बुधवार, ११ मार्च, २०२०

भाग चौथा "अथातो घाटजिज्ञासा"

"अथातो घाटजिज्ञासा"


भाग चौथा 


तिसरा भाग वाचा या धाग्यावर 

 'घाटवाटांची प्रशासन व्यवस्था'


       घाटवाटांची प्रशासन व्यवस्था बहूतेक करुन जास्त वाहतूक असलेल्या म्हणजे व्यापारी मार्गांवरच असे. कारण राजनैतिक आणि आर्थिकदृष्ट्या अशा वाटा अत्यंत महत्त्वाच्या असत. एकूणच संपुर्ण व्यापारी मार्गावर घाटमार्गाचा टप्पा अवघड आणि महत्वाचा असे. जसजसा काळ गेला तसतशा व्यापारी मार्गांवरच्या घाटवाटांतील त्रुटी समजू लागल्या आणि त्यानुसार त्यात सुधारणा होत गेल्या. प्रवाशांना, व्यापार्‍यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी घाटमार्गांची नियमित दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याच्या सोई करणे, अवघड जागी पायर्‍या खोदणे वगैरे त्यापैकीच काही सुधारणा होत.

       घाटमार्गात मुक्काम करता येणे शक्य नसल्याने तो एका दिवसातच ओलांडावा लागे त्यामुळे घाटाखाली आणि घाटमाथ्यावर मुक्कामायोग्य ठिकाणांची गरज भासु लागली. व्यापार्‍यांसोबत प्रवासी, धर्मप्रसारक, राजनैतिक अधिकारी सुद्धा प्रवास करत असत. त्यामुळे अशा लोकांच्या दर्ज्यानुसार घाटपायथ्याला आणि घाटमाथ्यावर मुक्कामायोग्य ठिकाणे तयार केली गेली. सद्य परिस्थितीत तरी अशी सरायांसारखी ठिकाणं पहायला मिळत नाहीत. घाटवाटेच्या पायथ्याशी आणि माथ्यावर बहूतेक ठिकाणी लेण्या पहायला मिळतात. सुरवातीच्या काळात या लेण्यांचा केवळ धार्मिक कामांसाठी आणि धर्मप्रसारकांच्या मुक्कामासाठीच उपयोग केला गेला, पण नंतरच्या काळात मात्र त्यांचा उपयोग हा प्रवासी आणि व्यापाऱ्यांच्या राहण्यासाठी केला गेला. जसं मुक्कामायोग्य ठिकाणांचं तसंच अन्नछत्राचं. रायगडाच्या परिघात असलेल्या वारंगीला अन्नछत्र असल्याचे उल्लेख सापडतात त्यामुळे खानुच्या डिग्याहून वारंगीत उतरणार्‍या बोचेघोळ नाळेला 'अन्नछत्राची नाळ' असंही म्हटलं जातं.

       कोकणातील बंदरे ज्या राजसत्तेच्या ताब्यात, त्यांचे व्यापार-उदीमावर नियंत्रण असे. त्यामुळे आर्थिक भरभराट होण्यासाठी बंदरे ताब्यात ठेवण्यात राजसत्तांच्यात चढाओढ सुरु झाली. घाटमाथ्यावरील राजसत्तेला बंदरे ताब्यात घेण्यासाठी घाटवाटांचाच वापर करावा लागे. त्यामुळे घाटवाटा स्वतःच्या अखत्यारीत ठेवण्यासाठी आणि घाटवाटेवर वाहतुक करणार्‍या व्यापार्‍यांच्या तांड्यांना संरक्षण देण्यासाठी राजसत्तांनी घाटावर आणि घाटाखाली मोक्याच्या जागी संरक्षणासाठी चौक्या व किल्ले बांधले. त्यायोगे ते घाटमार्गावर लक्ष ठेवू शकत होते.
       घाटवाटा व्यवस्थित चालू रहाव्यात याकरिता त्या वाटांच्या देघभालीसाठी एक स्वतंत्र विभाग असे. सध्याच्या भाषेत सांगायच झालं तर 'सार्वजनिक बांधकाम विभाग' किंवा 'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ' जे काम करतं साधारण त्याच प्रकारचं काम हा विभाग करत असे. त्या विभागात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या व्यक्तींची नेमणूक केलेली असे. त्यांचा एकमेकांशी उत्तमप्रकारे समन्वय देखील असे. ते कोण असत, त्यांची कामे काय आणि कशी चालत असत, याविषयी थोडेसे...

     

घाटपांडे -


       गाव-पांडे, देश-पांडे, पांढरी-पांडे, घाट-पांडे यातील 'पांडे' याचा अर्थ म्हणजे लेखनाधिकारी. त्या त्या कामाची विद्या अवगत असलेला अधिकारी लेखक म्हणजे पांडे. एका पत्रात एक 'घाटपांडे' त्रिंबक शिवाजी सांगतात की ' चौकी व चौत्रा यांचे पांडेपण पहिल्या अंमलापासून आपणाकडे आहे'. म्हणजे पांडे या शब्दाचा अर्थ लेखक असा जरी असला तरीसुद्धा त्यात सत्ताधिकाराचा अंतर्भाव आहे.
       थोडक्यात असे की शिवकालात किंवा त्यापुर्वीही घाटवाटांची व्यवस्था ठेवण्यासाठी जो एक मुख्य आणि सक्षम आधिकारी असे, त्यास घाटपांडे असं म्हणत. संपुर्ण घाटवाट आणि त्यापुढील वाटेवर असलेल्या चौक्या आणि चौत्रा त्याच्या ताब्यात असत. चौकी ही संरक्षणासाठी व टेहळणी करण्याची जागा तर चौत्रा म्हणजे जकात वसूल करण्याची जागा. ही दोन्ही ठिकाणं घाटपांडेच्या अखत्यारीत असत. घाटवाटांनी जे व्यापारी माल नेत त्यांच्याकडून जकात वसूल करुन त्या बदल्यात त्यांना चोराचिलटांपासुन व दरोड्यापासुन संरक्षण देणे हे त्याचे मुख्य काम असे. त्या दृष्टीने चौक्या आणि चौत्रा उभारणे, त्यावर सैनिकांची, अधिकार्‍यांची नेमणूक करणे इत्यादी कामे त्यास करावी लागत. घाटपांडे या मुख्य अधिकार्‍याच्या हाताखाली घाटवाटेत आणि पुढील रस्त्यावर आवश्यक असणार्‍या कामांसाठी कनिष्ठ अधिकारी असत. ऐन घाटवाटेत आणि व्यापार्‍यांच्या तळाच्या ठिकाणची कामे पाहण्यासाठी घाटपांडेंच्या हाताखाली पथकी किंवा पतकी व पानसरे, बिडवे अथवा बिडवई, मोढवे अथवा मोढवी आणि सभासद असे दुय्यम अधिकारी असत. व्यापार्‍यांच्या तळाच्या पुढील बर्‍याच लांबपर्यंत डोंगर, जंगल यामधून जाणार्‍या वाटेवर घाटपांडेंनी मुतालिक किंवा गुमास्ते (Agent) म्हणजे पेशकार नेमलेले असत. या सर्वांकडून व्यवस्थितपणे काम करुन घेण्याची जबाबदारी बाकी पूर्णतः या घाटपांडेंची असे.


पथकी किंवा पतकी व पानसरे -


       घाटवाटेवरील व्यापार्‍यांच्या संरक्षणाची जबाबदारी यांची असे. हे देखील शस्त्र चालवण्यात चांगलेच पारंगत असत. या पथकींच्या पदरी 'गुजर' संरक्षक असत. या पथकींनी आपापले गुजर लोक घेऊन कोणाच्या चौकीपासून कोणाच्या चौकीपर्यंत व्यापार्‍यांना संरक्षण देऊन पोचवायचे हे ठरलेले असे. क्वचित प्रसंगी यांच्याकडे जकातीचे मिरासपण असे. (मिराशी म्हणजे पुर्वापार आलेला वाटा किंवा तो वाटा कबुल करणे. मिरासदार होणे म्हणजे परंपरागत हक्काची वहीवाट असणे.) वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या जकातीच्या नियमांत देखील फरक असे. पथकी आणि पानसरे जसे मार्गातील संरक्षक तसेच व्यापार्‍यांचा जिथे तळ असे तिथल्या संरक्षणाची जबाबदारी बिडवे अथवा बिडवईंची असे.


बिडवे अथवा बिडवई -


       बिडवई हा मुख्यतः बाजारपेठेतला अधिकारी. यांच्याकडे व्यापार्‍यांच्या कुळाची यादी असे. घाटपायथ्याला आणि घाटमाथ्यावर व्यापार्‍यांचा जो तळ असे, त्या तळाच्या संरक्षणाची जबाबदारी या बिडवे अथवा बिडवईंची असे. याच्याकडे व्यापार्‍यांच्या कुळांची यादी असे. ती यादी बिडवेंना घाटपांडेंना  द्यावी लागे. तसा सरकारी हुकूम घाटपांडेंकडे असे. काही पत्रांत बिडवईंच्या वरचा अधिकारी म्हणून सर-बिडवई असाही बऱ्याच कागदपत्रांत उल्लेख येतो.


मोढवे अथवा मोढवी -


       यांच्याकडे घाटदुरुस्तीची व्यवस्था असे. त्यासाठी पाथरवट नेमणे, त्यांचे पगार ठरवणे, त्यांच्याकडून योग्य प्रकारे आणि ठरलेल्या वेळेत ते काम पूर्ण करुन घेणे या सर्व गोष्टींची जबाबदारी या मोढव्यांची असे. हे शस्त्र चालवण्यात देखील पारंगत असावेत. यांचा काही ठिकाणी नाईक वा नायकवडी असा उल्लेख आढळतो.


सभासद -


       घाटामधील जकात हा स्वतंत्र महाल म्हणजे विभाग असे. त्यावर सभासद नावाचा सर्वोच्च अधिकारी असे आणि त्याच्याकरवी "रहदारीविषयी लष्करी अधिकार्‍यास, 'वाणी लोकांस उपसर्ग न द्यावा' म्हणून 'वाणीयांस परमुलखी पाठवावयास अभयपत्रे' म्हणजे 'परवाने' हा सभासद देत असे.

     जकातही एकूण दोन प्रकारच्या असत. घाटवाटेसाठी घाटजकात तर बाजारासाठी बाजार किंवा पेठजकात. दोन्हीसाठी जकातीचे दरही वेगवेगळे असत. बाजार जकात ही अतिशय बारकाईने घेतली जाई. कोणत्या वस्तूवर किती बाजार जकात घ्यावी याच्या १०० वस्तूंची यादीच शि. च. सा. खं. ५ मधे दिलेली आहे. पण बाजार जकातीसारखी घाट जकात मात्र इतक्या बारकाईने घेतली जात नसे. घोडे, गाढव, बैल, खांदाडे, डोई ओझे म्हणजे सिरभारी, गोणी, दिंडे, कापड अशा ठोक मापाने ती घेत. तरी त्यात भुसार माल, बंदरी माल, कापडमाल, कडबा गवत या पद्धतीने घाट जकातीचा आकार आकारला जाई. त्यातही देशी-परदेशी असा भेद केला जाई. देशी म्हणजे स्व-मुलूखातले तर परदेशी म्हणजे दुसर्‍याच्या मुलूखातले. दोन्हीच्या जकातीच्या दरातही फरक असे. देशी-परदेशी शब्द जिथे वापरले गेले आहेत तिथेच 'आपल्या महालावरुन परमहालांत जातील' असा शब्दप्रयोग आलेला आहे. काही ग्रंथात जकातीच्या दरात घाटचे व कोकणचे जिन्नस असाही फरक केलेला आहे. या घाट जकाती पुढे पुढे मक्त्याने किंवा पाच वर्षांच्या मुदतीने देत. थोडक्यात आताच्या भाषेत सांगायचं झालं तर 'टेंडर काढून वसूलीचे पाच वर्षांचे कंत्राट' दिले जाई. पेशवाईच्या काळात काही ठिकाणी दुअमली जकातीच्या उल्लेख आला आहे तो 'वरघाट-तळघाट' या भेदाने सांगितला आहे. ज्याचा उल्लेख तिसऱ्या भागात आलेला आहेच.

       घाटपांड्यांच्या अधिकारांत राहून सभासदाने रस्ते दुरुस्त राखण्याबद्दल आणि वाहतूक करणार्‍यांची सुरक्षितता सांभाळण्याकरिता व्यापाऱ्यांकडून चौत्र्यावर जकात वसूल करण्याचे काम असे. त्यासाठी ठराविक पैशाच्या रुपाने म्हणजे 'दाम' स्वरुपाने ती जकात व्यापार्‍यांकडून घेतली जाई. सर्व चौत्र्यामधे मुख्य चौत्रा उंबरे गावचा होता. तेथील उत्पन्न नऊ लाखापर्यंत होत असल्यामुळे त्यास 'नवलाख उंबरे' नाव रुढ झाले होते, ते अद्यापही रुढ आहे.
       शिवकाळात घाटातील मेटांवर म्हणजे चौक्यांवर वेगळी जकात घेऊ नये अशी सक्त ताकीद असे परंतु घाटातील देवतांना प्रसन्न करण्यासाठी काहीसा स्वतंत्र आकार घेतला जाई. पार घाटात मालाप्रमाणे दोन रुक्यांपासून बारा रुक्यांपर्यंत घाट जकातीचा आकार घेत पण घाटातल्या 'रामवरदायीनी' म्हणजेच 'श्रीरामवरदायीनी' या देवतेसाठी बैली एक रुका जादाचा घ्यावा असा उल्लेख आला आहे.
 
कोकणातल्या किनेश्वरहून सुरू होणारा पारघाट पार गावात संपतो. या घाटवाटेची पदरातल्या पारला एक चौका/चौकी होती. घाटमाथ्यावरच्या शिंगोट्यास (महाबळेश्वर) येण्यासाठी पार घाटवाटेला पुढे रडतोंडी वा अश्रूमुखीचा घाट जोडलेला होता. या रडतोंडी घाटवाटेत मेटतळ्याला एक चौका/चौकी होती. पारचे आणि मेटतळ्याचे मेटकरी हे दोघे एकच म्हणजे दिवाणचे चाकर होते. पण महाबळेश्वर-पाचगणी दरम्यानच्या मेटगुताडला पुर्वापार चालत आलेले बहुळकर मेटकरी होते. त्यांना बैली १ रूक्याप्रमाणे वेगळी जकात द्यावी लागे.

अफजलखानाचा वध केल्यानंतर जावळीची आर्थिक घडी बसवताना महाराजांनी जकात वसूलीचे पूर्वापार चालत असलेले अधिकार तसेच चालू ठेवले.

       व्यापारी लोकांची काळजी, शेतकरी कुळांबद्दल ती कुळे गावातून जाऊ नयेत या बद्दल जशी घेत त्याहुनही अधिक घेतली गेली आहे. इ.स. १६५४ मधे शिराळे येथील शेट्ये महाजन, बकाल वाणी व्यापारी आणि डांगी पतकी यांस 'सुखाने या मार्गे तुम्ही या, कसलाच उपसर्ग पोचूं देणार नाही' असे अभय देताना चंद्रराव मोरे म्हणतात की 'तागसडा गमावला तरी सोनेचा करुन देऊ' यावरुन एकूणच घाटवाटेवर संरक्षणाची व्यवस्था किती सक्षम असेल याची कल्पना येते.
       देशी आणि परदेशी मालाच्या जकातीच्या फरकाबद्दल अजून एक उल्लेख शिवकाळात सापडतो. शिवाजी महाराज स्वदेशात उत्पादन होणाऱ्या मालाला बाजारपेठ मिळावी याकरिता किती जागरूक होते हे यावरून दिसून येते. या बाबतीत शिवाजी महाराजांनी कुडाळच्या सरसुभेदाराला लिहिलेलं एक अस्सल पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगीजांच्या गोव्यातील बारदेश भागात उत्तम प्रतीचे मीठ तयार होत असे आणि त्याचा भावसुध्दा स्वराज्यात तयार होणाऱ्या मीठापेक्षा कमी असे त्यामुळे साहजिकच पोर्तुगीजांचेच मीठ देशावर मोठ्या प्रमाणावर विकले जात असे. त्यामुळे कोकणात तयार होणाऱ्या मीठास मागणी येईनाशी झाली. मिठागरे बंद पडून मीठावरील जकातीचे उत्पन्न कमी झाले. यावर इलाज म्हणून महाराजांनी बारदेश मधून आयात होणाऱ्या मीठावर जबरदस्त जकात बसवली जेणेकरून देशी व आयात केलेल्या मीठाच्या किमतीत नाममात्र फरक राहिला. त्यामुळे देशी मीठ मोठ्या प्रमाणात विकले जाऊ लागले.




🚩 🚩

       वर उल्लेखलेल्या 'जकात' या विषयाखेरीज घाटवाटांच्या साखळीतील बंदरांची, संरक्षक किल्ल्यांची, सराया किंवा राहण्याच्या ठिकाणांची प्रशासन व्यवस्था, घाटवाटांचा इतिहास आणि घाटवाटांच्या मदतीने घडून गेलेला युद्धेतिहास हाही लेखांचा स्वतंत्र विषय होऊ शकेल. त्या त्या विषयातल्या अभ्यासू मंडळींनी यावर विस्तृत लिखाण जरूर करावं. या लेखमालेत ऐतिहासिक दस्तऐवजात आलेल्या घाटवाटांची यादी आणि घाटवाटा संदर्भातील पत्रेही येथे देता आली असती पण केवळ विस्तारभयावह ती देण्याचे टाळले आहे.
       हा लेख फक्त घाटवाटा व त्यांची डोळस भटकंती इतक्याच मुद्द्यांवर केंद्रीत असल्याने सर्वच मुद्दे एकाच वेळी लिहिणे येथे शक्य झालेले नाही. 'भूगोल' आणि 'डोंगरयात्रा' या विषयाशी निगडीत खाली दिलेल्या आणि त्या व्यतिरिक्तही अनेक मुद्द्यांवर विस्तृत लिखाण करता येईल इतका या घाटवाटांचा आवाका मोठा आहे.

१) जुन्या व्यापारी शहरांकडे जाणाऱ्या वहीवाटा/मार्ग. अशा मार्गांवर असलेल्या घाटवाटा झूमआऊट केल्या की त्यावर असलेली साखळी म्हणजे बंदरे-लेणी-सराया-चौकी-चौत्रा-दुर्ग आणि पाणी व्यवस्था.

२) माथ्यापासून पायथ्यापर्यंत बदलत जाणारे निसर्ग आणि भू वैविध्य - झाडे, प्राणी, पक्षी, फुलपाखरे, सडे, डोंगरदऱ्या, मृदा वगैरे.

३) घाटवाटा आणि त्यामधील निसर्ग संवर्धन - चिंता, आव्हाने, आवाहन.

४) घाटवाटांच्या परिसरात सध्या असलेली धरणे आणि जलाशय.

५) घाटवाटांमधले पाणवठे आणि त्यांचे संवर्धन. 

६) दोनदोन-तीनतीन दिवसांचे डोंगरयात्रा पध्दतीचे घाटवाटा ट्रेक्स.

७) घाटवाटांची नावे, एकाच घाटाची दोनदोन - तीनतीन नावे. उदा दार्‍या- भोरांड्याचे दार, भोरदाऱ्या-एकतंगडी

८) घाटवाटांचे ट्रेक्स का करावेत आणि ते करत असताना सदस्यसंख्या किती असावी?

९) ऐतिहासिक साधनांत उल्लेख आलेल्या आणि कालानुरूप तयार झालेल्या वाटांचा शोध - स्थानिक, जी.पी.एस.

१०) स्थानिकांच्या बोली भाषेतील वाटा / खाणाखुणा सांगताना वापरलेले शब्द, स्थानिकांचे/ वाटाड्यांचे संपर्क क्रमांक.

११) सध्या चालू असलेल्या आणि बंद पडलेल्या लहानमोठ्या घाटवाटांची, वरघाट-तळघाट अशी भेदाभेद असलेली आणि पायवाट, घोडवाट, गाडेवाट आणि सैन्यवाट अशी वर्गीकरण असलेली जिल्हावार अद्ययावत यादी. 

१२) घाटवाटा नामशेष न होण्यासाठी स्थानिकांमधे केलेली जागरूकता. 

१३) घाटवाटांच्या माथ्यावरील आणि पायथ्याशी असलेल्या गावात पोहचण्याचे रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि त्यांचे संपर्क क्रमांक, मुख्य गावापासून असणारे अंतर आणि पोहोचण्यासाठी लागणारा वेळ.

१४) घाटवाटांच्या डोंगरयात्रांसाठी आवश्यक साधनसामग्री. (Equipment)

१५) घाटवाटेत असलेले सुळके (बाहुली, दाऱ्याची लिंगी, कुईरानाचा कापरा, शेंडी, नावजी वगैरे)

१६) पावसाळ्यात घाटवाटा कराव्यात की नाही? केल्यास कोणत्या किंवा कोणत्या करू नयेत. ते करताना असणारे संभाव्य धोके.

१७) घाटवाटांच्या लूप ट्रेक्सची सुरूवात माथ्यावरून करावी की कोकणातून? घाटवाटांच्या लूप ट्रेकसाठी वाटांची निवड.

१८) घाटवाटांच्या ट्रेक्सचे प्लॕनिंग

१९) घाटवाटांच्या ट्रेक्समधे अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी संपर्क क्रमांक.

       अनुभवी, अभ्यासू मंडळी आणि संशोधकांनी 'घाटवाटा' या विषयावर आवर्जून लिखाण करावं की जे पुढील पिढीला नक्कीच उपयुक्त ठरेल. सध्याच्या काळात वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यामुळं बहुतेक घाटवाटा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्रकारच्या लिखाणामुळं घाटवाटांचा 'माफक' प्रमाणात का होईना पण वापर वाढेल आणि त्यामुळे काही वर्षांपूर्वी सह्याद्रीपुत्रांची 'लाईफलाईन' असलेल्या ह्या घाटवाटा टिकून राहण्यास नक्कीच मदत होईल.

       अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की घाटवाटांची इत्यंभुत माहिती मिळाली तरीसुद्धा या प्रकारच्या डोंगरयात्रा अनुभवी, उत्तम स्टॕमिना आणि चांगलं ट्युनिंग जमलेले सोबती बरोबर असल्याशिवाय कधीही करु नयेत.

       या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असा माझा अजिबात दावा नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे किंवा कागदपत्रांची जी शोधाशोध केली आहे त्यावरून मिळालेल्या माहितीवर हा लेख बेतला आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा जाणवल्यास किंवा माहितीमध्ये बदल करावयाचा असल्यास जरूर कळवा.

       घाटवाटांबद्दल अजूनही काही विषयांवर ससंदर्भ लिहिण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल आणि अशी शक्ती देण्यासाठी सह्याद्री त्यावेळीही पाठीशी नक्कीच उभा राहील. आपणास ही दिलेली माहिती नक्कीच आवडेल अशी आशा करतो.

बहुत काय लिहिणे, अगत्य असू द्यावे ll

सरतेशेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.

सावधचित्ते शोधावे l
शोधोनी अचूक वेचावे ll
वेचोनी उपयोगावे l
ज्ञान काही ll

लेखनसीमा ll

🚩 🚩

फोटो सौजन्य --

१) निनाद बारटक्के
२) मंदार दंडवते
३) जितेंद्र परदेशी
४) संजय तारू
५) सुजय पुजारी
६) अमोल तळेकर
७) गुगल

संदर्भ --

१) कविराज भूषण विरचित 'श्री शिवा बावनी'
२) शिवभारत - कविंद्र परमानंद
३) ९१ कलमी बखर - मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनविस
४) जावळीकर मोर्‍यांची छोटी बखर
५) सह्याद्री - स. आ. जोगळेकर
६) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
७) शिवराजमुद्रा - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन.
८) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स.
९) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
१०) विकीपिडीया ( List Of Peaks In The Western Ghats)
११) मराठी राजवटीतील काही घाटमार्ग व चौक्या - भा. इ. सं. मं. स्वीय ग्रंथमाला क्र. ८६. लेखक - शंकर नारायण वत्स जोशी
१२) ऐतिहासिक संकिर्ण साहित्य खंड - ४
१३) मराठ्यांच्या इतिहासाची साधने - खंड आठवा - इतिहाचार्य वि. का. राजवाडे
१४) शिवकालीन पत्र-सार-संग्रह खंड तिसरा, पत्र क्र. २५९९, २६६७

🚩 🚩



२ टिप्पण्या:

  1. दिलीपदादा खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेख. भविष्यकालीन भटकंतीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल

    उत्तर द्याहटवा