शुक्रवार, ६ मार्च, २०२०

भाग दुसरा "अथातो घाटजिज्ञासा"

"अथातो घाटजिज्ञासा"


भाग दुसरा



पहिला भाग वाचा पुढे दिलेल्या धाग्यावर

https://watvedilip.blogspot.com/2020/03/blog-post.html

 

       शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना 'सह्याद्री आपले सामर्थ्य आणि आपल्या शत्रूंचे दौर्बल्य आहे' हे महाराजांनी पुर्णपणे ओळखलं होतं हे पदोपदी जाणवतं. तसं पहायला गेलं तर शिवकाळात मराठ्यांची मनुष्यबळ, युद्धसामग्री आणि आर्थिक बाजू अतिशय कमकुवत होती. पण केवळ याच सह्याद्रीच्या मदतीने त्यांनी आखलेले आपले बहुतेक सर्व डावपेच पुर्णत्वास नेले. त्या वेळचं मराठ्यांचं सैन्य म्हणजे समाजातील अतिशय सामान्यातलं सामान्य घटक होतं. मोजके अपवाद वगळता ज्यांना विळा, कोयता फारफार तर कुऱ्हाड या पलिकडे शस्त्र माहिती नव्हतं त्यांच्या मनात आपण संख्येने कमी असूनसुध्दा केवळ सह्याद्रीच्या मदतीने बलाढ्य सैन्याविरुद्ध लढून सहज जिंकू शकतो हा आत्मविश्वास महाराजांनी जागवला. केवळ स्वराज्यासाठी  आणि महाराजांच्या एका शब्दाखातर हे लोक कोणतेही धाडस करायला मागेपुढे पहात नसत. बाजीप्रभू, मुरारबाजी किंवा जिवा महाला यांच्यासारख्या असंख्य उदाहरणांवरुन हे अगदी व्यवस्थितपणे स्पष्ट होतं. मराठ्यांचं सैन्य हे कसं शूर आणि कडवं होतं हे कवि भूषणाचा छंद वाचल्यावर अतिशय चांगल्या प्रकारे समजतं.

छूटत कमान और तीर गोली बानन के होत कठिनाई मुरचानहू की ओट में l
ताही समय सिवराज हांक मारि हल्ला कियो, दावा बांधि परा हल्ला वीर वर जोट में l
भूषन भनत तेरी हिम्मती कहाँ लौ कहों, किम्मति यहां लगि है जा की भटझोट में l
ताव दै दै मूँछन कँगूरन पै पाँव दै दै अरिमुख घाव दै दै कूदी परै कोट में ll २३ ll


अर्थ :- युद्धात जेव्हा शत्रूच्या बाजूने बाणांचा व गोळ्यांचा सारखा वर्षाव सुरु झाला व मोर्चाच्या आड उभे राहून सुद्धां जीव वाचवणे कठिण झाले तेंव्हा शिवरायांनी सर्व मावळ्यांना ललकारुन शत्रूवर हल्ला केला. दोन्ही बाजूंकडील वीरांमध्ये चकमक उडाली. कविभूषन म्हणतो, हे शिवराज! मी तुमच्या साहसाचे किती व कोठवर वर्णन करु? तुमच्या शूरत्वाची ख्याती शूरवीर मंडळीत इतकी पसरली आहें की, युद्धभूमीवर तुम्हांस नुसते पाहूनच मराठे गडी मिशांवर ताव देत देत, उंचीवरुन किल्ल्यांत उड्या घालतात व शत्रूवर पाय देत देत त्यांची मुंडकी उडवितात.

       उंबरखिंडीत अशा कडव्या सैन्यासमोर लढताना, पिण्यास पाणीसुध्दा नसताना आणि अशा अडचणीच्या जागी कारतलबखानाच्या सैन्याची काय दाणादाण उडाली असेल याची कल्पनाच करवत नाही.

        अशा या पराक्रमी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना सुरवातीला आम्ही भटके मंडळी त्यात उल्लेख आलेल्या संदर्भ ठिकाणांवर जात असू. प्रत्यक्षपणे गेल्यावर तेथील भौगोलिक परिस्थितीचा मागोवा घेऊन ते युद्ध कसे लढले गेले असेल हे पाहण्यात नंतरच्या काळात जास्त रस वाटू लागला. हे सगळं करत असतानाच नकळत घाटवाटांच्या नादी लागलो ते आजतागायत. त्यामुळे हल्ली किल्ले पाहण्यापेक्षा घाटवाटाच जास्त धुंडाळ्याव्याशा वाटतात. ट्रेकींगमधे एकूणच घाटवाटा हे प्रकरण थोडं अवघडच आहे. एकदा का या घाटवाटांचा नाद लागला की त्यातुन बाहेर पडणं अतिशय अवघड. खरं म्हणजे अशा या घाटवाटा का बरं तयार केल्या गेल्या असाव्यात? हे जर का जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला जवळजवळ दोन हजार वर्षे मागं जावं लागेल.

        इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर सातवाहन राजे राज्य करत असत. हे राजे सुमारे चारशे वर्षे सलग राज्य करत होते. त्यामुळे साहजिकच सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्रासह इतर प्रदेशांचीही भरभराट झाली. प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण, जीर्णनगर म्हणजे जुन्नर, तगर म्हणजे तेर, नेवासा आणि नाशिक अशी भरभराटीला आलेली घाटमाथ्यावरील शहरे या राजवटीत उदयास आली. शुर्पारक म्हणजेच आताचे नालासोपारा तसेच कल्याण आणि चौल ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची अत्यंत महत्त्वाची बंदरे होती. सातवाहनांच्या घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्रांचा या बंदरांच्या मदतीने परदेशात व्यापार चालत असे. त्यासाठी हळूहळू सह्याद्री ओलांडण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नाणेघाटासारख्या घाटवाटा तयार केल्या गेल्या. युरोपातील रोम, ग्रीस, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेशातून आयात होणारा माल सोपारा वगैरे बंदरात उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाटातून जुन्नर मार्गे व्यापारी पेठ असलेल्या पैठणला नेला जात असे. त्याच प्रमाणे निर्यात होणारा माल याच मार्गाने युरोपात जात असे. नाणेघाटाच्या पायथ्याशी वैशाखरे नावाचे गाव आहे की जे "वैश्यखेडे" या नावावरून आले आहे. घाटवाटेखाली असल्याने या गावात व्यापारी व त्यांच्या नोकरांच्या विश्रांतीसाठी इमारती / सराया बांधलेल्या होत्या. त्यामुळे सह्याद्रीत नाणेघाटासारखे लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले.
        अशा या घाटवाटांचा सामरिक दृष्टीने उपयोग मात्र शिवाजी महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे करून घेतला. 'जावळी' जिंकून घेतल्याने आणि अफजलखान वधानंतर पन्हाळगडापर्यंत केलेल्या वैक्रमणामुळे दाभोळ बंदरातुन पारघाट, हातलोट घाट किंवा आंबिवली वगैरे घाटवाटांनी जो माल विजापूरला जात असे त्यावर काही प्रमाणात नियंत्रण महाराज ठेऊ शकत होते. परराष्ट्रीय राजकारणात यालाच आर्थिकदृष्ट्या जखडून (financial choke up) ठेवणं म्हणतात. जावळी जिंकण्याचं हेही एक प्रमुख कारण असू शकतं. शिवकाळात उंबरखिंडीसारख्या घाटवाटा अवघड तर होत्याच पण आजही त्या 'ऐतिहासिक' घाटवाटा भटक्यांची कसोटी पाहणार्‍याच आहेत.
       घाटवाटांबद्दल सांगायचं झालं तर दाट जंगल, निर्मनुष्यता, अत्यंत कमी वापर, पाण्याची कमतरता आणि दृष्टीभय यामुळे आज तर त्या अधिकच खडतर झाल्या आहेत. त्यामुळे घाटवाटांच्या डोंगरयात्रा ह्या इतर डोंगरयात्रांपेक्षा थोड्या जास्तच आव्हानात्मक असतात. पण जैवविविधता, निसर्गरम्य परिसर, अतिशय उंची असणारी आणि खडी चढाई वा उतराई, क्वचितच निर्भयतेची क्षमता पाहणार्‍या कातळकोरीव वाटांमुळे या घाटवाटा अधिक आनंद देऊन जातात. खरं सांगायचं तर हा सगळा 'सह्याद्री'च वेड लावणारा आहे. कसा का होईना, पण एकदा का कुणी या सह्याद्रीच्या वाटेला गेला की तो कायमचा त्याचाच होऊन जातो.
       सह्याद्रीतली भटकंती ही एखाद्या व्यसनासारखी आहे. असं या सह्याद्रीतल्या घाटवाटांच्यात आहे तरी काय, की त्याची चटक लागल्यावर त्या स्वस्थ बसु देत नाहीत? आणि हे जर का समजून घ्यायचं असेल तर आधी सह्याद्री भौगोलिक दृष्ट्या कसा आहे ते थोडं समजून घ्यावं लागेल.


पश्चिम घाट --

 

        भारताच्या दक्षिणेस असणार्‍या पश्चिम घाटाची उत्क्रांती ज्वालामुखीच्या उद्रेकातुन झालेली आहे. त्यामुळे पश्चिम घाटाएवढी जैवविविधता आपणांस क्वचितच कुठे पाहवयास मिळते. पश्चिम घाट हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणार्‍या तापी नदीपासुन दक्षिणेस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि केरळ राज्यात पसरलेला आहे. याची दक्षिणोत्तर लांबी जवळजवळ १६०० किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहे. याचे दक्षिणेकडील शेवटचे ठिकाण कन्याकुमारी येथे आहे. पश्चिम घाटाला महाराष्ट्रात सह्याद्री, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे निलगिरी किंवा पालघाट तर केरळमधे अनैमलै असं म्हटलं जातं.


पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखरे --



       
       वरील कोष्टक पाहिल्यावर एक लक्षात येईल की जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसतशी पश्चिम घाटाची उंची वाढत जाते. पण त्याचप्रमाणे त्याचे स्वरुप सुद्धा बदलत जाते. तो डोंगराळ होऊ लागतो. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्रात दृष्टीभय निर्माण करणारे जसे ताशीव कडे आणि खोल दर्‍या आहेत तसे दक्षिणेत मात्र नाहीत.

सह्याद्री --

 

       महाराष्ट्राचा विचार करता तापी नदीपासुन तिलारी नदीपर्यंत दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वत रांगेमुळे कोकण, घाटमाथा आणि देश किंवा सह्यपठार असे तीन भौगोलीक विभाग पडलेले दिसुन येतात. कोकणातुन पुर्वेकडे पाहिले तर सह्याद्रीची मुख्यरांग साधारणपणे सातशे ते हजार मीटर्सपर्यंत उठावलेली दिसून येते. घाटमाथ्याच्या बाजुला असणार्‍या दोन भागातल्या उंचीतल्या फरकामुळे जडणघडणीत वैविध्य पाहवयास मिळते.



       स.आ.जोगळेकर यांनी लिहिलेल्या "सह्याद्री" ग्रंथात ते म्हणतात...
       'एकीकडे घाटमाथ्यावरील उत्तुंग व प्रचंड प्रस्तर आणि दुसरीकडे सपाट व सुपीक मळई, एकीकडे निरक्षर व संस्कारशून्य जंगली जमाती तर दुसरीकडे संस्कारांनाच सर्वस्व मानणार्‍या पंडीतांच्या वसाहती. एकीकडे मनुष्यवस्तीने गजबजलेली सुसंपन्न शहरे व दुसरीकडे खोपटांची खेडी व निर्मनुष्य अरण्ये. एकीकडे झुडपेही उगवणार नाहीत असे कोरडे माळ तर दुसरीकडे झुडूप रुजण्यासही अवसर नाही अशी घनदाट अरण्ये. इकडे घाटांच्या उतारांवर बीजमात्रांसाठी खडकात छेद घेऊन धान्याची लागवड करण्याची दरिद्री शेती तर तिकडे आजतागाईत शास्त्रीय साधनांनी युक्त व समृद्ध अशा व्यापारी पिकांची पैदास. एकीकडे पावसाची समृद्धी तर दुसरीकडे सदैव अवर्षणाची धास्ती. या विविधतेचे कारण सह्याद्री'.

        अशा या दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वत रांगेला काटकोनात म्हणजे पुर्व-पश्चिम उपफाटे वा उपरांगा जोडलेल्या आहेत. त्यांची शैलबारी-डौलबारी, सातमाळ-अजिंठा, त्र्यंबक, कळसुबाई, बाळेश्वर, हरिश्चंद्र-बालाघाट, भुलेश्वर, महादेव, कोळेश्वर आणि महाबळेश्वर वगैरे फारच सुरेख नावे आहेत. फक्त चार डोंगररांगा सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर आहेत त्या म्हणजे घाटमाथ्यावरच्या भाडळी-कुंडल आणि दातेगड रांगा तर कोकणात असलेल्या माथेरान आणि महिपतगड रांगा.

       
       थोडं सोपं करून सांगतो. आपण शाळेत वह्या वापरतो ना, हे अगदी तसंच आहे. हे बघा, वहीच्या पानाच्या डाव्या बाजूला जी समासाची उभी रेघ असते ना ती म्हणजे सह्याद्रीची मुख्य रांग. या रेषेच्या डाव्या बाजूला कोकण तर उजव्या बाजूला सह्यपठार. उजव्या बाजूच्या आडव्या रेघा म्हणजे ज्यावर आपण लिहितो त्या म्हणजे सह्याद्रीच्या उपरांगा. त्या दरम्यानची जागा म्हणजे नद्यांची खोरी. तर समासाच्या डाव्या बाजूच्या आडव्या रेघा म्हणजे कोकणात उतरणारे दांड किंवा नाळा आहेत ज्यातुन कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा आहेत. 


सह्याद्रीतील घाटवाटा --

 

       सुट्टीत गावाला जाताना किंवा कोणत्याही कामानिमीत्त प्रवास करताना रस्ता डोंगरावर चढू लागला की PWD ने किंवा MSRDC ने रस्त्याच्या बाजूलाच पाटी लिहलेली दिसुन येते 'घाट सुरु'. म्हणजे आता आपली गाडी वळणावळणाच्या वाटेने डोंगर चढून जाणार. वर म्हटल्या प्रमाणे घाटवाटा तर कोकणात उतरणार्‍या दांडांवर किंवा नाळेतून आहेत. मग हे गौडबंगाल नेमकं आहे तरी काय? मग घाटवाटा नेमकं म्हणायचं तरी कशाला? पण ऐन घाटवाटेत जाण्यासाठी मात्र अजूनही थोडीशी म्हणजे पुढच्या भागाची वाट पहावी लागणार आहे बरं का!

यापुढील भाग वाचा खाली दिलेल्या धाग्यावर

https://watvedilip.blogspot.com/2020/03/blog-post_9.html

क्रमशः



६ टिप्पण्या:

  1. भारीच दादा... वहीची उदाहरण आवडलं 😊

    उत्तर द्याहटवा
  2. लेखन अप्रतिम, सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर अशी कोकणातील माथेरान ते बदलापूर रांगेचा विचार व्हावा, कारण ह्या रांगेवर सोंडाई, इर्शाळगड, प्रबळगड, कलावंतीण, पेब, चंदेरी मलंगगड हे किल्ले आहेत!!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद. माथेरान रांगेबद्दल लेखात नक्कीच सुधारणा होईल.
      खरंतर घाटवाटांबद्दल भरपूर चर्चा व्हायला हवी. घाटवाटांचा इतिहास आणि भूगोल या विषयावर एकत्रितपणे विस्तृत लेखन बहुतेक कुठेही नाहीये. अशी चर्चा झाली तर या विषयावरचे बरेच मुद्दे बाहेर येतील, त्यावर लिखाण होईल आणि मग त्याचे एकत्रितपणे डॉक्युमेंटेशन करता येईल आणि असे होणे गरजेचे आहे.

      हटवा
  3. खूप सुंदर आणि महितीमय लिखाण दिलीप दादा. पुढच्या भागाची आम्ही आतुरतेने वाट बघतोय

    उत्तर द्याहटवा