बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

"भटकंती भोर परिसरातल्या अपरिचित ऐतिहासिक ठिकाणांची..."

"भटकंती भोर परिसरातल्या अपरिचित ऐतिहासिक ठिकाणांची..."

        सर्वसामान्य मनुष्याला नाविन्याची ओढ असते आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यात मला ती जरा जास्तच आहे. म्हणून शुक्रवारच्या सुटीचा दिवस वाया न घालवता काही नवीन ठिकाणं पाहण्यात घालवावा, असं मी आणि माझा ट्रेकींगमधला नेहमीचाच जोडीदार रघुनी ठरवलं खरं! पण जावं कुठं हेच ठरत नव्हतं. फेसबुकवर 'कोयाजी बांदल' स्मारकाबद्दल वाचल्याचं स्मरलं आणि प्रश्न चटकन सुटला. ठिकाण ठरलं 'भोर आणि परिसर'
 
       काही मी तर काही रघुनं न पाहिलेली ठिकाणं ठरविली, मनातल्या मनात ठिकाणांचा क्रम ठरविला आणि सकाळी लवकरच चिंचवड सोडलं.
       आमचं पहिलं ठिकाण होतं चेलाडीचा 'कोस-मिनार'. भोरचे संस्थानिक श्रीमंत रघुनाथराव पंडित पंतसचिवांनी शके १८६७ साली या मिनाराची उभारणी केली आहे. हा मिनार त्याच्या असलेल्या ठिकाणापासुन आजुबाजुच्या किल्यांच्या दिशा अंतरासह दर्शवितो. राष्ट्रीय महामार्गालगत आणि चेलाडीच्या चौकात असुनसुध्दा या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल कोणालाही सोयरसुतक नव्हतं ना कोणी याची स्वच्छता ठेवतंय. पुर्वी याच्यावरील अंतराच्या खुणा दगडावर कोरलेल्या होत्या त्या नष्ट झाल्याने सध्या तीथे संगमरवराची पट्टी कोरून चिकटवलेली दिसते.






       आता आमचं दुसरं लक्ष होतं मोहरीचा 'अमृतेश्वर'.

       पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून भोरकडे वळलं आणि गुंजवणी नदीवरचा पुल ओलांडला कि कासुर्डी लागतं. तीथं उजवीकडे हातवे-नांभाड-भागीनघर रस्ता फुटतो, त्या रस्त्याने चार किलोमीटरवर मोहरी बुद्रूक येतं. गावातच 'अमृतेश्वराचं' मंदिर आहे. हे देवस्थान म्हणजे शिळीमकर देशमुखांचं कुलदैवत. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला काही शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पात क्वचितच आढळणारं 'गंडभैरूंडाचं' शिल्प दिसून येतं. इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत इथे एक रवादिव्य झालं होतं, मोहरीचे गावखंडेराव आणि पानसे यांच्यातील वादाचा निर्णय त्यामधे झाला. या मंदिरात खुद्द शिवाजीराजे आले असल्याचे स्मरण केल्यावर वेगळीच अनुभुती मिळते. इथं महादेवाचा ओढा, शिवगंगा आणि गुंजवणीचा त्रिवेणी संगम आहे. शेजारीच असलेल्या महादेवाच्या ओढ्यातलं टाकं पाहीलं आणि नदीपात्रात असलेलं शिवलिंग पाहण्यासाठी निघालो खरं पण भाताची खाचरं, वाढलेलं गवत, ओढ्याला असणारं पाणी यामुळं शक्य झालं नाही येवढ्या करिता उन्हाळ्यात परत यावे लागणार. बघुया जमतंय का?






       अमृतेश्वराहुन निघाल्यानंतर आम्हाला तिसरं ठिकाण खुणावत होतं ते म्हणजे आळंदे गावाच्या हद्दीतलं आणि फेसबुकवर वाचलेलं 'कोयाजी बांदलयांचं स्मारक. हे कोयाजी बांदल शिवाजी महाराजांनी लाल महालावर घातलेल्या छाप्यात होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या पराक्रमासाठी महाराजांनी त्यांना इनाम दिले होते.


       आळंद्याच्या पुढं इंगवली फाट्यावर उजव्या बाजूला एक विटभट्टी दिसली. त्याचे मालकश्रीयुत मुगुटराव बांदलांकडे चौकशी केल्यावर इथं असं स्मारकच नाही असं ते म्हणाले. हो पण एक पुरातन महादेव आणि भैरवनाथांचं मंदिर आहे ते पहा. पाहु तर खरं म्हणून शोध घेतल्यावर कळलं कि भैरवनाथांचं मंदिर म्हणजेच स्मारक आहे. ते दिसतही होतं स्मारकासारखंच. फोटो काढलेबांदलांशी भरपूर इतिहासावर गप्पा मारल्या. जवळपास असणाऱ्या अशा प्रकारची ठिकाणे दाखवण्याची हमी घेऊन त्यांचा निरोप घेतला.




        नंतर आम्ही गेलो 'बाजीप्रभु देशपांडेयांच्या सिंद ‘ गावी.

       गावाच्या सुरूवातीलाच त्यांचा पन्हाळगडावर असणाऱ्या पुतळ्याशी साम्य असणारा पुतळा दिसला. पुतळ्यासमोर नतमस्तक झालो. पुतळा पाहील्यावर दोन गोष्टी जाणवल्यापहिली म्हणजे लढताना चेहऱ्यावर जो त्वेश असतो तो जाणवत नाही बहुधा मुर्तिकारांनी आतापर्यंत महात्मा गांधीचे पुतळेच केले असावेत कारण चेहरेपट्टीही तशीच आहे आणि दुसरं म्हणजे ज्या खांडग्यांना मसुदच्या सैनिकांचं रक्त लागलं त्या खांडग्यांना आज MSEB चा दिवा बांधला गेलाय. आता याला काय करावं?
समोरच असलेल्या मावशींना गावात कोणी देशपांडे आहेत काम्हणून विचारलं तर त्या म्हणाल्या पलीकडच्या वस्तीवर एकच देशपांडे आहे आणि तो 'भोर ते चेलाडीवढापचा धंदा करतो. मी रघुला म्हटलं एकेकाळी देशपांडे असलेल्यावर आज काय वेळ आली आहे पहा.




       पुढं लागलं बांदलांचं मुळ गाव 'पिसावरे'.

       बांदलांचं कुलदैवत हुमजाई देवीचं दर्शन घेतलं. समोरच्याच बाजूला बंद शटरबाहेर लिहिलं होतं 'बियर उपवासाला चालते'. वाचून हसावं का रडावं ते समजेना. स्वराज्य स्थापनेत महत्वपुर्ण कामगिरी करणाऱ्या बांदलांच्या गावातील स्थिती आज अतिशय विदारक आहे. गावातच सध्या पुण्यात स्थायिक असलेले श्रीयुत राजेंद्र बांदल भेटले. ते स्वखर्चाने गावातच असलेल्या कृष्णाजीरायाजी आणि कोयाजी बांदलांच स्मारक बांधून काढीत आहेत. खरंच अतिशय कौतुकास्पद काम ते करीत असलेलं पाहून फारच बरं वाटलं.












       आता पुढच्या ठिकाणी जायचं होतं ते म्हणजे कान्होजी नाईक जेधे आणि जीवा महाले यांचं 'कारी'.

       आता कारीत जेध्यांच्या वाड्यापर्यंत डांबरी रस्ता झाला आहे. हा वाडा हल्लीच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने बांधून काढला आहे. वाड्याची देखभाल श्रीयुत धैर्यशील जेधे पाहतात आणि वाड्याबद्दल माहीतीही सांगतात. त्यांनी आम्हाला कान्होजींच्या पुजेतल्या मुर्तीतलवार इत्यादी वस्तू दाखविल्या. ज्या मुर्तींची पुजा खुद्द कान्होजी करीत होतेआज मला त्या मुर्तींना नमस्कार करताना गहीवरून आलं. मला एकदा कारीतुन लोहदरामार्गे रायरेश्वरला जायचं आहे म्हटल्यावर तुम्ही कधीही या मी तुम्हाला घेऊन जातो म्हणाले पण सध्या थोडा चहा तर घ्या. पुढच्यावेळी असं म्हणत वेळ मारून नेली खरी पण त्यांना वाईट वाटल्याचं जाणवलंकाय करणार शेवटी 'जेधेच ना ते. पण पुढचं ठिकाण आम्हांला साद घालत होतं ते म्हणजे दस्तुरखुद्द कान्होजी जेधे आणि जीवा महाले यांची स्मारके असलेलं 'आंबवडे'.



       मधल्या शॉर्टकटने पंधरा मिनीटातच स्मारकांपाशी पोहोचलो. दोन्ही स्मारकांना दंडवत घालून गावातल्या नागेश्वर मंदिरात आलो. हे मंदिर म्हणजे क्षेत्र महाबळेश्वरची प्रतिकृतीच आहे. मंदिराच्या बाजूलाच पंतसचिवांनी बांधून घेतलेला 'झुलता पुलपाहीला. १९३७ साली बांधलेल्या या पुलाला त्या काळात १०,००० रूपये खर्च झाला होता.












       आता संध्याकाळ झाली होती पण मन काही इतिहासातुन बाहेर यायला तयार नव्हतंपण वर्तमानात यावं तर लागणारच होतं. संध्याकाळची कामं समोर दिसत होती. आता बाकी कुठंही वेळ न दवडता सरळ घराचा रस्ता धरला. पण याच भागातील एका अस्तनीतल्या निखार्‍याचं गाव पहायचं राहीलंते म्हणजे खोपडेंचं 'उत्रोळी'.
       पुढल्या वेळी गाठ फक्त खोपडेंशी आहेत्यावेळी मात्र सर्व मावळ्यांना बरोबर नेणार आहे. दसर्‍यालाच सीमोलंघन करावे म्हणतोय. पाहुया कसं जमतंय ते.

समाप्त.
   







   


1 टिप्पणी:

  1. बऱ्याच अपरिचित ठिकाणांची माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद 👍👍

    उत्तर द्याहटवा