गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

"शिवप्रभुंच्या अप्रतिम युद्धकौशल्याची गाथा सांगणारी डोंगरयात्रा"

"शिवप्रभुंच्या अप्रतिम युद्धकौशल्याची गाथा सांगणारी डोंगरयात्रा"



शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।


       छत्रपती शिवाजी महाराजांविषयी समर्थ रामदासांनी जे समर्पक उद्गार काढले आहेत, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी रविवारी २० आॕगस्टला "महाबळेश्वर ते प्रतापगड" अशी एक डोंगरयात्रा आयोजिली होती...

       निमित्त होतं शिवप्रभुंच्या अप्रतिम युद्धकौशल्याच्या आणि शौर्याच्या आठवणी जागवण्याचं. तेही त्याच कर्मभुमीत जिथे स्वराज्यावर आलेलं संकट त्यांनी यशस्वीपणे परतून लावलं.

       युद्धशास्त्रानुसार आपले उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेले रणक्षेत्र निवडून काढणे व तेथे शत्रूशी लढाई देणे हे सेनापतीचे मुख्य काम व युध्द शास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने ते साधून घेतले ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. राजकारणाचा युध्दकौशल्याशी किती व कसा निकटचा संबंध असतो त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
       निबीड जावळी महाराजांनी पौष वद्य चतुर्दशी, शके १५७७ म्हणजेच मंगळवार, १५ जानेवारी १६५६ रोजी चंद्रराव मोरे याचा पाडाव करून ताब्यात घेतली (१). खरंतर ही अफजलयुद्धाची नांदीच होती. तिथे असलेल्या महाबळेश्वर समोरच्या भोरप्याच्या डोंगरावर महाराजांनी किल्ला बांधण्याची मोरोपंतांना आज्ञा केली (२) आणि या गडाचं नामकरण केलं गेलं 'किल्ले प्रतापगड'.
       किल्ला बांधून पुर्ण झाल्यावर शिवाजी महाराज स्वतः प्रतापगडावर गेले आणि भवानी मातेची प्रतिष्ठापना केली. दरम्यान सईबाई निवर्तल्याने महाराजांना अचानक राजगडावर जावे लागले पण तोपर्यंत अफजलखान वाईत येवून पोहोचला होता. अफजलखानास आदीलशहाने स्पष्ट शब्दात आज्ञा केली होती की,'शिवाजीस जिवंत पकडून आणावे, मारुन टाकावे वा बोलणी करुन त्याचा नाश करावा'(३). अशा आलेल्या आज्ञेवरून आता अफजलखानाकडे युद्धाशिवाय पर्याय उरलेला नव्हता. आता शेवटचा एक प्रयत्न म्हणून अफजलखानाने महाराजांची भेट व्हावी याकरीता कसोशीने प्रयत्न केले. अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर महाराजांना पहील्यांदा भेटला आणि या दोघांची भेट झाल्यावर महाराजांनी खानास भेटण्याचे नक्की केले आणि तसा निरोपही खानाकडे पाठवला. कृष्णाजी भास्कराने भेट नक्की झाल्याचे सांगितल्यावर अफजलखानाने म्हटले की,'भेट राजे घेतात हे सिद्ध करुन आलात हेही मोठी गोष्ट केली'(४). अफजलखानाच्या दृष्टीने महाराजांना पकडण्याच्या उद्देशाने ही गोष्ट आवश्यकच होती. त्या दृष्टीने वकीलांची ये-जा सुरु झाली. अफजलखान कोणत्याही परीस्थितीत जावळीत यावा आणि खानाचा अंतस्थ हेतु जाणुन घेता यावा यासाठी महाराजांनी आपले वकील पंताजी गोपिनाथ बोकील यांस पुढील बोलणी करण्यासाठी वाईस पाठवले.
भेटीच्या अटी ठरल्या आणि त्यानुसार अफजलखान प्रतापगडास येण्यासाठी साधारण १ नोव्हेंबरला सोबत जवळजवळ ०५ ते १०००० पायदळ सैन्य घेऊन वाईहुन निघाला. खान वाईहुन कृष्णानदीच्या काठाने चिखलीपर्यंत दोन दिवसात आला. तिथुन पुढे तायघाटाने (५) चढुन महाबळेश्वर पठारावर आला. आजही आपल्याला पाचगणीच्या पुढे तायघाट हे गाव पहायला मिळते. पुढच्या दोन दिवसात शिंगोटे (म्हणजेच महाबळेश्वर) आणि पुढच्या दोन दिवसात रडतोंडी ऊर्फ अश्रुमुखीच्या घाटाने म्हणजे ६ नोव्हेंबरला पार, कुंभरोशी व दुधोशी या गावात ससैन्य पोहोचला. तिथे त्याने आपली छावणी टाकली. या प्रवासात त्याचे सैन्य एकंदरीत ४०० मीटर तायघाट चढले आणि साधरणपणे तेवढेच रडतोंडी घाट उतरले. ही संपुर्ण वाट अतिशय चढ-उताराची आणि जंगलातुन आहे. पण महाराजांनी रस्ता केल्याचे उल्लेख आहेत. (६) रस्ता करण्याच्या नावाखाली महाराजांनी आपले लोक रस्ताभर पेरले. त्या लोकांनी झाडे पाडून आजूबा़जूच्या वाटा बंद केल्या आणि आपल्या सैन्यासाठी लपण्याच्या जागा तयार केल्या. पावसाळा नुकताच संपल्याने झाडीही मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि रस्ताही निसरडा झालेला होता. जंगलात असणाऱ्या वळणदार रस्त्यांंमुळे संपुर्ण सैन्य एकमेकांना पाहु शकत नव्हते.
       पारला कोयना नदीकाठी मोठी सपाटी आहे जिथे छावणीचे तंबु उभारण्यास जागा आहे. प्रतापगड परीसरात अन्य कुठेही अशी जागा सापडत नाही. बाजूलाच कोयना नदी वाहत असल्याने पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याचाही प्रश्न येणार नव्हता. जेधे करीण्यासह जवळजवळ सर्व मराठी साधनात 'पारचे लष्कर बुडवणे', 'पारवरुन सैन्यास प्रतापगडावर येऊ न देणे' असे उल्लेख आहेत. पारवरुन अफजलखान 'जंजिऱ्या'च्या सिद्धीशी, सरवरखानाच्या वासोटा भागातल्या सैन्याशी आणि दाभोळच्या सैन्याशी संपर्क साधु शकत होता. पारची जागा सर्व प्रकाराने योग्य असल्याने अफजलखानाने पारलाच आपली छावणी टाकली. मुख्य छावणी जरी पारला असली तरी एक तुकडी अफजलखानाने वाडा-कुंभरोशी परीसरात ठेवलेली होती, जी वेळप्रसंगी प्रतापगडावर पिछाडीवरुन हल्ला करु शकेल आणि वेळप्रसंगी जावळीवरही हल्ला करुन प्रतापगड ते राजगड हा मार्ग बंद करु शकेल किंवा राजगडावरुन येणारी मदत थोपवू तरी शकेल.
       वाई ते प्रतापगडच्या संपुर्ण रस्त्यात, छावणीच्या ठिकाणी महाराजांनी खाण्या-पिण्याची अतिशय चांगली व्यवस्था ठेवली होती(७). कोयना नदीत भरपुर पाणी होते, रस्ता तयार करताना तोडलेल्या झाडांचे सरपण होते, जनावरांसाठी भरपुर गवत होते. अगदी मांसाहारही उपलब्ध करुन दिला होता. त्यामुळे खानाचे सैन्य निष्काळजी झाले. या सर्व सुविधा महाराजांनी केवळ आपल्या उद्देशपुर्तीसाठीच पुरवल्या होत्या.
नंतर जी लढाई लढली गेली ती सर्वांनाच माहीती आहे. पण ही लढाई लढण्यासाठी अफजलखान ज्या मार्गावरुन पारला आला त्या ऐतिहासिक मार्गाचा एक अवघड आणि महत्वाचा टप्पा आम्ही सर्वजण चालून जाणार होतो. आम्ही नक्की कोणत्या भागात जाणार होतो, तेथे नेमके काय घडलेय, मुख्य लढाई ज्या भागात लढली गेली तिथे चालताना कोणकोणत्या गोष्टी पहायच्या, घाटाचे भौगोलीक स्थान, पारच्या छावणीचे ठिकाण वगैरे ट्रेक करताना नीट समजावं यासाठी सर्वांना या विषयी पुर्वकल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे आम्ही सर्वजण त्या दिवसाची उत्कंठेने वाट पहात होतो...


       ...आणि तो दिवस अखेरीस उजाडला.⁠⁠⁠⁠ कधी नव्हे ते वेधशाळेचा अंदाज खरा ठरला होता. रात्रीपासुनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. KSB चौकातल्या पहिल्या स्टॉपवरून सकाळी साडेपाच वाजता बस सुटणार होती आणि तिथे बसणारे तिघे राजगुरुनगरहुन येणार होते. पण ट्रेकला येणारे सर्वजण हाडाचे ट्रेकर्स असल्याने कुणासाठी बस स्टॉपवर अशी थांबवावी लागलीच नाही. त्यामुळे सर्वांना घेऊन सात वाजता आम्ही पुण्याबाहेर पडलोही होतो. सात म्हणजे थोडा उशिरच झाला होता खरा पण हा ट्रेक सोपा आणि कमी चालण्याचा असल्याने तसा फारसा काही फरक पडणार नव्हता. महामार्गावरच असलेला चेलाडीचा कोसमिनार, शिरवळची पाणपोई वगैरे पहात पहात शेवट सुरुरला थांबुन सोबत घेतलेल्या मिसळीवर यथेच्य ताव मारला.




       वाईहुन पसरणीचा घाट चढताना उजव्या बाजुला पांडवगड स्वच्छ दिसत होता. घाटाखालचं शाहीर साबळें आणि बी.जी. शिर्केंचं पसरणी, त्यामागे धोम धरणाच्या पार्श्वभुमीवर कमळगड, वऱ्हाडा डोंगररांग आणि त्याचे हत्ती, वाजंत्री, नवरा, नवरी-करवली सुळके स्पष्ट दिसत होते. पाचगणी नंतर तायघाट, त्याच्या पायथ्याचं चिखली, प्रतापगडाची चौकी असलेलं पाचगणी-महाबळेश्वर दरम्यानचं मेटगुताड वगैरे बसमधुनच पहात कुठेही न थांबता महाबळेश्वरचा सनसेट पॉईंट म्हणजेच बाँबे पॉईंट गाठला त्यावेळी अकरा वाजले होते. आता इथुन आमच्या ट्रेकची खरी सुरुवात होणार होती. सोबतची बसही थेट प्रतापगडला निघुन गेल्याने आता परतीचे दोरही कापुन टाकले गेले होते.



       वातावरण अतिशय सुंदर होते. सर्वत्र ढग पसरलेले होते आणि पाऊसही फारसा नव्हता. रडतोंडी घाटातले घडीव दगड निसरडे झाल्यामुळे फारच सावधगिरीने उतरावं लागत होतं.


       पहिला वळणावळणाचा टप्पा पार करुन महाबळेश्वर-पोलादपुर मार्गावर आलो. सर्वसाधारणपणे या घाटाला आंबेनळीचा घाट असं म्हटलं जातं. पण महाबळेश्वरपासून वाडा-कुंभरोशीपर्यंतचा हा रस्ता ब्रिटीशांनी स्वातंत्र्यपुर्व काळात बांधला आणि या घाटाला त्यांनी 'फिट्झेराल्ड' असं नाव दिलं. शिवकालात महाबळेश्वरपासुन प्रतापगडपर्यंत येण्यासाठी फक्त दोन घाट होते, एक रडतोंडीचा आणि दुसरा दरे गावात उतरणारा निसणीचा. त्यामुळे हल्ली आपण महाबळेश्वरहून पोलादपुरला जाण्यासाठी दोन घाट वापरतो. पहिला फिट्झेराल्ड आणि दुसरा आंबेनळी. या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत थांबून लढाई आणि युद्ध यांच्यातील फरकाची, महाराजांनी अफजलखानाविरूद्ध गनिमीकावा युध्दतंत्राला आवश्यक असणाऱ्या युद्धक्षेत्राची कशी निवड केली याची थोडक्यात माहीती दिली आणि प्रतापगडच्या दुसऱ्या चौकीच्या गावात मेटतळेला पोहोचलो.



       गावातल्या मंदिराच्या बाजूने पुढे गेल्यावर दुसऱ्यांदा पोलादपुरचा रस्ता ओलांडला आणि पुढे पारच्या दिशेला निघालो.


       शिवकाळात बांधलेल्या रडतोंडी घाटाच्या पुसटशा खुणा अद्यापही दिसत होत्या. एकतर घाटरस्ता अतिशय रुंद होता त्यातही गरजेच्या ठिकाणी बांधलेल्या पायऱ्या, दरीकडील बाजुला बांधलेली संरक्षक भिंत, वळणावर सहजपणे वळता येईल असे घडीव दगडांनी बांधलेले टप्पे सर्वच बांधकाम अभुतपुर्व होतं. साडेतीनशे वर्षांपूर्वीसुध्दा मराठ्यांचं बांधकाम तंत्रज्ञान एवढं प्रगत असलेलं पाहुन सोबत असलेल्या एक सिव्हील इंजिनियर मॅडमही थक्क झाल्या.





अर्धा घाट उतरल्यावर वाट दाट जंगलात शिरली.



       पावसाचे दिवस असल्याने एका सोबत्याला दगडावर जळु दिसली. त्याने ती सर्वांना बोलावून दाखविली आणि मग लक्षात आलं की बरोबरीच्या काही जणांच्या अंगालाही त्या चिकटलेल्या आहेत. कुणाच्या बुटात तर कुणाच्या पँटमधे. बऱ्याच जणांना हा अनुभव नविन असल्याने त्यांची एकच तारांबळ उडुन गेली. जळु काढण्यासाठी मग कुणाची तंबाखुची तर कुणाची काडेपेटीची शोधाशोध सुरु झाली.


       आल्हाददायक वातावरण असल्याने थकवा जाणवतच नव्हता. साधारण अडीच तासाची पायपिट करुन घोगलवाडीच्या डांबरी रस्त्यावर पोहोचलो. इथं उजवीकडे वळून पुढल्या पंधरा मिनीटात शिवाजी महाराजांनी बांधलेल्या? कोयना नदीवरील पुलापाशी पोहोचलो. साडेतीनशे वर्षानंतरही शेकडो वाहने त्याच्यावरुन जाऊन सुद्धा पुल जशाचातसा आहे. पुल बांधुन झाल्यावर महाराजांनी पुलाच्या एका बाजूला 'No Entry' चा बोर्ड लावलेला होता की काय कोण जाणे कारण खान या पुलावरून आला तो परत गेलाच नाही. बहूदा तो Trafic Rules कसोशीने पाळत असावा.


       हाच रस्ता पुढे सरळ पार गावात जातो. स्थानिक लोक याला पार्वतीपुरही म्हणतात. इथे रामवरदायीनी देवीचे चांगले प्रशस्थ मंदीर आहे. मंदीराजवळून कोयना नदी वाहते. मंदीराच्या आसपास बरीच सपाट जागा आहे. अफजलखानाचा तळ बहूदा याच भागात असावा. मंदीरात वरदायीनीची आणि रामवरदायीनीची अशा दोन अतिशय सुरेख मुर्ती आहेत. या मंदीरातल्या पुजाऱ्यांनी आम्हाला दोन अनोख्या शिवकालीन वस्तु दाखवल्या. त्यात एक होता दांडपट्टा, जो आम्हाला प्रत्यक्ष हातात घेऊन बघता आला आणि दुसरी वस्तु होती ती म्हणजे मुद्रा. पण ती पुजेत असल्याने हातात घेऊन पाहता आली नाही. त्यावर mirror image मधे काहीतरी कोरलेले होते. त्या मुद्रेचा शिक्का त्यांनी कागदावर मारुन दिला असता तर माझ्या अभ्यासक मित्रमंडळींना थोडे कामाला लावता आले असते. पण त्यासाठी ट्रस्टींची परवानगी आवश्यक होती. एकतर आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि त्यासाठी येण्याचं प्रयोजन. मंदीराच्या गाभाऱ्यातले फोटो काढायला परवानगी नसल्यामुळं तेही काढता आले नाहीत. त्यामुळे तिथे फार वेळ न काढता प्रतापगडाकडे मार्गस्थ झालो.





       आतापर्यंत चारशे मीटरचा उतार उतरुन झाला होता. आता प्रतापगडचा साधारण तेवढाच चढ चढायचा होता. सकाळची मिसळ तर केव्हाच जिरली होती. हळूहळू भुकेची जाणीव होवू लागली होती. इथुन पुढचा चढ खुपच खडा होता. अफजलखानाच्या पालखीचे भोई खानाचा बोजा घेऊन कसेकाय चढले असतील देवजाणे. त्याच्या बरोबरीचं सैन्य एवढं चढुन आल्यावर काय लढणार? खरंच, महाराजांच्या कल्पकतेला मनोमन दंडवत घातलं. चढ चढुन बऱ्यापैकी वर आल्यावर वनखात्याचं बंद पडलेलं ऑफीस लागलं. त्याच्या पासुन हाकेच्या अंतरावर अफजलखानाची कबर होती. या कबरीचा विषय वादाचा असल्याने पोलीस कबरीच्या जवळपास फिरकू देत नाहीत. त्यामुळे बाजूच्या उतारावर असलेल्या चिंचोळ्या आणि निसरड्या वाटेवरुन प्रतापगडाच्या डांबरी सडकेवर यावं लागलं. सर्वजण तिथे येऊन पोहोचल्यावर तडक भवानी मंदीरासमोरील 'हवालदार की रसोई' गाठली. त्यांना आगाऊ कल्पना देऊन ठेवल्याने त्यांनी गरमागरम जेवण तयार करून ठेवलेलं होतं त्यावर यथेच्य ताव मारला. गडमाथ्यावर पोहोचल्यावर केलेल्या ट्रेकच्या मार्गाचं अवलोकन केलं आणि ट्रेकची सांगता केली ती परत पार ऊर्फ पार्वतीपुरला येऊन शिवकालीन मुद्रेचा अभ्यास करण्याच्या इराद्यानंच.

संदर्भ :-

१) जेधे शकावली
२) शि.च.सा.ख.-१०-पृ-५४
३) मुहम्मदनामा
४) बखरी
५) प.सा.सं.५६१
६) बखरी, शिवभारत
७) बखरी, जेधे करीणा



४ टिप्पण्या: