"मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सांगणारी डोंगरयात्रा"
'आंबेनळी ऊर्फ उंबरखिंड आणि कुरवंडा घाट'
खरं म्हणजे दर महिन्याला तुम्ही कितीही ट्रेक करत असलात ना तरीसुद्धा तुमचा एखादा ड्रीम ट्रेक असा नक्की असतो की, तुम्ही कितीही ठरवलंत तरी तुमचा तो नाही म्हणजे नाहीच होत. आमच्या उंबरखिंडीच्या ट्रेकचंही अगदी असंच झालं होतं. खरं तर जिथून हा ट्रेक सुरु होतो ते कुरवंडे गाव घरापासून तासाभराच्या अंतरावर. त्यामुळं वनडे शॉट सहज शक्य होता. तरीसुद्धा या ट्रेकला काही केल्या मुहूर्त लागत नव्हता. पण यावेळी मात्र हट्टाला पेटून हा ट्रेक करायचाच असं ठरवलं आणि हां हां म्हणता एकोणीस जण तयार झाले. मग या ट्रेकसाठी दिवसही लवकरचाच ठरला, रविवार, १० मार्च. नऊ मार्चला संध्याकाळी निघून कुरवंड्यात मुक्काम करायचा आणि दहा मार्चच्या सकाळी लवकर नागफणी ऊर्फ नागरगिरी पहायचा. आंबेनळी घाटवाट उतरून उंबरखिंडीच्या स्मारकापर्यंत जायचं आणि कुरवंडे घाटाने परत कुरवंड्यात यायचं असा एकंदरीत साधा सोपा प्लॅन ठरला होता.
ट्रेकच्या आठवडाभर आधी, किती वाजता निघायचं? कसं जायचं? कुठं रहायचं? जेवणाखाण्याच्या सोयी वगैरे गोष्टींवर आम्ही चिंचवडकर मंडळींनी एकत्र भेटून चर्चा केली होती. त्यावेळी या ट्रेकला निदान लोणावळ्यापर्यंत तरी लोकलने जाऊया असं सर्वानूमते ठरलं होतं. अगदी सुरवातीच्या काळातलं माझं स्वतःचं ट्रेकींग हे एसटी, लोकलनेच व्हायचं. पण नंतरच्या काळात स्वतःची गाडी घेऊन ट्रेकला जाणं परवडायला लागल्यावर बाकी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा विसरच पडला होता. ट्रेकसाठी घरून पाठीवर सॅक घेऊन निघायचो त्यावेळी आजूबाजूचे लोक अगदी वळून वळून पहात. त्यांच्या नजरेत 'हा अजब काहीतरी करतोय' असंच दिसत असे. एवढंच नाही तर पीएमटीत अगदी सॅकचा चुकून धक्का जरी लागला तरी सगळेच समजून घेत. बऱ्याचवेळा तर काही जण स्वतः उठून बसायलाही जागा करून देत. पीएमटीचा तो प्रवास करून एसटी स्टँड वेळेत गाठायचं आणि मग स्टँडवर एसटी लागली की तिच्यात सर्वात आधी घुसून जागा पकडायची हे सगळं म्हणजे एक मोठा 'टास्क' च असायचा. फायद्याची गोष्ट ही की ज्या एसटीतुन आम्ही जायचो त्या एसटीतल्या स्थानिकांना आम्ही त्यांच्यातलेच वाटत असू त्यामुळं त्या भागातले पाणवठे, नवीन वाटा, राहण्याची ठिकाणं वगैरे माहिती त्यांच्याकडून अगदी सहज समजत असे. करमणूक म्हणून गाडीत भेंड्यांचा फड जमवणं, ट्रेक संपल्यावर धावतपळत शेवटची एसटी पकडून वेळेत घर गाठणं आणि एवढे सगळे उपद्व्याप करून दुसर्या दिवशी न चूकता कामावर हजर राहणं हे कुठंतरी हरवलं होतं. त्यामुळं पूर्वीच्या 'त्या' दिवसांची थोडीतरी आठवण पुन्हा यावी म्हणून या ट्रेकला लोणावळ्यापर्यंतचा प्रवास तरी लोकलने करायचं ठरवलं होतं.
...आणि तो दिवस उजाडला
आधीच फोन करून ठेवल्यामुळं आम्हाला कुरवंड्याला घेऊन जाणार्या कुरवंड्यातल्या प्रवीणच्या दोन सुमोही स्टेशनबाहेर तयार होत्या आणि कुरवंड्यात पोहोचल्यापोहोचल्या विलास बोरकरांकडे गरमागरम घरगुती जेवणाची ताटंही. हे कुरवंडे गाव तसं सुधारलेलं असल्यामुळं लोकसंख्याही बर्यापैकी, त्यामुळं सकाळच्या आन्हीकांसाठी थोडं लांबवर जावं लागणार होतं. जेवणानंतरची शतपावली करताकरता सकाळची 'सोय' पाहून आलो आणि नवीनच बांधलेल्या मारूती मंदीरात पथार्या पसरल्या.
मारूती मंदीरात नेहमीप्रमाणे आरती केली.
नागफणीच्या आधी बर्याच वार्या केल्यामुळं कुठेही न चुकता डचेज खालच्या पठारावर पोहोचलो. तिथे काही फोटो काढून नागफणीवर पोहोचलो.
या आंबेनळीच्या ओढ्यातून खिंडीच्या दिशेने थोडं अंतर चालून गेल्यावर उजव्या बाजूला ऐन घाटवाटेत असलेलं पाण्याचं बांधीव टाकं लागलं. टाक्याच्या पुढे झाडीभरली नाळ चढून जाताना दिसत होती पण ती माथ्यावर आय.एन.एस. शिवाजीच्या कुंपणाजवळ जात होती. खरं तर प्राचीन आंबेनळी घाटवाट नागफणीच्या थोडी दक्षिणेकडून याच नाळेच्या वाटेने आंबेनळीवाडीत उतरते. पण सध्या तिथल्या नौसेनेच्या संरक्षण क्षेत्रामुळं त्या नाळेत काही जाता येत नाही. एवढंच काय तर वाडीतल्या कातकर्यांनाही लाकूडफाट्यासाठीही त्यांचे रखवालदार जवळपास फिरकू देत नाहीत. त्यामुळं आता आंबेनळी घाटात जायचं असेल तर कुरवंडा आणि आंबेनळी घाटांच्या एकत्र वाटांनी खालच्या पदरापर्यंत यावं लागतं. पदरात उतरल्यावर पहिली उजवीकडची वाट लागते ती कुरवंडा घाटाची तर सरळ आंबेनळीवाडीकडे जाणारी आंबेनळी घाटाची. वाडीच्या पुढे गेल्यावरही पाचटाकी, डोलकणा, कोथळदरा, शेडगा अशा तीनचार वाटा भेलीव-फल्याणकडे उतरतात. आंबेनळीतुन आलेल्या ओढ्याला खालच्या बाजूला एक मोठा दुतोंडी धबधबा आहे त्यामुळं या ओढ्यातुन खाली चावणीला जाता येत नाही. त्यासाठी थोडं पुढं जाऊन आंबेनळी गाठली.
पहिल्या वाडीपासून थोडं पुढं गेल्यावर दुसरी वाडी लागली.
वाडीतल्या घरांपासून खालच्या पठारावर उतरलो. पठाराच्या उजव्या टोकाकडून वाट दाट जंगलातुन खाली उतरू लागली. वाट दिसत होती तरीपण ती फारशी वाहती नसावी. घसाराही खुप होता.
त्या वाटेने काळजीपुर्वक उतरून पुढच्या तासाभरात नदी ओलांडुन चावणी गाव गाठलं.
गावात कुठेही न थांबता पुढे डांबरी रस्त्यावरून स्मारकाकडे निघालो. हा रस्ता चावणीतुन उंबरामार्गे पाली-खोपोली रस्त्यावरच्या शेमडी गावात जातो. खरं सांगायचं तर कोकणातल्या उन्हात अशा डांबरी सडकेवरुन चालणं म्हणजे एक शिक्षाच असते. त्या कंटाळवाण्या वाटेवरून दोन-अडीच किलोमीटर चालून गेल्यावर उंबरखिंड स्मारक आलं. लोणावळ्याच्या शिवदुर्ग मित्र आणि चावणी ग्रामस्थांनी एकत्रितपणे हे सुंदर स्मारक उभारलं आहे.
अथ पन्थानमाश्रित्य लोहाद्रेर्द्क्षिणोत्तरम् l
वीतभी: स वतारेभे सह्यशैलावरोहणम् ll ६५ ll
अर्थ - नंतर लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने तो (कारतलबखान) निर्भयपणे सह्याद्री उतरु लागला.
एकपद्या तया यान्ती नलिकायंत्रतुल्यया l
अभूदतीव स्थगिता वाहिनी सा पदे पदे ll ६६ ll
अर्थ - नलिकायंत्रासारख्या(बंदुक) त्या पाऊल वाटेने जात असतां ती सेना पदोपदी अतिशय कुंठीत झाली.
अस्मादवाङ्मुखीभूता पताम इति निश्चिता: l
नरास्ताम्राननचमूचरा: सह्यमवातरन् ll ६७ ll
अर्थ - "ह्या वाटेवरुन अधोमुख होऊन आपण पडूं" अशी खात्री झालेले मोंगल सैन्यांतील लोक सह्याद्रीवरुन खाली उतरले.
तस्मादभयदानेन देहि मे मम जीवनम् ll ३१ ll
अर्थ - काय सांगावे! दोन तीन दिवस मला येथे पाणीसुद्धा प्यावयास मिळालें नाही; म्हणून अभयदान देऊन मला जीवदान दे.
तलातलमिवासाद्य सह्याचलतलस्थलम् l
विररामश्चिरं चित्ते विस्म्रामश्च पौरुषम् ll ३२ ll
अर्थ - सह्याद्रीच्या जणूं काय पाताळासारख्या खोल तळास येऊन आम्ही मनांत दीर्घ काळ स्तिमित झालों आहोंत व पराक्रमसुद्धा विसरलो आहों!
चिकीर्पामि महाबाहो जीवन् जिगमिषामि च ll ३६ ll
अर्थ - म्हणून, हे महाबाहो, मी आपलें सर्वस्व आपणास अर्पण करुन आपल्या अपराधाचें क्षालन करुं इच्छितों आणि जिवंतपणे जाऊं इच्छितों.
'युद्धस्य कथाः रम्याः' हे कितीही बरोबर असलं तरीसुद्धा इतिहासातुन वर्तमानात तर यावंच लागणार होतं. घड्याळ अकरा वाजल्याचे दाखवत होते त्यामुळं आता बाकी घाई करावी लागणार होती. आमचा अर्धा ट्रेक या ठिकाणी पूर्ण झाला होता आणि परतीचा प्रवासाला आता सुरूवात करायची होती म्हणून आल्या वाटेनेच परत फिरून चावणी गाठलं. गावात पोहोचल्यावरच जेवण करायचं ठरवलं होतं त्यामुळं एक गोष्ट चांगली होणार होती ती म्हणजे जेवल्यावर संपलेल्या बाटल्यांमधे पुन्हा पाणी भरून घेता येणार होतं. घाट चढून जायचा असल्यामुळं पिण्यासाठी पाणी प्रचंड लागणार होतं. एकदा का चावणी सोडलं की पुढं आम्हाला कुरवंडेपर्यंत ते अजिबात मिळणार नव्हतं. गावात पोहोचलो तेव्हा गावातल्या मंदीरासमोर काही मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांना जेवायला कुठं बसता येईल विचारल्यावर त्यांनी समोरच असलेला गावकीचा हॉल उघडून दिला, स्वच्छ आणि डोक्यावर पंखे असलेला. तिथे गृहलक्ष्मीने 'प्रेमाने' बनवून दिलेल्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला.
जेवणं झाल्यावर थोडी वामकुक्षी पण घेतली कारण पुढली घाटवाट चढून जाण्यापूर्वी ते अत्यंत गरजेचं होतं.
ट्रेकमधे आम्ही फाल्कन्स जाता-येता शक्यतो वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतो. त्यानं होतं काय की दोन्ही वाटा पाहता येतात. कोकणात येताना आम्ही आंबेनळी ऊर्फ उंबरखिंडीच्या वाटेने उतरून आलो होतो आणि आता घाटमाथ्यावर चढून जाताना कुरवंडा घाटाच्या मार्गाने जाणार होतो. त्यामुळं चावणीतून बाहेर पडून कुरवंडा घाटाच्या मार्गाला लागलो. या कुरवंडा घाटालाच स्थानिक लोक 'भवनकण्याची वाट' म्हणतात. आपल्या शरीरात पाठीचा कणा जसा आधार देण्याचं काम करतो ना तसं हे कणे जणूकाही सह्याद्रीलाच आधार देत आहेत असं कोकणातुन पाहताना वाटतं. घाटमाथ्यापासून कोकणात एखाद्या कण्याप्रमाणे जे दांड किंवा डोंगरधारा उतरल्या आहेत त्यावरच्या बऱ्याच घाटवाटांच्या नावात 'कणा' आहे. भोर जवळच्या वरंध घाटाजवळ जसे 'चिकणा' आणि चोरकणा' आहेत ना, तसंच इथं 'भवनकणा' आहे.
घाटवाटेकडे पाहिल्यावर एकूणच ही वाट चढून जाताना त्रासदायक होणार हे नक्की होतं. त्याचं कारणही तसंच होतं. एकतर आम्ही दुपारच्या टळटळीत उन्हात, जवळजवळ साठ अंशाचा कोन असलेल्या आणि वाटेवर झाडी अजिबातच नसलेल्या डोंगरसोडेंवरून चढून जाणार होतो. दुसरं असं की या संपूर्ण घाटवाटेवर 'गेल इंडीया' नी खोदकाम करून गॅसची पाइपलाईन टाकली आहे आणि कुणी तिला धक्का लावू नये म्हणून त्यावर काँक्रीट पण अंथरलं आहे. त्यानं झालं काय की वरून सुर्यरावांचा चटका नी खालून तापलेलं काँक्रीट. बरं वाट तरी चांगली होती, तर तीही काँक्रीटची वाळू जागोजाग निघून आल्यामुळं निसरडी झाली होती. एवढं सगळ्यात निदान वारं तरी वाहत होतं? छे, तेही बहूदा दुपारचं वामकुक्षी करायला गेलं होतं. शंभर पावलं चालून गेलो नाही तर थांबावं लागत होतं. उठत-बसत पाण्याचे, पन्ह्याचे घोट घेत हळूहळू चढून जात होतो.
घाटाच्या पायथ्याशी टोपीत ठेवलेली हिरवीगार झाडाची पानं दोन तासातच पूर्णपणे वाळून गेली होती. प्यायचं पाणीही अंघोळ करता येईल इतकं गरम झालं होतं. त्यामुळं वाट कधी एकदा संपतीये अगदी असं झालं होतं. मजल-दरमजल करत असं चारएक तास चालल्यावर घाटमाथ्यावर नागफणीच्या पायथ्याशी असलेल्या डेरेदार झाडाखाली विश्रांतीसाठी थांबलो. थांबलो काय तर अक्षरशः लवंडलोच.
घड्याळात पाहिलं तर सव्वाचार वाजले होते. इथून पुढं थोडी घाई केली तर ०५.२५ ची लोणावळा-पुणे लोकल मिळू शकत होती. सोबत्यांना याबद्दल कल्पना दिली तर सर्वांनीच ती लोकल पकडण्याची गोष्ट उचलून धरली. घाईघाईत कुरवंडे गाठलं. चहा पिण्यासाठी सुद्धा वेळ न घालवता सुमोतुन लोणावळा स्टेशनात आलो तर समोरच लोकल उभी असलेली दिसली. तिकीट काढलं आणि धावतपळत जाऊनच ती पकडली. सगळे बसत नाही तोवरच ती सुटलीसुद्धा. पण या सगळ्या केलेल्या धावपळीमुळं आमचा कमीतकमी एक तास तरी नक्कीच वाचला होता. त्यामुळं कधी नव्हे ते सगळेजण ट्रेक करून 'सातच्या आत घरात' होते.
लेखनसीमा.
🚩 संदर्भ -
१) शिवभारत/अनुपुराण - कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर.(अध्याय २८ श्लोक ५२ ते अध्याय २९ श्लोक ६५. एकूण १२९ श्लोक)
२) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे.
३) शिवराजमुद्रा - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन.
व्हा दिलीप दादा मस्तचं 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवावा! संदर्भातसहित एकदम बेस्ट झालाय ब्लॉग! 👌
उत्तर द्याहटवा