायला आल्याचं सांगितलं. ते ऐकून त्यांना काय वाटलं कोण जाणे पण त्यांनी 'गावात पहिलं घर माझंच आहे त्यामुळं किल्ला पाहून आल्यावर चहापाण्याला नक्की या' असं आग्रहाचं आमंत्रण दिलं. आजच्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमामुळं अर्थातच ते स्विकारणं काही शक्य नव्हतं.
       त्या गाववाल्यांनाच मग गडावरची पाहण्याची ठिकाणं विचारली. खिंडीतुन माथ्यावर जाणारी धार स्पष्ट दिसत होती. त्या धारेवरल्या मळलेल्या पायवाटेने माथ्याकडे निघालो.


       तासाभरात शेवटचा घसाऱ्याचा कातळटप्पा आला तो सहज पार करून भिलाई (१०६० मी.) माथ्यावर पोहोचलो. माथ्यावरुन आम्ही नुकतेच पाहिलेले साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड स्पष्ट दिसत होते.




       तसं आता गडावर पाण्याच्या टाक्या आणि रेणुका देवीचं छोटसं गुहामंदिर सोडलं तर फारसं काहीच शिल्लक नाही.


       आल्यापावली खिंडीत परत येऊन मधल्या वाटेने निकवेल, तिळवण मार्गे वाडीचौल्हेरला पोहोचलो. वाटेतुन चौल्हेर किल्ला आणि दिर-भावजय डोंगर सुरेख दिसत होते.



       आज मला पुण्यापर्यंत ड्रायव्हींग करायचं होतं आणि तसंही बागलाणातले हे सगळे किल्ले यापूर्वी मी दोनवेळा पाहिले होते त्यामुळं या किल्ल्यावर न जाता एक झोप काढणं मी पसंत केलं. या डोंगरयात्रेत मी स्वतः चौल्हेरवर गेलो नसल्यानं या किल्ल्याचा वृत्तांत सोबत असलेल्या 'सेकंड इन कमांड' जितेंद्र परदेशीने लिहिलाय. तो त्याच्याच शब्दांत...

       भिलाईहून जवळजवळ तासाभराचा प्रवास केल्यावर वाडीचौल्हेरला सकाळी ९.२० ला पोहोचलो.



       वाटेत सोबत असलेल्या दिपकने बराच वेळ बोरी झोडत १०-१५ बोरंच आणली आणि २-४ जणांना देवून बाकीच्यांच्या शिव्या खाल्या.



       वाडीचौल्हेरला पोहोचल्यावर गावकरी कुतुहलाने आमच्या 'Yellow army' कडे बघत होते. गाडी पार्क केल्यावर दिलीपने जाहीर करुन टाकले कि हा किल्ला माझा दोनदा पाहून झालाय आणि नंतर पुण्यापर्यंत ड्रायव्हींग करायची असल्याने मी येणार नाही. क्षणात मी कान टवकारले, दिलीप नाही म्हणजे बरेचजण जागीच गाळठतात. तशीही दिलीपची विश्रांती गरजेचीच होती, दोन दिवसांपासून आम्ही भटकत होतो. चौल्हेर नंतर प्रेमगिरी किल्ला करायचा होता. इथे उशिर झाला तर पुढचा किल्ला कदाचित टाळला जाईल असे मनात आले कारण सर्वजण लवकर निघण्याची भाषा करत होते. त्यामुळे लहान सँक घेवून लगेच निघालो. Yellow army एका लाईनीत चालती झाली. वाट स्पष्ट दिसत असतांनासुद्धा एकाला विचारुन घेतले. वेळ वाया जाऊ नये म्हणून खबरदारी. हा आमचा सातवा किल्ला होता पण सहट्रेकर्सना पाहून तसे वाटत नव्हते, कुणीच थकलेले वाटत नव्हते, फक्त वेळेचा प्रश्न होता.


       आम्ही भरभर चालू लागलो, हमरस्ता असल्यासारखी वाट होती.


       एक टेकडी पार केल्यावर किल्याची मुख्य चढाई सुरु झाली. चढाई एवढी अवघड नव्हती एक ट्रँव्हर्स होती त्याला रेलिंग लावलेले होते.


       बर्‍यापैकी मळलेली वाट होती. मधेमधे पायर्‍याही होत्या. आत्तापर्यंत ऊन्हातुन वाट होती. उजवीकडे ट्रँव्हर्स घेतल्यावर सावलीतून वाट होती त्यामुळे सुखावह वाटत होते.येथे सिताफळीची अनेक झाडे दिसली पण पाण्याअभावी सिताफळं सुकली होती.


       आत्ता पर्यंत प्रत्येक किल्ल्याला तटबंदी होती त्याप्रमाणे येथेही होती. हा सुद्धा महत्वाचा किल्ला होता असे जाणवले. समोरच एक लहान दरवाजा दिसू लागला. पायर्‍या सुरु झाल्या होत्या, मी, शिवम, मंदार, दयानंद, एकनाथ पुढे आलो. पहिला दरवाजा पार केल्यावर डावीकडे अतिशय सुंदर असे बुरुज आणि मुख्य दरवाजा दिसला. अजुनही तटस्थ उभा होता, आश्चर्याची गोष्ट म्हणजे खालून इथे दरवाजा असेल अशी कल्पनासुद्धा आली नाही. मुख्य दरवाज्यातुनही पहिला दरवाजा दिसत नव्हता. सर्वजण येईतोपर्यंत येथे पायर्‍यांवर बसुन थोडे फोटो शुट केले, पायर्‍यांजवळच मधमाशांचे पोळे होते, नीट निरखुन पाहीले तर तेथुन पाणी झिरपत होते आणि पिण्यासाठी मधमाश्या गोळा झाल्या होत्या. सर्वांना सावध करुन चढाई चालू केली.




       पाऊण तासात एक टप्पा चढुन गेल्यावर उभा कातळ लागला. वर मोठी सपाट जागा होती. डाव्याबाजूला एक मंदीर दिसले पण वेळ कमी असल्याकारणाने प्रथम किल्ल्यावर जाऊन यायचे ठरवले. तोपर्यंत मागे राहीलेले एकत्र जमा होतील व एकत्र आरती करता येईल. परत उजवीकडे ट्रँव्हर्स घेवून पश्चिमेकडुन वर जाण्याची वाट होती. वाटेत दोन मोठे पाण्याचे बंदिस्त टाके होते याचा अर्थ राबता किल्ला होता. मागच्या वाटेने राजगडासारखा लहान दरवाजा होता तेथुन चौल्हेर (११२८ मी.) माथ्यावर प्रवेश केला. वर बांधकामाचे भरपूर अवशेष होते. दोन पिण्यायोग्य पाण्याचे टाके होते. चढाईला सुरुवात केल्यापासुन एका तासाच्या आत आम्ही भगव्याजवळ होतो. तेथुन आसपासचा निसर्गरम्य परीसर मनात साठवून घेतला अर्थात फोटोही काढले लगेच परतलो. नंतर येणार्‍यांना लवकर मंदिराजवळ येण्यास सांगितले. मंदिरात एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली, हनुमानाच्या मुर्ती सोबत शिवरायांचीही मुर्ती होती. आमचा पुजारी राहुल आल्यावर सर्वांनी आरती केली आणि परतीचा प्रवास सुरु केला. महादेव, नाना, शिंदेसर पहिलेच निघाले होते. ऊन वाढत होते. उतरताना जणूकाही रेस लागली असल्यासारखे अर्ध्या तासात सगळे खाली उतरले. आता एक गोष्ट नक्की होती ती म्हणजे शेवटचा प्रेमगिरी किल्ला निश्चितच होणार होता.



       चौल्हेर पाहून पुढे निघाल्यावर साहजिकच नेतृत्व पुन्हा माझ्याकडे आलं होतं. सोमवारी बऱ्याच जणांना फर्स्ट शिफ्टला कामाला जायचं असल्यामुळं जेवढ्या लवकर घरी पोहचू तेवढं चांगलं होतं म्हणून कण्हेरगडाऐवजी प्रेमगिरी पहायचं सर्वानुमते ठरलं होतं. त्यासाठी वाडी चौल्हेरहून परत तिळवण, निकवेल, डांगसैंदाणे, मोकभणगीवरून सरळ हिंगुळवाडीलाच गेलो. तसं वाटेत असलेल्या पाठविहीरच्या फाट्यावरून पाठविहीर मार्गानेही गडावर जाता येतं पण हिंगुळवाडीतुन प्रेमगिरी जवळ आहे. कमी अंतर चालावं लागत असल्यामुळं अर्थातच वेळ वाचणार होता. हिंगुळवाडीच्या पुढे शेतातल्या कच्च्या गाडीरस्त्याने गडाचा पायथा गाठला. पायथ्याशी असलेल्या शेतातल्या एका घराजवळ गाडी लावली.



       पाणपिशव्या भरून घेतल्या आणि गडाशेजारून घसाऱ्याच्या वाटेनं आडवं जात पलिकडच्या खिंडीत पोहोचलो. खिंडीतुन गडावर जाण्यासाठी इथं पायऱ्या खोदलेल्या आहेत. स्थानिक हिला बारा पायऱ्यांची वाट म्हणतात. पुढच्या दहा मिनिटांत प्रेमगिरी (८१० मी.) माथ्यावर पोहोचलो.




       रामकुंड, सीताकुंड नावाच्या पाण्याच्या टाक्या पाहून हनुमान मंदिरात गेलो. तिथं नैवेद्य दाखवून आरती केली.




       आज आमच्या सोबत असलेल्या मंदार दंडवतेच्या लग्नाचा वाढदिवस होता. संसारी माणसाने अशा 'महत्वाच्या दिवशी' ट्रेकला जाण्याची परवानगी कशी काय मिळवायची? हे त्याच्याकडून एकदा माहिती करुन घ्यावंच लागेल. आपल्यासोबत असा 'माहितगार' माणुस असल्याचा आनंद सर्वांना इतका झाला की, सगळ्यांनी त्याला खांद्यावर उचलून घेऊन तो व्यक्त केला.


       गडावरून गाडीपाशी आलो. ट्रेक संपून आता परतीचा प्रवास सुरू करायचा होता त्यामुळं जिथं गाडी लावली होती त्यांना हातपाय धुवायला पाणी मागितलं तर त्यांनी चक्क पाण्याची मोटर सुरू करून दिली. या ट्रेकमुळं बागलाणातला एक सर्वांगसुंदर ट्रेक आम्हा फाल्कन्सच्या पोतडीत जमा झाला होता. हातपाय धुवून प्रसन्न मनाने परतीच्या मार्गाला लागलो ते या भागात परत येऊन असाच एखादा 'रेंज ट्रेक' करण्यासाठीच.

समाप्त.

फोटो सौजन्य :- मंदार दंडवते, आकाश गुप्ता

संदर्भ :-

१) आज्ञापत्र - रामचंद्र पंडीत अमात्य लिखित
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
३) शि.प.सा.सं.क्र. १३७८
४) शिवराजभूषण १०७
५) जेधे शकावली
६) सभासद बखर
७) शि.प.सा.सं.क्र. १४४७/१४६३
८) शिवापूरकर देशपांडे शकावली
९) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे


दिवस दुसरा "मोहिम बागलाणची"

"मोहिम बागलाणची"


दिवस दुसरा


'साल्हेर, सालोटा'


पहिल्या दिवसाचा वृत्तांत जर वाचला नसेल तर वाचा इथे एक टिचकी मारून.


       अलंग-मदन-कुलंग हे दुर्गत्रिकुट पाहिल्यानंतर त्याच ट्रेकला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट अर्थात कळसुबाईवर जाणं झालं होतं. हे कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात येतं तर महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला साल्हेर हा नाशिक जिल्ह्यात मोडतो. आकडेवारी अशी सांगते की नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातले सर्वात जास्त किल्ले आहेत. आता जास्त म्हणजे किती असतील? तर थोडे थोडके नव्हे, तब्बल साठ किल्ले आहेत नाशकात, तेही एकापेक्षा एक सरस असे. त्यामुळं आजच्या ट्रेकच्या दुसर्‍या दिवशी, बर्‍याच दिवसांची सर्वात उंच किल्ल्यावर जाण्याची सर्वांच्या मनातली एक सुप्त इच्छा पूर्ण होणार होती. आज आम्ही साल्हेर आणि सालोटा असे दोन किल्ले पाहून भिलाईच्या पायथ्याशी असलेल्या दगडी साकोड्यात मुक्कामाला जाणार होतो.

       सकाळी लवकर आवरलं आणि नाश्त्यासाठी कालच्या उरलेल्या चपात्या, मटकीचा रस्सा आणि साध्या भाताचा मस्तपैकी फोडणीचा भात बनवला. ज्यांच्याकडे आमचा रात्रीचा मुक्काम होता त्यांच्याकडूनच आजच्या रात्रीच्या जेवणासाठी अजून चपात्या बनवून घेतल्या.



       सकाळचं सगळं आवरून निघण्यापूर्वी कांतीलाल महाले यांच्या घरच्यांसोबत फोटो काढले. त्यांना आमचा मनाजोगता पाहुणचार करता आला नसल्याचं दुःख त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यात आणि उतरलेल्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. त्याची काही प्रमाणात उतराई म्हणून की काय त्यांनी नाचणीचं एक पोतं आम्हाला देऊ केलं होतं. ते प्रयत्नपूर्वक टाळत त्यांच्याच घरामागच्या शेताडीतून साल्हेरकडे निघालो. वाटेला लावून द्यायला एकनाथच्या मित्राचे काका आले होते.



       शेतातुन पुढे जाऊन ओढा ओलांडला आणि वाट चढणीला लागली. वाटेतल्या भातशेतीची तोडणी झाली होती. भाताचे बांधलेले पेंढे पाहिल्यावर सोबत असलेल्या महादेव पाटील मधला बहुधा शेतकरी जागा झाला असावा.





       ट्रेकमधे फक्त काही जणांवरच कामाचा भार पडू नये म्हणून प्रत्येकाला थोडीफार कामं नेमून दिली जातात. त्याच प्रमाणे आमच्या 'क्वॉर्टर मास्टर'ला मदत करायलाही आमच्यातल्याच काही जणांना सांगितलं होतं. त्यांनी करायच्या कामाच्या बाबतीत क्वॉर्टर मास्टरची पहिल्याच दिवशी तक्रार आली होती. तिचं वेळीच निराकरण, तेही कुणाचं मन न दुखवता होणं गरजेचं होतं. 'Home Sickness' आल्यामुळं अशा वेळी छोट्या छोट्या खटक्यांचं पर्यवसान मोठ्या भांडणात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं सगळ्या ग्रूपचं बाँडींग निदान ट्रेक संपेपर्यंत तरी रहावं यासाठी असं 'Damage Control' ट्रेक लिडरला वेळीच करावं लागतं. हे असं जर वेळीच झालं नाही तर पुढे जाऊन खुप मोठी समस्या उभी राहते. हे असं प्रत्येक ट्रेकला, खास करुन जंबो ट्रेकला तर हे दररोज करावंच लागतं. ट्रेकमधे दररोज संध्याकाळी यासाठी थोडा वेळ राखून ठेवावाच लागतो. लगेचच तक्रार आल्यामुळं संध्याकाळपर्यंत वाट न बघता साल्हेरकडे जाण्यापूर्वी मुद्दाम वेळात वेळ काढून हे Damage Control केलं.


       आता थोडं वय वाढलं म्हणून काय झालं थोडंतरी जगाबरोबर चालावंच लागतं नाही का? म्हणून हल्लीचे कॉर्पोरेट्स काढतात तसे फोटो काढून पुढे निघालो.



       आता पुढे चुकण्याचा काही प्रश्नच नव्हता. वाट सरळ एका धारेवरुन साल्हेर-सालोट्याच्या खिंडीत जात होती. वाटेतल्या मेटावरच्या चौकीच्या बांधकामाच्या अस्पष्ट खुणा पाहिल्या आणि खिंडीच्या पलिकडच्या बाजूने डावीकडे वळून अरुंद वाटेने सालोट्याकडे निघालो.


       बरंच अंतर चालून गेल्यावर घसार्‍याची वाट चढून कातळकोरीव पायर्‍या गाठल्या. काही पायर्‍यांनंतर गडाचा कातळात कोरलेला पहिला दरवाजा लागला.






       पुढे असलेल्या दुसर्‍या दरवाज्याच्या नंतर कड्यातल्या खांब टाक्यातले थंड पाणी भरुन घेतले. इथून साल्हेरची हरिहर पायर्‍यांच्या तोडीसतोड असलेली पायर्‍यांची वाट स्पष्ट दिसत होती.



       उरलेल्या पायर्‍या चढून सालोटा (१३५० मी.) गडमाथ्यावर आलो. गडावर पाण्याच्या टाक्या सोडल्या तर फारसं काही शिल्लक नाही. दरवाज्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या मारुतीला नैवेद्य दाखवून आरती म्हटली आणि आल्या पावली साल्हेर-सालोट्याच्या खिंडीत परतलो.



       साल्हेर-सालोट्याच्या खिंडीतले तटबंदीचे अवशेष पाहिले आणि माळदर गावाच्या बाजुने साल्हेरकडे निघालो. थोडं पुढं गेल्यावर खिंडीच्या नेमकं वर एक पाण्याचं टाकं दिसलं. थोडीशी वाट वाकडी करुन मुद्दामहुन ते पाहिलं आणि परत फिरुन मुख्य वाटेला लागलो.



       कातळातल्या वाटेनं जाताना तीन दरवाज्यानंतर डाव्या बाजूला असंख्य गुहा दिसल्या. त्या पार करुन चौथ्या दरवाज्यातून गडाच्या पठारावर आलो. समोरच गडाच्या सर्वोच्य माथ्यावर असलेलं परशुरामाचं मंदीर दिसत होतं.









       आता बाकी कुठेही न रेंगाळता तडक मंदीर गाठलं आणि नेहमीप्रमाणे आरती केली.



       आमचं बर्‍याच दिवसांचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. इथंही आम्ही कॉर्पोरेट्स असल्यासारखे काही फोटो काढले.




       महाराष्ट्रातल्या साल्हेर (१५६७ मी.) या सर्वोच्च किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्याचा आनंद काहींना इतका झाला होता की त्यांच्यात साक्षात रामदेवबाबाच संचारले होते. पन्नाशी-साठीतले असूनही आमच्यातल्या काहींचा फिटनेस तर अगदी तरुणांना लाजवेल असाच आहे.




       तसं पहायला गेलं तर साल्हेर हा बागलाणातला सामरीक दृष्ट्या एक अतिशय महत्वाचा किल्ला. ज्याच्या ताब्यात साल्हेर, मुल्हेर, चौल्हेर, न्हावी ऊर्फ रतनगड असतील त्याची बागलाणात सत्ता. हा भाग म्हणजे जणू स्वराज्याची उत्तरेकडील तटबंदीच. त्यामुळे साहजिकच या भागात अनेक युद्धे झाली. बहुतेक सर्व ऐतिहासिक साधनांत या किल्ल्यांचा उल्लेख सापडतो. एवढं असूनही वर उल्लेखलेल्या सर्व किल्ल्यात बलदंड म्हणून पहिला मान मिळतो तो म्हणजे किल्ले साल्हेरलाच.
       महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर १६४६ मी.(९) उंची असलेलं जसं कळसूबाई तसं किल्ल्यांमध्ये समुद्रसपाटीपासून १५६७ मी. उंची असलेला, गिरीदुर्ग प्रकारातला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणजे साल्हेर, जो डौलबारी या डोंगररांगेवर आहे. आजूबाजूचा एकूणच सर्व भाग मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळं अतिशय समृद्ध झालेला आहे. इथली जमीन अतिशय सुपिक असल्यामुळं इथल्या भिल्ल, कोकणी,आदीवासी लोकांचं राहणीमान थोडं उंचावलेलंच आहे. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ कि.मी. असून त्याने व्यापलेले क्षेत्र सहाशे हेक्टर म्हणजेच तब्बल दिड हजार एकर एवढं मोठं आहे.
       साल्हेर किल्ला परशुरामाची तपोभूमी म्हणून ओळखला जातो. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी इथूनच बाण सोडला अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवकाळात इथं झालेल्या लढाईमुळं मराठ्यांच्या इतिहासात बागलाणाला अतिशय महत्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६७० मध्ये दुसर्‍यांदा सुरत लुटून बागलाणातुन परत येताना मुल्हेरजवळचे एक खेडे लुटले. मोगल सेनापती दाऊदखान मागावर आल्यानं त्याची आणि मराठ्यांची दिंडोरी इथं गाठ पडली. दाऊदखानाबरोबरची ही लढाई जिंकल्यावर मराठ्यांनी लगोलग अहिवंत, रवळा, जवळा, मार्कंडा आणि हातगडासोबत साल्हेरही जिंकून घेतला.(३)(४)(५)(६)
       दिलेरखान आणि बहादूरखान या दोन मोंगल सरदारांनी १६७१ च्या पावसाळ्यानंतर लगेचच त्यांच्या सुरतेच्या तळाजवळून भली मोठी फौज घेऊन येऊन हिवाळ्याच्या सुरुवातीस बागलाण प्रांताची मोहिम हाती घेतली. त्यावेळी इखलासखान मियाना, मुहकमसिंंह चंदावत, राव अमरसिंह इत्यादी सरदारांनी साल्हेर किल्ल्याला वेढा दिला. तो वेढा तसाच चालू ठेऊन दिलेरखान स्वत: रवळागड घेण्यासाठी फौज घेऊन निघाला. शिवाटपट्टण येथे महाराजांना याची बातमी लागली आणि त्यांनी ताबडतोब मोरोपंत व प्रतापराव यांना साल्हेरचा वेढा मोडून काढण्यास पाठवले.(७)(५)(८)
       सभासद बखरीत या युद्धाचं अतिशय सुरेख वर्णन आलं आहे. सभासद म्हणतो...
       "इखलासखान नवाब ह्याणी येऊन सालेरीस वेढा घातला आणि गडाखाले उतरले. हें वर्तमान राजियांस कळोन राजियांनी प्रतापराव सरनोबत लष्कर देऊन सिताबीनें वरघाटे सालेरीस जाऊन, बेलोलखानालरि छापा घालून, बेलोलखान मारुन चालवणें आणि कोंतणातून मोरोपंत पेशवे ह्यास हशमानिशी रवाना केले. हे हिकडून येतील आणि तुम्ही वरघाटे येणें. असे दुतर्फा चालून घेऊन, गनिमास मारुन गर्दीस मेळविणें. असीं पत्रें पाठवली. त्यावरुन प्रतापराव लष्कर वरघाटे आले. मोरोपंत पेशवे कोकणातून आले. उभयंता सालेरीस पावले. एक तर्फेंने लष्करानी घोडी घातलीं. एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली. मोठे युद्ध जाहालें. चार प्रहर दिवस युद्ध जाहालें. मोंगल, पठाण, राजपूत, रोहिले, तोफाची, हत्ती, उंटे, आराबा घालून युद्ध जहालें. युद्ध होतांच पृथ्वीचा धुराळा असा उडाला कीं, तीन कोस औरस, चौरस आपलें परके माणूस दिसत नव्हतें. हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार माणूस मूर्दा जाहालें. घोडी, उंट, हत्ती गणना नाही. रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे चिखल जाहालें. त्यामध्ये रुतो लागले. असा कर्दम जाहला. मारता मारतां घोडे जिवंत उरले नाहींत. जे जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजियांकडे गणतीस लागले. सवाशें हत्ती सांपडले. साहा हजार उंटे सापडली. मालमत्ता खजीना, जडजवाहीर, कापड, अगणित बिछाईत हातांस लागली. बेवीस वजीर नामांकित धरले. खासा इखलासखान व बेलोलखान पाडाव झाले. ऐसा कुल सुभा बुजविला. हजार दोन हजार सडे सडे पळाले. असे युद्ध जाले. त्या युद्ध झाले. त्या युद्धांत प्रतापराव सरनौबत व आनंदराव व व्यंकाजी दत्तो व रुपाजी भोसले व सुर्यकांत कांकडे, शिदोजी निंबाळकर व खंडोजी जगताप व गोंदजी जगताप संताजी जगताप व मनाजी मोरे व विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ व मुकूंद बल्लाळ, वरकड बाजे वजीर, उमराव असे ह्याणी शिकस्त केली. तसेच मावळे लोक व ह्याणी व सरदारांनी शिकस्त कस्त केली. मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनोबत ह्या उभयंतांनी आंगीजणा केली आणि युद्ध करिंता सूर्यराव कांकडे पंचहजारीचा मोठा लष्करी धारकरी, ह्याणो युद्ध थोर केले. ते समयी जंबूरियाचा गोळा लागून पडला. सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा, त्याच प्रतिमेचा असा शूर पडला. वरकडही नामांकित शूर पडले. असे युद्ध होऊन फत्ते जाहली.
       मोगलांशी झालेल्या या युद्धात सुर्यराव काकडेंसारख्या अनेक मराठी वीरांना हौतात्म्य आलं. खरं म्हणजे अशा ज्ञात-अज्ञात वीरांची स्मारकं आज त्या त्या ठिकाणी उभी राहायला हवीत. ऐन मैदानावर बलाढ्य मोगलांविरुद्ध मिळालेल्या या ऐतिहासिक विजयामुळे, आपणही अशा प्रकारच्या मैदानी युद्ध प्रकारात समोरासमोर भिडूनही जिंकू शकतो हा आत्मविश्वास मराठ्यांमधे आला.

          वरील फोटो आंतरजालावरून साभार.

       परशुराम टेकडी उतरुन खालच्या गुहेपाशी आलो. आज दुपारच्या जेवणाला पोटभर ओली भेळ आणि वर ताक असा शॉर्टकट मारला होता.









       गुहेसमोरचं रेणूका देवीचं उध्वस्त मंदीर पाहिलं. बाजूचा गंगासागर तलाव पाहिला आणि गडफेरी आवरती घेत साल्हेर गावाकडे निघालो. वरच्या पठारापासून तीन दरवाजे ओलांडून खालच्या माचीवर उतरलो.




       माचीवर वाड्याचे अवशेष आणि पाण्याची टाकी पाहिली आणि शेवटच्या दरवाज्यातून बाहेर पडून साल्हेर गाव गाठलं.



       सकाळी गाडी वाघांब्यात लावली होती तिथून ती घेऊन आलो. वाटेतल्या 'तेल्या' आणि 'मोऱ्या' घाटवाटा त्यांच्या माथ्यावरूनच पाहिल्या आणि कुठेही न वेळ घालवता तताणे मार्गे भिलाई किल्ल्याच्या पायथ्याच्या दगडी साकोडे गावात मुक्कामाला पोहोचलो.


       दगडी साकोडे गाव तसं छोटसंच. तिथे पोहोचलो तेव्हा कट्टयावर काही वयस्क लोक गप्पा मारत बसले होते. त्यांना आम्ही तिथं येण्याचं प्रयोजन सांगितलं आणि राहण्याच्या जागेबद्दल चौकशी केली. गावात पाहुणे आलेत म्हटल्यावर त्यातल्या एकाने लगेचच शाळेत मुक्कामाची सोय करून दिली. त्यासाठी रखवालदाराला किल्ली घेऊन येऊन गेट उघडून देण्याकरीता निरोपही पाठवला. त्यांच्यात एक गावचे पोलीस पाटीलही होते. त्यांनी शाळेशेजारच्या घरातून गावकीच्या मालकीची वायर टाकून रात्रभर लाईटची सोय सुध्दा करुन दिली. त्याशिवाय अजूनही काही मदत लागली तर ती सुध्दा हक्कानं मागून घ्या असंही वर सांगितलं. आमच्यासारख्या अनोळखी लोकांसाठी अशा छोट्याश्या खेडेगावातल्या कोकणी लोकांनी केलेलं आदरातिथ्य त्या भागातल्या लोकांबद्दल बरंच काही सांगून गेलं.
       गॅस पेटवून पहिला फक्कड चहा बनवला आणि जेवणाच्या तयारीला लागलो. आजच्या रात्रीच्या जेवणाचा मेन्यु होता वांग-बटाट्याचा रस्सा आणि गवारीची सुकी अशा दोन भाज्या, चपाती, मसालेभात आणि पापड. तसं आज दिवसभर पोटभरीचं काही झालं नव्हतं म्हणून निवांत भरपेट जेवण केलं आणि लगेचच ताणून दिली.




       ट्रेकच्या आजच्या दुसर्‍या दिवसअखेर आमचे कालचे तीन आणि आजचे दोन असे एकूण पाच किल्ले अगदी आरामात पाहून झाले होते.

क्रमशः

पुढचा भाग वाचा या धाग्यावरून...