"कविराज भूषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथमभेट"
कविभूषण हे उत्तरेतले एक नावाजलेले कवी. कानपूर जिल्ह्यात यमुना नदीच्या काठावर त्रिविक्रमपूर म्हणून जे गाव आहे ते कविभूषणांचे जन्मगाव. त्रिविक्रमपूरात रत्नाकर त्रिपाठी (तिवारी )(१) नावाचे कश्यप गोत्री ब्राह्मण रहात असत. त्यांना एकूण चार मुलं. त्यातल्या दुसऱ्या मुलाचं नाव भूषण. भूषण कवींनी स्वतःविषयीची माहिती शिवराजभूषण या ग्रंथात पुढीलप्रमाणे दिली आहे.
दुज कनौज कुल कस्यपी, रतनाकर सुत धीर ।
बसत त्रिविक्रमपुर सदा तरनि-तनूजा-तीर ॥ १॥
बीर बीरबरसे जहां उपजे कवि अरु भूप ।
देव विहारीश्वर जहां विश्वेश्वर तद्रूप ॥ २॥
इ.स. १६६७ साली ते शिवाजी महाराजांची किर्ती ऐकुन त्यांना भेटण्यासाठी आले असताना काही काळ विश्रांतीसाठी रायगडाच्या पायथ्याशी थांबले. तेथे त्यांची आणि दरबारातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीची अचानक भेट झाली. त्या व्यक्तीने भूषण कवींना त्यांच्या येण्याचं कारण विचारलं. त्यांनी महाराजांवर केलेली कविता स्वतः महाराजांना म्हणून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु त्या व्यक्तीने दरबारात प्रवेश करण्यापुर्वी शिवछत्रपतींवरील कविता त्यांना ऐकवण्यास सांगितलं. ही भेट रात्रीच्या वेळी एका देवळात झाली असे मिश्र पंडीत लिहीतात. कविराजांनी शिवभुषण ग्रंथातली ५६ क्रमांकाची कविता अतिशय खड्या सुरात म्हणून दाखवली.
इंद्र जिमि जृंभ पर वाडव सुअंभ पर रावन संदभ पर रघुकुल राज है।
पौन वारिवाह पर संभु रतीनाह पर ज्यौं सहसबाह पर राम द्विजराज है॥
दावा द्रुमदंड पर चीत मृगझुंड पर भूषन वितुंड पर जैसे मृगराज है।
तेज तम अंस पर कान्ह जिमी कंस पर त्यो मलिच्छ वंस पर शेर शिवराज है॥
एकंदरीत या प्रसंगावरुन कविभुषणांनी महाराजांना ओळखले असल्याचे वाटत नाही. तिथं शिवछत्रपती पूजेस आले होते असाही मिश्र पंडीत पुढे खुलासा करतात. त्यामुळे ही कविता आपण नकळत खुद्द महाराजांनाच म्हणून दाखवतोय याची अजिबात कल्पना कविराजांना नव्हती. इकडे मात्र हे काव्य ऐकून महाराजांच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. महाराजांनी कविभुषणांची प्रशंसा करुन तीच कविता पुन्हा ऐकवण्याची इच्छा दर्शवली आणि कविराजांनीही ती पूर्ण केली. महाराजांना ते काव्य इतकं आवडलं की त्यांनी तब्बल १८ वेळा ते पुन्हा पुन्हा भूषणाला म्हणावयास सांगितलं. अखेर कविराजांचा कंठ फुगुन ते थकून गेले. मग थोडया रागानेच त्यांनी ते काव्य पुन्हा म्हणण्यास नकार दिला आणि ते म्हणाले, जर तुम्हाला महाराजांची भेट घडवून द्यायची असेल तर द्या. परंतु आता मी हे काव्य पुन्हा एकदाही म्हणणार नाही. तेव्हा महाराजांनी स्वतःची ओळख करुन दिली आणि म्हटले- 'कविराज! आम्ही मनात निश्चय केला होता की, आपण जितक्या वेळा ही कविता ऐकवाल तितक्या लक्ष मुद्रा, तितके हती व तितके गाव आपणास इनाम द्यावे. आपला योग इतकाच होता. आपणास १८ लक्ष रुपये, १८ हत्ती व १८ गावे इनाम दिले(२) आहेत. आता आपण कोणत्याही प्रकारची चिंता न करता आमच्या दरबारचे राजकवि म्हणून रहावे.
मराठी साम्राज्याचा राजा एका सर्वसामान्य व्यक्तीला इतक्या सहजासहजी कसाकाय भेटू शकतो? खरंतर हा अनुभव कवि भूषणांसाठी खूपच नवीन होता.
यावर संतुष्ट झालेल्या त्या कवीश्वराने उत्तर दिले, महाराज आपला आश्रय मिळाला हा लाभ काय थोडा आहे? मी आपले शौर्य आणि आर्यधर्माभिमान यावर लुब्ध होऊन आपणाकडे आलो आहे. आपणासारख्या शूर योध्याकडून यवनांचा निःपात आणि भारताचे स्वातंत्र्य पाहण्याची माझी प्रबळ इच्छा आहे.
महाराजांना त्यांच्या या वचनाने अधिकच आनंद होऊन त्यांनी त्यांचा चांगलाच पुरस्कार केला. हा सुंदर राजकवि समागम इ.स. १६६७ पासून १६७३ पर्यंत अखंड चालू होता. याच सहा वर्षात भूषण कवींनी 'शिवराजभूषण' हा अलंकारिक ग्रंथ तयार केला. शिवराज्याभिषेक झाल्यानंतर भूषणकवि शिवप्रभूंच्या अनुज्ञेने स्वदेशी परतले.
समाप्त.
संदर्भ -
१) कान्यकुब्ज ब्राह्मणातील त्रिपाठी कुलशब्दाचा 'तिवारी' अपभ्रंश आहे.
२) संवत १७६०(इ.स. १७०३) मधील लोकनाथ कवि भूषणजींना छत्रपतींकडून ५२ हती मिळाल्याचा उल्लेख करतात. त्याचप्रमाणे संवत १७९१(इ.स.१७३४) मधे होऊन गेलेल्या 'दास' कवीने लिहिले आहे की, भूषण कवींनी कवितेवर विपुल संपत्ती मिळविली.
अ) 'शिवराजभूषण'(मराठी अनुवाद) दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी (१९२१)
ब) कविराजभूषण विरचित 'श्री शिवा बावनी'(मराठी अर्थासहित)
क) फोटो स्त्रोत - गुगल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा