शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

पूर्वार्ध "छत्रपती शिवराय - एक यशस्वी अर्थकारणी"

"छत्रपती शिवराय - एक यशस्वी अर्थकारणी"

-- पूर्वार्ध --


       प्रत्येक आईवडीलांना आपल्या मुलानं आपल्यापेक्षा मोठं व्हावं, नाव कमवावं आणि आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं असं कायमच वाटत असतं. त्या दृष्टीने ते कसोशीने प्रयत्नही करत असतात. पण मग काळ कोणताही असला तरी शहाजीराजे आणि जिजाबाईसाहेब हे आईवडीलही याला अपवाद कसे असतील नाही का?

       सतराव्या शतकात शहाजीराजे आणि जिजाबाईसाहेबांना स्वराज्यस्थापनेचं स्वप्न पडलं. मग ते आपल्या मुलानं म्हणजे शिवबानं पुर्ण करावं असं त्यांना वाटणं अगदी स्वाभाविकच होतं. त्यासाठी दोघांनी अगदी जीवापाड प्रयत्न केले. वडीलांनी पूर्णपणे पाठबळ देऊन तर आईने चांगले संस्कार करून. अर्थातच मुलगा अतिशय कर्तुत्ववान निपजला हे सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणूनच १६३० ते १६८० या पन्नास वर्षांच्या आयुष्यात शिवाजीराजांनी त्यांच्या पश्चात पुढच्या पिढीसाठी मागे काय ठेवलं असं जर कुणी विचारलं तर तुम्ही उत्तर द्याल की त्यांनी तयार केलेली 'माणसं' आणि उभं केलेलं 'स्वराज्य'. जे पूर्णपणे लयास जाण्यासाठी पुढची किमान २०० वर्षे जावी लागली. पण...

       ...पण शिवाजी महाराज पुण्याला आले त्यावेळी त्यांना स्वराज्य उभारणीसाठी शहाजीराजांकडून काय मिळालं? आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वराज्यासाठी मागे काय ठेवलं? याचा जर लेखाजोखा मांडला तर आर्थिक कसोटीवर महाराजांचं कर्तृत्व  अधिक स्पष्ट होतं. महाराजांचा या थोड्या वेगळ्या पैलूचाही नक्कीच अभ्यास व्हायला हवा. तसं बघायला गेलं तर त्यांना त्यांच्या 'कारकीर्दीची' उणीपुरी ३३ वर्षच मिळाली. खरंतर तुलना करू नये कारण ती कुणाचीच कुणाबरोबर होऊ शकत नाही. तरीसुद्धा आजच्या काळातील प्रथितयश व्यक्तींपेक्षा त्यांचं हे 'कमावणं' कितीतरी पटीने अधिक होतं. याचे अस्सल पुरावे आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. एकूणच ते आकडे पाहिले तर डोळे विस्फारले जातात.

       सुरवातीला शिवाजीराजांना काय मिळालं हे समजून घ्यायचं असेल तर ते पुण्याला येण्याअगोदरची महाराष्ट्रातील एकंदर राजकीय पार्श्वभुमी समजून घ्यावी लागेल.

       इ.स. १६३७ च्या आसपासचा काळ शहाजीराजांसाठी अतिशय धामधुमीचा आणि कष्टाचा होता. निजामशाहीच्या नावाखाली स्वराज्यस्थापनेचा मांडलेला डाव पूर्णपणे उधळला गेला होता. तोपर्यंत निजामशाहीचे वजीर असलेल्या शहाजीराजांना लवकरच आदिलशाही सरदार रणदुल्लाखानाच्या हाताखाली एक सामान्य बाराहजारी सरदार म्हणून कर्नाटकात रुजु व्हावं लागणार होतं. त्यावेळची एकंदर राजकीय अस्थिर परिस्थिती पाहता संपूर्ण कुटूंब कर्नाटकात नेणं धोक्याचं होतं. अर्थात कर्नाटकात जाण्यापूर्वी त्यांना कुटूंबाची काळजी वाटणं स्वाभाविकच होतं. यावर उपाय म्हणून त्यांनी हळूहळू कर्तबगारी दाखवू लागलेल्या थोरल्या संभाजीराजांना सोबत कर्नाटकात घेऊन जाणं पसंत केलं तर दुसरीकडे त्यांना धाकटया शिवाजीराजांना मातोश्री जिजाऊंसोबत पुण्याला ठेवणं योग्य वाटलं. असं केल्यामुळं कुटुंब सुरक्षितही राहणार होतं आणि स्वतःच्या अनुपस्थितीत त्यांना मिळालेल्या पुणे परगण्याच्या जहागिरीवर लक्षही ठेवणं शक्य होणार होतं. (बारामती आणि सुपे हे परगणे इ.स. १६३९ च्या आसपास शहाजीराजांकडे आले असावेत.) हा सर्व विचार करून त्यांनी विश्वासू अशा दादाजी कोंडदेव मलठणकरांना आपला मुतालिक नेमून पुणे परगण्याच्या व्यवस्थेचा भार सोपवला. दादाजींच्या मदतीसाठी सिध्दी हिलालला एक हजार घोडदळासह पुण्याला नियुक्त केलं.
पुणे परगणा एकूण सात तरफांत विभागला गेला होता आणि त्यात एकूण २९० गावे येत होती. ती पुढीलप्रमाणे...

१) हवेली - ८२ गावे
२) कडेपठार - ४३ गावे
३) सांडसखुर्द - २० गावे
४) कर्यात मावळ - ३६ गावे
५) पाटस - ४३ गावे
६) सांडस बुद्रूक - २९ गावे
७) नीरथडी - ३७ गावे

       यापैकी कर्यात मावळाच्या ३६ गावांचा मोकासा शिवाजीराजांच्या नावे करून दिला होता. त्यामुळं शिवाजीराजांना आपसुकच राज्य कारभाराचं शिक्षण मिळणार होतं.
       त्यावेळच्या पुण्याच्या परिस्थितीचं संशोधनात्मक वर्णन श्री विजय देशमुख यांनी त्यांच्या 'शककर्ते शिवराय' मधे केलेलं आहे. त्यावरून पुण्याची त्यावेळची परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. ते म्हणतात ...
       इ.स.१६३७ साली शहाजीराजांच्या पुणे जहागीरीची अवस्था अतिशय खराब होती. आधी हा भाग निजामाकडे व त्यानंतर आदिलशहाकडे आला. त्यांचेकडून तो पुन्हा शहाजीराजांकडे आला. इ.स. १६३० ते १६३६ या काळात शहाजीराजे सारखे लढायांमधे मग्न असल्याने त्यांचे या परगण्याकडे लक्ष देणे जमू शकले नाही. त्यापूर्वी विजापूरकरांच्या वतीने मुरारपंतांनी पुणे बेचिराख करून तिथे लोखंडी पहार ठोकून गाढवांचा नांगर फिरविलेला होता. पुण्याची वस्ती उठून गेली होती. तो पूर्ण भाग उध्वस्त, ओसाड पडलेला होता. आधी सैनिकांनी केलेली लूट व त्यानंतर पुंड-पाळेगार लुटारूंच्या कोसळलेल्या धाडीवर धाडी त्यामुळे पुण्याचे होते नव्हते ते रूपही पार नष्ट झाले आणि अशा अवस्थेत आता हा भाग विजापूरकरांकडून शहाजीराजांना मिळाला. विजापूरकरांचे काहीही वजन वा जरब या भागावर नव्हती. सर्वदूर पुंड-पाळेगार माजलेले असून अराजकाची स्थिती निर्माण झालेली होती. मध्यवर्ती सत्तेला जिथे हे पुंड-पाळेगार, वतनदार जुमानत नव्हते तिथे जहागीरदाराला काय जुमानतील? त्यातच १६३० ते ३२ या काळात भीषण दुष्काळ व नंतर इ.स. १६३४-३६ या काळात मोगली आक्रमण यामुळे हा प्रदेश भरडून निघाला होता. परिणामी एकच बेबंदशाही तिथे माजलेली होती. मैलोन्मैल वस्ती उजाड झालेली होती. अशा ओसाड प्रदेशात पश्चिमेला सह्याद्रीचा डोंगर जोडीला होता. या भागात जंगली जनावरे, लांडगे वगैरेंचा सुकाळ झाला. त्यामुळे कशीबशी उरलेली प्रजा व पाळीव जनावरेही नष्ट होऊ लागली होती. शेती करणेही मुष्कील झाले होते.
अशा अवस्थेतील मोगली सीमेवरील जहागीर शहाजीराजांना मिळाली आणि त्यांच्याकडून ती शिवाजीराजांकडे आली. एकप्रकारे दादाजी आणि जिजाऊसाहेबांना हे आव्हानच होते. ही जहागीर सुधारून एका अर्थी शून्यातून विश्व निर्माण करायचे होते. हे अवघड कार्य करून दाखवण्याची जबाबदारी जिजाऊसाहेबांनी उचलली. कारण त्यातूनच सात वर्षाच्या शिवबाराजांची डोळस जडणघडण त्या करू शकत होत्या.

क्रमशः

वाचा या लेखाचा पुढील भाग या धाग्यावर

https://watvedilip.blogspot.com/2019/08/blog-post_84.html

1 टिप्पणी: