शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

पावसाळ्यात "किल्ले रतनगड ते हरिश्चंद्रगड"

पावसाळ्यात "किल्ले रतनगड ते हरिश्चंद्रगड"



सुरूवात...

       सप्टेंबर-ऑक्टोबर महिना म्हणजे पावसाळा संपल्या नंतरच्या ट्रेकींगच्या मोसमाची सुरुवात होण्याचा काळ. १० सप्टेंबरला नाखिंदा घाट, कोथळीगड आणि कौल्याच्या धारेचा पावसाळी ट्रेक संपवून घरी परतताना बसमध्ये जाहीर केलं की "०७-०८ ऑक्टोबरला 'आजोबा ऊर्फ आजा पर्वत' पाथरा आणि गुयरीदार अशा दोन घाटांसह करायचा आहे" त्यावेळी बसमधल्या प्रत्येकाने या ट्रेकला येण्याची तयारी दाखवली. पण हा ट्रेक अवघड प्रकारातला असल्यानं सर्वांना नेणं काही शक्य नव्हतं. अखेर मोजकेच सहभागी ठरले आणि त्या अनुषंगाने लगेचच व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सुद्धा तयार केला आणि चर्चांवर चर्चा सुरू झाल्या..!
       संपत आलेला पाऊस परतून आला आणि पुन्हा जोरात बरसु लागला. डेहण्यातले परिचित बाळकृष्ण पाटेकरांशी दर चारदोन दिवसांनी तिथल्या एकूण परिस्थितीबद्दल चौकशी सुरु होती. शुक्रवारी रात्री निघायचं होतं आणि मंगळवार आला तरीही अजून आमचं काही नक्की ठरत नव्हतं. त्या रात्री पाटेकरांना एकदा शेवटचा फोन केला. त्यांच्या म्हणण्यानुसार निदान दिवाळी पर्यंत तरी ज्या वाटेने आम्ही आजोबावर जाण्याचं ठरवलं होतं त्या वाटेने जाणं शक्य नाही. शेवटी आम्हाला आजोबाची योजना रहीत करावीच लागली.
       पावसाळ्यात आजोबासारखा अवघड ट्रेक यासाठी नको होता की, ज्या वाटेने आम्ही आजोबा चढून जाणार होतो तो पाथरा घाट म्हणजे अक्षरशः "ब्लेड एज" आहे. वारा जोरात वाहत असेल तर काहीही अडसर नाहीये. त्यातून वाटही खुप निसरडी आहे. त्यामुळे पाटेकर तिथले स्थानिक असूनही त्यांना त्या वाटेने जाता येऊ शकेल याचा भरवसा वाटत नव्हता. दुसरं कारण असं की, आमचा एकमेव मुक्काम जो आजोबा माथ्यावर मोकळ्या पटांगणात असणार होता तिथे रात्री पाऊस पडला तर काहीच निवारा नव्हता. जवळपास वस्तीही नाही जिथून आम्हाला स्वयंपाकासाठी सुकलेलं सरपण मिळू शकेल त्यामुळं आम्ही विनाकारण धोका पत्करणं टाळलं. त्यामुळे शेवटच्या क्षणाला 'रतनगड ते हरिश्चंद्रगड' या ट्रेकवर सर्वानुमते शिक्कामोर्तब केलं. रतनगड ते हरीश्चंद्रगड हा ट्रेक खरंतर आजोबाच्याच जवळपास आहे त्यामुळे हा पर्याय पावसात कितपत जमेल अशाही शंका निघाल्या पण हा ट्रेक पाऊस असला तरी करता येवू शकतो हे मला पक्कं माहिती होतं. दोन्ही किल्ले एकाच भागात असले तरी रतनगड ते हरिश्चंद्रगडला आजोबापेक्षा परिस्थिती थोडी वेगळी होती. एकतर बहुतेक वाटा सोप्या होत्या. वाटेत कुठंही मुक्काम करावा लागला तरी तिथं निवारा सहज मिळाला असता आणि प्रत्येक ठिकाणी सुकं सरपण किंवा वेळच पडली तर अगदी तयार जेवणही मिळू शकत होतं. बरं, अगदीच कोणत्यातरी छोट्या वाडीत जरी मुक्कामाची वेळ आली असती तरी त्या दृष्टीनं आधीच विचार करुन आम्ही रेशनही सोबत घेतलेलं होतं. पुर्ण ट्रेकमधे फक्त दोनच जागा अवघड वाटत होत्या, रतनगडापासून कात्राबाईची खिंड गाठणं आणि कुमशेतपासून पेठेची वाडी गाठणं. पहिल्या ठिकाणी दाट जंगल आहे तर दुसऱ्या ठिकाणी मुळा नदीच्या पात्रातून वाट आहे. नदी पात्रालगत असलेल्या पायलीच्या वाडीतून नदी ओलांडून चढाई करून पेठेच्या वाडीत जावं लागतं. इथं नदीला भरपूर पाणी असलं तर नदी ओलांडणं थोडं अवघड होऊ शकत होतं. सर्व शक्यता लक्षात घेऊन शेवटी आम्ही सर्वजण शुक्रवारी ०६ ऑक्टोबरच्या रात्री रतनवाडीसाठी मार्गस्थ झालो.


       नेहमीप्रमाणे नारायणगावच्या स्टँडसमोर मसाला दुध 'डबल मलई मारके' प्यायलो. नाशिक महामार्ग चारपदरी केल्यामुळे संगमनेरपर्यंतचा प्रवास खुपच सुखावह झाला. पण त्यामुळं झालेली वेळेची बचत संगमनेर ते रतनवाडी रस्त्यामुळं वाया गेली. हे जवळपास ऐंशी किलोमीटरचं अंतर कापून रतनवाडीला पोहोचायला सकाळचे पाच वाजले त्यामूळे आता झोपण्याचा प्रश्नच नव्हता. गाव हळूहळू जागं होत होतं. तिथल्याच एका घरात चहाची ऑर्डर दिली आणि तासाभरात सकाळची आन्हीकं उरकून बरोबर सहा वाजता ऑर्डर दिलेल्या घरात डेरेदाखल झालो.

आणि ट्रेक सुरू झाला...


       सकाळी लवकरात लवकर निघून रतनगड गाठायचा. फक्त गडदेवीचं दर्शन घ्यायचं आणि थोडं खाली उतरून उजवीकडे वळून पुढे जंगलातील वाटेने कात्राबाईची खिंड गाठायची. कात्राबाईचं दर्शन घ्यायचं आणि कुमशेत गाठायचं. वाटेत कुठेतरी चांगली जागा पाहून घरून नेलेला डबा खायचा आणि पुढे मुळा नदीच्या पात्रातली पायलीची वाडी गाठायची. पायलीच्या वाडीपासून पुढे मात्र हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी आमच्यासाठी दोन वाटा उपलब्ध होत्या. एक होती मुळापात्रातुनच जशी नदी जाईल तसं चालत जाऊन तडक पाचनईला चढायचं किंवा दुसर्‍या वाटेने नदी ओलांडून वरच्या बाजूस असणारी पेठेची वाडी गाठायची. पेठेच्या वाडीतून निघाल्यावर कलाडगडाच्या पायथ्यातून बेटाच्या नळीने किंवा बैलघाटाने थेट हरिश्चंद्रगडावर किंवा सरळ रस्त्याने चालत पाचनईला जायचं. अर्थात उपलब्ध वेळेनुसार आम्ही पुढची वाट ठरवणार होतो. या सर्वात जमल्यास कलाडगड पण पहायचा विचार होता. पण काहीही झालं तरी पाचनईतुन हरिश्चंद्रगडावरच जाऊन मुक्काम करायचा होता. त्यामुळं आजचा दिवस थोडा गडबडीचा होता.
       सकाळी चहा-बिस्कीटवर ताव मारला. पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या, ब्रम्हराक्षसाचे बंध पाठीवर करकचून आवळले, प्रवरा नदी पुलावरून ओलांडली अन् शेताच्या बांधावरून तडक रतनगडाकडे निघालो त्यावेळी घड्याळात सकाळचे साडेसहा झाले होते.



       धरणाच्या पाण्याशेजारून वाट हळूहळू चढत जात होती.



       जिकडेतिकडे सोनकी आणि तेरडा फुलला होता. हिरव्याकंच झाडोर्‍यातुन मध्येच पिवळा धमक तर मध्येच लालचुटूक फुलोरा उठुन दिसत होता.


       याआधी रतनगड सर्वांनी पाहील्यामुळं वाटेत फारसं कुठंही न थांबता तासाभरात वाटनाका गाठला. या नाक्यापासून उजवीकडे जाणारी वाट साम्रदला जाते. सरळ चढत जाणारी वाट गडावर जाते तर डावीकडची वाट कात्राबाईच्या खिंडीच्या दिशेने जाते. नुकत्याच उघडलेल्या नाक्यावरच्या हॉटेलात सॅक ठेवल्या आणि गडावरल्या रतनबाईच्या मंदीरात पोहोचलो. एकएक करत सगळे भीडू गोळा झाल्यावर सर्वांनी मिळून मस्तपैकी आरती केली.


       रतनगडाच्या 'सेल्फीच्या कड्यावर' जाऊन पुढील वाट बघितली. खालच्या बाजूला वाघतळं, त्याच्या बाजूला कात्राबाईची वाट आणि अगदी समोर अग्निबाण सुळका दिसत होता तर त्याच्यामागे कात्राबाईची खिंड जाणवत होती.





       सव्वानऊ झाले होते त्यामुळे हळूहळू भुकेची जाणीव होवू लागली होती. पुढच्या वीस मिनीटात धावतच वाटनाका गाठला आणि हॉटेलात लगेच चहाची ऑर्डर देऊन टाकली. दुपारच्या जेवणाला उशीर होणारच होता त्यामुळं घरातून सोबत आणलेल्या शिदोर्‍या सोडून भरपेट नाश्ता करुन घेतला वर फक्कड चहा मारला.


       या वाटनाक्यापासून हाकेच्या अंतरावर वाघतळं आहे. त्यात पाण्याच्या बाटल्या पुन्हा भरुन घेतल्या. इथून पुढं वाट चांगली प्रशस्त आणि मस्तपैकी जंगलातून होती. साम्रदपासून सुरू होणारी आणि पाचनईपर्यंत जाणारी ही वाट ब्रिटिशांनी तयार केली असावी. या याटेवर ब्रिटिशकालीन मैलांचे दगड पूर्वी पाहिल्याचं स्मरत होतं. चालत असताना असं काही सापडतंय काय याकडेही थोडं लक्ष होतंच. उजवीकडं दिसणारा अग्निबाण सुळका मागे पडला आणि कात्राबाईकडे जाणारी वाट शोधू लागलो. मध्ये बर्‍याच वर्षांचा काळ लोटल्याने या वाटेचा हमरस्ता झाला होता. वाट हळूहळू चढू लागली आणि खिंडीच्या नाळेला भिडली. आजूबाजूच्या खडकावर बहूदा खेकड्यांचं मॅटर्निटी होम असावं, हजारोंनी त्यांची पिल्ल सैरावैरा पळत होती. त्यांची संख्या इतकी होती की पाय पडून चुकून दोनचार पिले सहज मेली असती. आता चढ अतिशय खडा झाला. पाठीवर ओझं जास्त असल्यानं दर दहा मिनीटानी दम जिरवायला थांबावं लागत होतं.


       मजलदरमजल करत बारा वाजता कात्राबाईच्या खिंडीत पोहोचलो. म्हणजे वाटनाक्यापासून खिंड गाठायला जवळजवळ दिडतास गेला होता. एकंदरीत आमचा इथपर्यंतचा प्रवास तरी बराच वेगात झाला होता. जसा रतनगडाखाली वाटनाका होता तसाच इथंही होता. या खिंडीत डावीकडून एक वाट शेंडी-रतनवाडी रस्त्यावरच्या कोलटेंभे गावातून येते. आमचा ट्रेक रतनगड ते हरिश्चंद्रगड असल्यानं आम्हाला रतनगडावर जायचंच होतं त्यामूळं आम्ही रतनवाडीतून ट्रेक सुरु केला. नाहीतर कोलटेंभ्यातूनही तासाभरात कात्राबाईची खिंड गाठता येते. ही कात्राबाई खिंड घनचक्कर रांगेवर आहे जी मुख्य रांगेवरल्या कात्राबाई डोंगरापासून सुरू होऊन घनचक्कर, मुडा, गवळदेव करत शेवटी पाबरगडापाशी संपते. कोलटेंभे शेजारच्या दुसऱ्या डाव्या वाटेने याच रांगेवरून थेट पाबरगडापर्यंत जाता येतं. याच रांगेच्या एका छोट्या दक्षिण फाट्यावर आंबितचा भैरवगड वसलेला आहे. तिसरी उजवीकडील वाट जाते हाकेच्या अंतरावर असलेल्या कात्राबाई मंदीरात, तर सरळ खाली जाणारी चौथी वाट कुमशेतला. आता आम्ही प्रवरेच्या खोऱ्यातून मुळेच्या खोऱ्यात उतरणार होतो. कात्राबाई आणि त्याच्या बाजूच्या करंड्यामधून आपल्याला कळमंजाचा दरा घाटवाटेने कोकणातल्या डेहण्यात देखील उतरता येतं. खिंडीत बसून आजूबाजूच्या भूगोलाची उजळणी केली आणि कात्राबाईच्या मंदीरात गेलो.



       या खेपेला आमच्यातल्या एकानं नवीनच शक्कल लढवली होती. जिथं मंदीर लागेल तिथं आरती करायची. अर्थात ते सर्वांच्या पथ्यावरच पडलं होतं. आरती केल्यानं व्हायचं काय की, सर्वजण जमा होवून आरती करुन निघेपर्यंत सर्वांनाच आराम मिळे. त्यामुळं सगळा ग्रुपही एकत्र राही. कात्राबाईची आरती करुन निघायला सव्वाबारा झाले.



       आता नारायणरावही डोक्यावर आले होते आणि जंगलपट्टाही संपला होता. त्यामुळं इथून पुढचं चालणं त्रासदायक होणार होतं. एक बरं होतं की इथंपर्यंत बहुतेक चढ संपले होते. आता खिंडीतून थेट खाली उतरणारी वाट आम्हाला कुमशेतला घेवून जाणार होती.


       समोरच कुमशेत पठारावरचा 'वाकडी सुळका' दिसत होता. खिंडीपुढची कुमशेतला उतरणारी वाट खुपच भन्नाट होती. खिंडीतून पाहिल्यावर प्रथमदर्शनी असंच वाटत होतं की ही वाट खुपच अवघड असावी पण एकूणच ही वाट अशी काही उतरत होती की, ज्या कुणी अज्ञातानी ही वाट तयार केली असेल त्याला मनोमन साष्टांग दंडवत घातलं. हळूवारपणे वाट वाकडी सुळक्याच्या पायथ्यात उतरली होती. खालून उतरुन आलेल्या वाटेकडे बघितले तर आपण याच वाटेने उतरुन आलोय यावर विश्वासच बसेना. सह्याद्रीत अशा बर्‍याच गमतीजमती आहेत की ज्या सांगून कधीच समजणार नाहीत तर त्यांचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा.




       वाट आता पुर्णपणे सपाटीवर आली होती आणि तिचा रस्ता झाला होता. कुमशेतला पोहोचता पोहोचता दुपारचे दोन वाजले होते.



       मागे राहिलेल्यांकडून जेवायला थांबण्यासाठी हाका ऐकू येऊ लागल्या होत्या. एका झाडाखाली सर्वजण येईपर्यंत थोडावेळ स्टॉप घेतला. इथून मुळा नदीच्या खोर्‍यापल्याड पेठेची वाडी, कलाडगड आणि हरिश्चंद्रगड स्पष्ट दिसत होते. जेवायला या जागी थांबण्यापेक्षा अजून थोडं ताणलं तर मुळा नदीपात्र गाठणं सहज शक्य होतं. सर्वानुमते नदीपात्रातच थांबण्याचं ठरवलं. अकोलेकडे जाणारा डांबरी रस्ता सोडून वाट हरिश्चंद्रच्या दिशेने निघाली आणि हळूहळू करत नदीपात्रात उतरली. एक मस्त झाड बघुन जेवायला थांबलो त्यावेळी बरोबर तीन वाजले होते. जेवणासाठी सर्वांनी फारवेळ घालवलाच नाही. केवळ अर्ध्या तासात उरकतं घेत आम्ही सर्वजण साडेतीनला निघालोसुद्धा.
       आकाशात वीजा चमकू लागल्या होत्या. लांबवर कुठेतरी गडगडाटाचे आवाज ऐकू येऊ लागले होते. एकंदरीत पावसाचं लक्षण दिसत होतं. त्यामुळे सर्वांनी कॅमेरे आणि मोबाईल सॅकमधे टाकले. त्यामुळे इथून पुढं अगदी रात्रीच्या मुक्कामापर्यंत फोटो काही काढता आले नाहीत.
       आता पुढची वाट नदीपात्रातुनच होती. जशी नदी वळणं घेत होती तसंच तिच्या काठाकाठाने आमचं मार्गक्रमण चाललं होतं. एका वळणावर नदीपल्याड असलेल्या डोंगरावर पेठेची वाडी दिसत होती आणि तिच्या मागच्या बाजूला कलाडगडाचा माथा. पायलीच्या वाडीपर्यंत न जाता थोडं अलिकडूनच शॉर्टकट मारुन नदी ओलांडली. या भागात पाऊस थोडा कमी झाल्यानं नदीला पाणी कमी होतं म्हणून नदी ओलांडणं सहज शक्य झालं. चढाईला लागलो आणि दिवसभर दडी मारुन बसलेला पाऊस एकाएकी जोरानं कोसळू लागला. खरंतर पेठेची वाडी अगदी हाकेच्या अंतरावर होती पण गावात पोहोचेपर्यंत सर्वजण नखशिखांत भिजले. गावातल्या एका पडवीत पाऊस थांबायची वाट पहात असताना बाजूच्याच घरातून चहाची विचारणा झाली. अशा वातावरणात निदान चहाला तरी नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. दहाच मिनीटात वाफाळलेला बिनदुधाचा चहा समोर आला. पावसात तो चहा एवढा भारी लागत होता की प्रत्येकाने कमीतकमी दोनदोन कप चहा प्यायला. मग काय सगळ्यांच्या बॅटर्‍या एवढ्या चार्ज झाल्या की एका झपाट्यात कलाडगड मागे टाकला. कलाडला वळसा मारल्यावर हमरस्ता सोडून वाट डावीकडे वळून उतरु लागली. दोनचार चढ-उताराचे टप्पे पार करुन एकदाचे पुर्ण ओढ्यात उतरलो. या ओढ्यात एक अफलातून नजारा पहायला मिळाला. सांधणदरी जर पाण्याने वरपर्यंत भरुन वाहू लागली तर कशी दिसेल तशी एक साठ-सत्तर फुटांची कपार पाण्याने तडूंब भरुन वहात होती. कितीतरी वेळ हा नजारा बघून मन काही भरत नव्हतं पण हरिश्चंद्रगड गाठायचा असल्यानं फार वेळ न दवडता एक मोठा टप्पा चढून पाचनई गाठली. पेठेच्या वाडीतल्या चहानं बाकी किमया साधली होती कारण साडेचार वाजता पेठेची वाडी सोडूनही बरोबर पावणेसहाला म्हणजे फक्त सव्वातासात आम्ही पाचनईत पोहोचलो होतो. इथून हरिश्चंद्रगड आमच्या अगदी आटोक्यात आला होता.
       पाचनई सोडून हरिश्चंद्रगड चढायला लागल्यावर एक पॅगोडा लागला. सर्वजण खुपच दमले होते म्हणून तिथं सर्वांनी पंधरा मिनीटांची थोडीशी विश्रांती घेतली. चला म्हटल्यावर खरं म्हणजे सगळे अनिच्छेनेच उठल्याचं जाणवत होतं पण दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आरामात होण्यासाठी आज थोडा त्रास सहन करावाच लागणार होता. काहीही झालं तरी गडावर तर जावंच लागणार होतं. आता इथून पुढची वाट एवढी प्रशस्थ होती की ती सारखीसारखी सिंहगडाचीच आठवण करुन देत होती. चढ तर मी म्हणत होता पण वाट काही संपत नव्हती. घाटवाट चढताना कशी वर उघडी कॅनॉपी दिसू लागली तरी घाटमाथा काही लवकर येता येत नाही अगदी तसंच झालं होतं. उठत-बसत, पाउलं मोजत कसेबसे एकदाचे गडावर पोहोचलो. वर पोहोचलो त्यावेळी मंदीरापर्यंत जाण्याचेही कुणात त्राण उरले नव्हते म्हणून समोर दिसणार्‍या पहील्याच हॉटेलमधे डेरा टाकला.
       रात्रीचे आठ वाजले होते आणि जेवायची वेळही झालीच होती. म्हणून फार वेळ न घालवता सोबत आणलेला शिधा हॉटेलवाल्याला देवून त्याच्याकडूनच जेवण बनवून घेतलं. जेवायला बसतो न बसतो तोच पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही कळायच्या आत झोपडी एवढी गळायला लागली की आम्हा सर्वांची टाकलेले बिछाने उचलण्यासाठी एकच तारांबळ उडून गेली. कसंबसं एकदाचं जेवण उरकलं आणि कुणी हॉटेलात, कुणी मंदीरात असे इतरस्तः विखरुन सर्वजण झोपी गेले.

हरिश्चंद्रगडावर...

       आज दिवसभरात गडावरची तारामती, कोकणकडा आणि हरिश्चंद्रेश्वर मंदीर वगैरे ठिकाणं पहायची, गडावरच जेवण करून थोडा आराम करायचा, बालेकिल्ला पाहिल्यावर जुन्नर दरवाज्याने उतरून खिरेश्वर गाठायचं आणि रतनवाडीत सोडलेली गाडी खिरेश्वरला आलेली असेल तिने पुण्याला परतायचं असा अगदी थोडकाच कार्यक्रम करायचा होता त्यामुळं सकाळी सवयीप्रमाणे सहालाच जाग येऊनही आज तशी घाई नसल्यानं सकाळी थोडं निवांतच आवरलं.
       नाश्त्यासाठी हॉटेलात रात्रीची रस्साभाजी आणि खिचडी गरम होत होती तोवर हॉटेल मालकाशी काल चालून आलेल्या मार्गाबद्दल गप्पा झाल्या. काल आम्ही चालून आलेला एकूण मार्ग ऐकून तो चांगलाच अवाक झाला आणि म्हणाला 'आज गेली सोळा वर्ष मी गडावर राहतोय पण रतनगडापासून हरिश्चंद्रगडावर एका दिवसात आजपर्यंत चालत कुणीच आलेलं नाही. माझ्या माहितीत असे येणारे तुम्ही पहिलेच. त्यातही तुमच्यात चाळीशी ओलांडलेलेच सर्वजण दिसतायत. खरंच कमाल हाय तुमची'.
       तो चढवू इच्छित असलेल्या हरभर्‍याच्या झाडावर काही आम्हाला चढायचं नव्हतं त्यामूळं त्याच्याशी फारसं काहीही न बोलता चहा-नाश्ता करुन सव्वाआठला तारामती शिखरावर जाण्यासाठी निघालो. माथ्यावर वातावरण बर्‍यापैकी स्वच्छ होतं.




       खिरेश्वर गावामागे पिंपळगाव-जोगे धरण, हडसर, निमगिरी-हनुमंत, सिंदोळा, दौंड्या, वर्‍हाडा, भोरदारा घाटवाट, मोरोशीचा भैरवगड, भोरांड्याच्या दाराची बेचकी, नानाचा अंगठा, माळशेज घाट, काळूचं खोरं वगैरे व्यवस्थित दिसत होतं.




       तारामतीवरुन तसंच कोकणकड्यापाशी उतरलो. वाटेत दोन ठिकाणी लोखंडी शिड्या लावून 'पर्यटकांची' चांगलीच सोय केलेली दिसली.







       रविवार असल्यानं कोकणकड्यावर भरपुर गर्दी होती. आम्हाला काही त्या गर्दीत काही थांबावसं वाटेना. शेवटी झटपट माकडनाळ, नाप्ता-कोंबडा, कलाडगड, आजोबा, शिरपुंजेचा भैरवगड, मुळेचं खोरं पाहीलं आणि हरिश्चंद्रेश्वर मंदीराकडे परत फिरलो.




       परतीच्या वाटेवरुन येताना डावीकडे पाचनईला उतरणाऱ्या सात पायरीच्या वाटेवरच्या खोदलेल्या पायर्‍या आडबाजूला असूनही मुद्दामहून पहायला गेलो. याच पायऱ्या उतरुन बैलघाटाकडेही जाता येतं. या दोन्ही वाटा गडावरून पाचनई पठारावर उतरतात.




पायऱ्या पाहून हरिश्चंद्रेश्वर मंदीराकडे निघालो.





       हरिश्चंद्रेश्वर मंदिराबाहेर असलेल्या 'जांबुवंत' राक्षसाच्या भुकेची पुराणकथा ऐकवून मंदिरात दाखल झालो. नेहमीप्रमाणे आरती केली.









बाजूलाच मंगळगंगेच्या पात्रातलं केदारेश्वर लेणेमंदीर पाहीलं.




       हॉटेलकडे परतताना वाटेतल्या सप्ततीर्थ पुष्करणीला धावती भेट देऊन बरोबर पावणेबाराला हॉटेलात जेवण्यासाठी पोहोचलो.



       जेवणाची ऑर्डर सकाळीच देऊन ठेवल्यानं आल्याआल्या हात धुऊन जेवायलाच बसलो. पोटभर जेवण करुन परतीच्या मार्गाला लागलो तोवर साडेबारा झाले होते.


       हरिश्चंद्रगडावर अनेकदा जाऊनही बालेकिल्ला बरेच जण पहात नाहीत पण आम्ही तो पहायचाच असं ठरवलेलं होतं. तसा तो काही फार उंच नाही त्यामुळे अर्ध्या तासातच माथ्यावर पोहोचलो. तसं बालेकिल्यावर दोनचार पाण्याच्या टाक्या आणि थोडीशी तटबंदी सोडली तर फारसं काही शिल्लक नाही.








       दुपारचा दिड वाजला होता त्यामुळं फार वेळ न दवडता पंधरा मिनीटांत बालेकिल्ल्याची फेरी आवरली आणि खाली उतरलो.
हरिश्चंद्रगडावर येणारी बहूतेक मंडळी तोलार खिंडीतुनच ये-जा करतात पण आंम्हाला थोडं आडवाटेनं उतरायचं होतं आणि ती वाट होती जुन्नर दरवाजाची.
       बालेकिल्याला वळसा घालून जुन्नर दरवाजाच्या खिंडीपाशी उतरलो. तिथं असणार्‍या चौकीचे अवशेष शेवटची घटका मोजत होते. ही जुन्नर दरवाजाची वाट बाकी अफलातुन आहे. नाळेतुन खोबण्या आणि पायर्‍या खोदुन वाट तयार केली आहे. तोंडापाशी अतिशय चिंचोळी असणारी नाळ जसजसं उतरत जाऊ तशी विस्तीर्ण होत जाते.






       साधारण अर्धी नाळ उतरल्यावर डाव्या बाजूला झाडोरा लागला तिच्यातुन आडवं जात नेढ्यापासुन उतरलेल्या धारेवर पोहोचलो. आता इथून खाली दिसणार्‍या खिंडीपर्यंत धारेवरुन उतरायचं होतं. 'इकडे आड तिकडे विहीर' या म्हणी प्रमाणं इकडे दरी आणि तिकडंही दरीच अशी आमची अवस्था होती. बरं अशा अडचणीच्या जागी आमची परीक्षाच बघायची आहे म्हटल्यावर पाऊस तरी कसा मागे राहील, तोही संगतीला आला. अगदी पंधराच मिनीटेच पण चांगला धो धो कोसळला. पण परीस्थिती कशीही असली तरी उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. सावकाश, काळजीपुर्वक उतरुन एकदाची खिंड गाठली.


       या ठिकाणाहून आम्हाला घरी पोहोचवणारी गाडी अगदी स्पष्ट दिसत होती. खिंडीच्या खालच्या टप्यावर काही गुरं चरताना दिसत होती त्यामुळे तिथून पुढची वाट अतिशय सोपी असणार हे नक्की होतं. त्यामुळं सर्वांनाच हायसं वाटलं. गुरांची वाट असल्यानं वाट सोपी तर होती पण खुप लांबुन फिरुन जाणारी होती. त्यामुळं ती काही केल्या लवकर संपेना. पण शेवटी कशीबशी एकदाची आमची पलटण एकएक करत खिरेश्वरच्या पठारावर पोहोचली. पुढच्या अर्ध्या तासात गाडीपाशी पोहोचलो त्यावेळी संध्याकाळचे साडेसहा झाले होते. एकंदरीत आमचा दोन दिवसांचा प्रचंड तंगडतोडीचा ट्रेक सुफळ संपुर्ण झाला होता.

खरंतर या हरिश्चंद्रगडाला माझ्या माहितीत असलेल्या आणि मी स्वतः केलेल्या एकंदरीत बारा वाटा आहेत. ट्रेकर्स मंडळींनी प्रत्येकवेळी वेगळ्या वाटेने हरिश्चंद्रगड गाठला तर तेही एक साहस ठरेल. पुढे दिलेल्या वाटांच्या यादीत भटकी मंडळी अजूनही नक्कीच भर घालू शकतात.

१) खिरेश्वर तोलारखिंडीतुन

२) खिरेश्वरहुन जुन्नर दरवाज्याची वाट ऊर्फ राजनाळ

३) कोथळे तोलारखिंडीतुन

४) लव्हाळीतुन वेताळ दांड/ दरवाजामार्गे

५) पाचनईतुन

६) बैलपाड्यातुन साधले/सादडे घाटाने पाचनई पुढे पाचनई  वाटेने
अ)सात पायरी/बैलघाट मार्गे
ब)नळीच्या वाटेच्या वरिल वाटेने

७) नळीची वाट

८) माकडनाळेतून आडराई आणि पुढे
अ) तारामती घळ
ब) राजनाळ

९) थिटबीची नाळ

१०) तारामती घळ

११) तवलीची वाट

१२) खुर्द्याचा दरा

🚩🚩

       हा ट्रेक आम्ही २०१९ मधे केला होता. या ट्रेकनंतर आमचं या भागात भरपूर फिरणं झालं मग ते घाटघरपासून हरिश्चंद्रगडापर्यंतच्या असंख्य घाटवाटा असो की आजोबावरचा मुक्काम. रतनगडाच्या बारा पायऱ्यांच्या वाटेची शोधमोहीम असो किंवा चिकणदऱ्याचा ट्रेकचा थरार. यातल्या बऱ्याच ट्रेक्सचे ब्लॉग लिहिलेत पण या सर्वावर कडी होती ती म्हणजे २०२३ साली 'पाच दिवसांत हरिश्चंद्रगडाच्या पंचवीस वाटा' केलेल्या मोहिमेची. ते पाच दिवस आम्ही एका वेगळ्याच वातावरणात वावरत होतो. त्याचा समग्र वृत्तांत या धाग्यावरून वाचता येईल.

समग्र हरिश्चंद्रगड 'पाच दिवस पंचवीस वाटा'

२ टिप्पण्या: