शनिवार, २ मे, २०२०

भाग पहिला "कालगणना"

"कालगणना"


       इतिहासाची साधने साधारणपणे दोन प्रकारची असतात ती म्हणजे अव्वल आणि दुय्यम. अव्वल लेखांत शिलालेख, ताम्रपट, पत्रे तर दुय्यम लेखांत बखरी वगैरेचा समावेश होतो. आपल्या मराठी साधनांविषयी जर अगदी तपशीलवारच सांगायचं झालं तर दर्जानुसार प्रथम सनदा, पत्रे, महजर, करीने, शकावल्या, बखरी आणि सरतेशेवटी पोवाडे व काव्ये असा क्रमांक लागतो. वर उल्लेखलेल्यापैकी ऐतिहासिक पत्रांत असलेल्या कालगणनेबद्दल आपण या लेखात माहिती करून घेणार आहोत.
       महाराष्ट्रात मुसलमानी राजवट जवळजवळ पाचशे-सहाशे वर्षे राज्य करत असल्यामुळे साहजिकच फार्सी भाषेचा पगडा इथल्या बोली भाषेवर झालेला होता. ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करताना तर हे पदोपदी जाणवतं. त्यावेळी मुसलमानी अंमलात फार्सी शब्द आणि मुसलमानी कालगणना सर्वत्र प्रचलित होती आणि मराठी लेखकांनी देखील ती जशीच्या तशी स्विकारली होती. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक आणि राज्यव्यवहार कोश तयार करून मराठी भाषेवर फार्सी भाषेचा असलेला पगडा काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला पण दुखा:ने सांगावे लागते की इतके करून सुद्धा मराठीतून फार्सी शब्दांचे समूळ उच्चाटन आजतागायत होऊ शकलेले नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवहार कोशातीलच काय पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुध्दीसाठी दिलेले अनेक प्रतिशब्द आज आपल्याला दैनंदिन व्यवहारात टिकलेले दिसत नाहीत. खरं सांगायचं झालं तर परकीय भाषेचा, कालगणनेचा वापर आपल्या दैनंदिन वापरात असणं हे देखील एक पारतंत्र्यच म्हणावे लागेल. ऐतिहासिक पत्रे वाचत असताना तर हे प्रत्येक ठिकाणी जाणवतं. जसं शब्दांचं तसंच कालमापन पद्धतीचं. राज्याभिषेक शक सुरू करूनही म्हणावा तसा त्याचा उल्लेख पत्रात केला गेला नाही.
       ऐतिहासिक पत्र वाचत असताना एकूणच कालमापन पद्धती कशी असेल याबद्दल कायमच उत्सुकता वाटत असे. कालमापन पद्धतीबद्दलची माहिती अनेक ग्रंथातून विखुरलेली आहे त्यामुळे कालगणनेविषयीच्या माहितीचं एकत्रितपणे कुठेतरी संकलन व्हावं असं बरेच दिवस मनांत घोळत होतं. त्याच बरोबर ते नवीन वाचकांना सहजी उपलब्ध व्हावं असंही वाटत होतं म्हणूनच केवळ हा लेखनप्रपंच.
       युरोपियन आक्रमकांची पत्रे वगळता उपलब्ध असलेल्या पत्रांत आपल्याला हिंदू आणि मुसलमानी कालगणनेचा वापर केलेला दिसून येतो तर सध्या दैनंदिन वापरात आपण ख्रिस्ती कालगणनेचा उपयोग करतो. त्यामुळे पहिल्या दोन्ही कालगणनेचा ख्रिस्ती कालगणनेशी मेळ घालण्यासाठी आपल्याला तीनही कालगणनेची माहिती करून घ्यावी लागेल. तर या कालगणना साधारणपणे तीन प्रकारच्या आहेत.

अ) हिंदू कालगणना
ब) मुसलमानी कालगणना
क) ख्रिस्ती कालगणना

       एका भागात एक, अशा तीन लेखांत तीन कालगणनेची माहिती आपण पाहणार आहोत. त्यातल्या या पहिल्या भागात हिंदू कालगणनेची माहिती घेऊ.

भाग पहिला


🚩 अ) हिंदू कालगणना -

       या कालगणनेचे एकूण तीन प्रकार पहायला मिळतात.

१) विक्रम संहत
२) शालिवाहन शक
३) शिवराज्याभिषेक शक ऊर्फ राजशक

अ - १) विक्रम संहत -


       उज्जैनीचा राजा सम्राट विक्रमादित्य याने ही कालगणना सुरू केली. यामध्ये चांद्र व सौर या दोन्ही कालगणनांचा उपयोग करण्यात आलेला आहे. आपल्याकडे दरवर्षी विक्रम संवत्सर हे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते तर उत्तर भारतात ते कार्तिक कृष्ण प्रतिपदेला सुरू होते. सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्याकडे हे संवत्सर जसे शुद्ध पक्षात सुरू होते तसे उत्तर भारतात ते कृष्ण पक्षात सुरू होते. म्हणजे त्यांच्याकडे कृष्णपक्ष हा शुक्लपक्षाच्या आधी येतो. आपल्याकडे नव्या विक्रम संवत्सराची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते. गुरूला एक रास ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे संवत्सर. अशा या विक्रम संवत्सराचे एकूण साठ भाग पाडलेले आहेत. या प्रत्येक भागाला म्हणजे प्रत्येक संवत्सराला एकेक नाव दिलेले आहे. साठावे संवत्सर संपले की हे चक्र पुन्हा पहिल्यापासून सुरू होते. हे संवत्सर 'नाम' काढण्याचे एक गणित आहे. विक्रम संवत्सराच्या आकड्यात ९ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे. उरलेल्या बाकी एवढे अंक पहिल्या प्रभव संवत्सरापासून मोजले म्हणजे विक्रम संवत्सराचे नाव मिळते. उदाहरणच सांगायचं झालं तर गेल्यावर्षी म्हणजे इ.स. २०१९ सालच्या दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवत्सर २०७६ सुरू झाला.
२०७६ + ९ = २०८५
२०८५ ला ६० ने भागल्यास भागाकार ३४ व बाकी ४५ राहते.
या बाकी ४५ अंकासाठी प्रथम संवत्सर ‘प्रभव’ पासून क्रमाने मोजल्यास ४५ वे विरोधीकृत नाम संवत्सर येते. हे विक्रम संवत्सर २०७६ चे नाव आहे, जे इ.स. २०२० यावर्षीच्या दिवाळीच्या पाडव्यापर्यंत सुरू राहणार आहे. यावर्षी म्हणजे २०२० साली १६ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे आणि वरिल गणितानुसार १६ नोव्हेंबरला परिधावी संवत्सर सुरू होईल. जर तुम्ही कॅलेंडर काढून पाहिलं तर तुम्हाला परिधावी नाम संवत्सराचा उल्लेख केलेला दिसून येईल. या विक्रम संवत्सरमधील साठ भाग म्हणजे साठ संवत्सरे पुढीलप्रमाणे आहेत.

१) प्रभव
२) विभव
३) शुक्ल
४) प्रमोद
५) प्रजापती
६) अंगिरा
७) श्रीमुख
८) भाव
९) युवा
१०) धाता
११) ईश्वर
१२) बहुधान्य
१३) प्रमाथी
१४) विक्रम
१५) वृष
१६) चित्रभानू
१७) सुभानू
१८) तारण
१९) पार्थिव
२०) व्यय
२१) सर्वजित
२२) सर्वधारी
२३) विरोधी
२४) विकृती
२५) खर
२६) नंदन
२७) विजय
२८) जय
२९) यन्मथ
३०) दुर्मुख
३१) हेमलंबी
३२) विलंबी
३३) विकारी
३४) शार्वरी
३५) प्लव
३६) शुभकृत
३७) शोभन
३८) क्रोधी
३९) विश्वावसू
४०) पराभव
४१) प्लवंग
४२) किलक
४३) सौम्य
४४) साधारण
४५) विरोधीकृत
४६) परिधावी
४७) प्रमादी
४८) आनंद
४९) राक्षस
५०) अनल
५१) पिंगल
५२) कालयुक्त
५३) सिध्दार्थी
५४) रौद्र
५५) दुर्मती
५६) दुंदुभी
५७) रूधिरोद्गारी
५८) रक्ताशी
५९) क्रोधन
६०) क्षय

अ - २) शालिवाहन शक -


       शालिवाहन शक हे कधी सुरू झालं हे जरी पक्कं माहिती असलं तरीसुद्धा ते नेमकं कुणी सुरू केलं यावर संशोधकांमधे आजही मतभेद आहेत. ही कालगणना चालू करणारे 'कुशाण' असू शकतील, ‘शक’ असू शकतील, ‘सातवाहन’ पण असू शकतील किंवा अजून पण कुणी एखादा ‘अज्ञात’ राजा अथवा व्यक्ती पण असू शकेल. नक्की कोण हे निदान आज तरी आपण खात्रीशीर सांगू शकत नाही. या शकाची अचूक माहिती मिळवण्यासाठी चालू वर्षातील चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ३१ डिसेंबरपर्यंत ७८ तर ०१ जानेवारीपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत ७९ वर्षे मिळवली की शालिवाहन शक कोणते ते समजून येते.

संवत्सरांची नावे

प्रभवो विभवः शुक्लः प्रमोदोsथ प्रजापतिः l
अंगिरा श्रीमुखो भावो युवा धाता तथैव च ll
ईश्वरो बहुधान्यस्य प्रमाथी विक्रमो वृषः l
चित्रभानुः सुभानुश्च तारणः पार्थिवो व्ययः ll
सर्वजित्सर्वधारी च विरोधी विकृतीः स्वरः l
नन्दनो विजयश्चैव जयो मन्मथ दुर्मुखौ ll
हेमलम्बी विलम्बी च विकारी शार्वरी प्लवः l
शुभकृच्छोभनः क्रोधी विश्वावसुपराभवौ ll
प्लवंगः कीलकः सौम्यः साधारण विरोधीकृत l
परिधावी प्रमादी स्यादानन्दो राक्षसोsनलः ll
पिंगलः कालयुक्तश्च सिध्दार्थी रौद्रदुर्मती l
दुन्दुभी रूधिद्गारी रक्ताक्षी क्रोधनः क्षयः ll
षष्टीसंवत्सरा ह्येते क्रमेण परीकीर्तिताः l
स्वाभिधानसमंज्ञेयं फलमेषां मनीषिभिः ll

संवत्सराचे नाव काढण्याची रिती

शाको द्वादशर्भिर्युक्तः षष्टीहृदवत्सरो भवेत् l
रेवाया दक्षिणे भागे मानवाख्यः स्मृतो बुधैः ll
स एव नवभियुक्तो मर्मदायास्तथोत्तरे l
यो वै वाचस्पतेर्मध्यराशिभागेन कथ्यते ll

       विक्रम संवत्सरासारखीच याची देखील ६० संवत्सरे आहेत पण त्यांचा इसवी सन वेगळा असतो. ते काढण्याचे याचेही एक वेगळे गणित आहे. शालिवाहन शकाच्या संख्येत १२ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे जी बाकी राहील त्या अंकाइतक्या क्रमांकाचा संवत्सर त्या इसवीसनात सुरू असतो. म्हणजे 'प्रभव' संवत्सरापासून मोजल्यावर त्या क्रमांकावर जे नाव येईल ते त्या शकाचे नाव असते. उदाहरणच सांगायचं झालं तर यावर्षी म्हणजे इ.स. २०२० सालच्या गुडीपाडव्याला शके १९४२ सुरू झाला.
१९४२ + १२ = १९५४
१९५४ ला ६० ने भागितल्यास भागाकार ३२ आणि बाकी ३४ राहील.
या बाकी ३४ अंकासाठी प्रथम संवत्सर ‘प्रभव’ पासून क्रमाने मोजल्यास ३४ वे शार्वरी नाम संवत्सर येते. हे शके १९४२ या शकाचे नाव आहे. इ.स. २०२० यावर्षी २५ मार्चला गुढीपाडवा होता. जर तुम्ही कॅलेंडर काढून पाहिलं तर तुम्हाला शार्वरी नाम संवत्सराचा उल्लेख केलेला दिसून येईल.


जेधे शकावलीतील हे दोन उतारे अनुक्रमे शालिवाहन शके १५७७ आणि १५७८ सनातले आहेत. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांचा खून करून जावळी घेतली हा प्रवाद बखरींतून प्रसिध्द आहे. पण त्यास अस्सल पत्राचा आधार नाही. चंद्ररावाशी झालेल्या लढाईत जेधे मंडळी होती. त्यांनी शकावलीत जावळी व रायरी घेतल्याचे वृत्त लिहूनही चंद्ररावाचा खून केल्याचा किंवा त्यास मारल्याचा उल्लेख केलेला नाही. 'चंदरराउ किलीयाखाली' उतरल्यानंतर पुढे तो कोणत्या प्रसंगाने शिवाजी महाराजांच्या पक्षाकडून मारला गेला या संबंधी अस्सल पुरावा उपलब्ध नाही.

       शिलालेखात शालिवाहन शक ही कालगणना लिहिण्याची अजूनही एक पध्दती आहे. शिलालेख अभ्यासक श्री. पंकज समेळ यांनी मंचर पुष्करणीत असलेल्या शिलालेखाबद्दल लिहिलेल्या ब्लॉगमधला उतारा पुढे जसाच्या तसा दिला आहे.
       'शिलालेखांचा अभ्यास करताना कालगणनेला फार महत्त्व असते. बऱ्याच वेळेला शिलालेखात शक अंकांमध्ये नमूद केलेला असतो. पण काही वेळेला शिलालेखात शक अंकात न देता शब्दमूल्यात देण्यात येतो. अंकमूल्यांसाठी काही ठराविक शब्दमूल्य तयार झालेली आहेत. उदा. ० = आकाश, पूर्ण, १ = पृथ्वी, रूप, चंद्र, २ = नयन, कर, ३ = अग्नी, द्वंद इ. प्रस्तुत शिलालेखाच्या २२व्या ओळीत “रसवैरिलोचनमहीतुल्ये” असा उल्लेख आला आहे. यातील महि, लोचन, वैर आणि रस हे शब्दमूल्य आहेत. या शब्दमूल्यांवरून महि किंवा पृथ्वी = १, लोचन किंवा डोळे = २, वैर = ६ आणि रस = ६ म्हणजे १२६६ हा शक मिळतो. महाराष्ट्रात मंचर शिलालेखाशिवाय अर्नाळा किल्ल्यावरील शिलालेख आणि रायगडावर असलेल्या जगदीश्वर मंदिराच्या शिलालेखात अंकाऐवजी शब्दमूल्य वापरून शकाची नोंद केलेली आहे. मंचर, अर्नाळा आणि रायगड येथील शिलालेखातील शब्दमूल्यनिर्देशक उजवीकडून डावीकडे वाचावे लागतात.'

किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिरातील शिलालेखात कालगणनेबद्दल असा उल्लेख आलेला आहे.

शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे

अर्थ - षण्णव म्हणजे ९६
बाण म्हणजे ०५
भूमि म्हणजे ०१
(अंकानाम वामतो गती म्हणजे अंक नेहमी उलटे वाचावेत)
अर्थात शके १५९६
कालगणनेनुसार संवत्सर कोणतं तर 
आनन्दसंवत्सरे म्हणजे आनंद संवत्सर.  पुढं तिथीबद्दल असं लिहिलंय...

ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।

अर्थ - ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते म्हणजे ज्योतिष शास्त्रात उत्कृष्ठ वर्णील्या गेलेल्या अशा 
तिथी कोणती होती?
शुक्लेशसापै तिथौ म्हणजे
शुक्ल - पक्ष
ईश - ०३
सार्पे म्हणजे सर्प - ०१
(इथेही अंकानाम वामतो गती म्हणजे अंक नेहमी उलटे वाचावेत)
म्हणजे १३ म्हणजे त्रयोदशी 

थोडक्यात पहिल्या श्लोकाचा पूर्ण अर्थ असा - ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी जगाला आनंद देणारं हे शिवालय उभारलं आहे.

अ - ३) शिवराज्याभिषेक शक ऊर्फ राजशक -


       ज्येष्ठ शुद्ध १३, शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ०६ जुन १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या दिवशीपासून महाराजांनी ही कालगणना सुरू केली. सध्या शके १९४२ सुरू आहे म्हणजे १९४२ मधून १५९६ वजा केल्यावर राज्याभिषेक शक येईल. म्हणजे आत्ता राज्याभिषेक शक ३४६ सुरू आहे. राज्याभिषेक शकाचे  इंग्रजी वर्ष समजण्यासाठी चालू वर्षीच्या ज्येष्ठ शुद्ध १३ ला जी इंग्रजी तारीख असेल त्या तारखेपासून ३१ डिसेंबरपर्यंत १६७३ आणि ०१ जानेवारी ते ज्येष्ठ शुद्ध १२ ला जी ती तारीख असेल त्या तारखेपर्यंत १६७४ वर्षे मिळवावी लागतात.

हे पत्र राज्याभिषेक शके २५ चे आहे. या शकानंतर लगेचच शालिवाहन शकाचा उल्लेख आहे तर पत्राच्या शेवटी सुहूर सन मया व अलफच्या मोहरम महिन्यातल्या २७ व्या चंद्राचा (महिन्यातला दिवस) उल्लेख केलेला आहे.

# मराठी महिने -


मासश्चैत्रोsथ वैशाखो ज्येष्ठ आषाढसंज्ञकः l
ततस्तु श्रावणो भाद्रपदोsथाश्विन संज्ञकः ll
कार्तिको मार्गशीर्षश्च पौषो माघोsथ फाल्गुनः l
एतानि मासनामानि चैत्रादीनां क्रमाद्विदुः ll

१) चैत्र
२) वेशाख
३) जेष्ठ
४) आषाढ
५) श्रावण
६) भाद्रपद
७) अश्विन
८) कार्तिक
९) मार्गशिर्ष
१०) अश्विन
११) माघ
१२) फाल्गुन

# ऋतू आणि त्याचे काल -


वसंतो ग्रीष्मसंज्ञश्च ततो वर्षा ततः शरत् l
हेमंतः शिशिरश्चैव षडेते ऋतवः स्मृताः ll
मीनमेषगते सूर्ये वसंतः परिकीर्तितः l
वृषभे मिथुने ग्रीष्मो वर्षाः सिंहेsथ कर्कटे ll
शरत्कन्यातूलयोश्च हेमंतो वृश्चिके घने l
शिशिरो मकरे कुंभे षडेवमृतवः स्मृताः ll
चैत्रादि द्विद्विमासाभ्यां वसंताद्युतवश्च षट् l

१) वसंत आणि ग्रीष्म म्हणजे उन्हाळा - चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ

२) वर्षा आणि शरद म्हणजे पावसाळा - श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक

३) हेमंत आणि शिशिर म्हणजे हिवाळा - मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन

# पंधरवडे -


       मराठी महिन्यात दोन पंधरवडे असतात. पहिल्यास शुद्ध पक्ष तर दुसर्‍यास वद्य किंवा बहूल पक्ष म्हणतात. प्रत्येक पक्षात १५ तिथी असतात. शुद्ध पक्षाच्या १५ व्या तिथीस पौर्णिमा तर वद्य  पक्षाच्या १५ व्या तिथीस अमावस्या असते.

# वारांची जुनी नावे -


१) रविवार - आदित्यवार, भानुवासर, अर्कवासर
२) सोमवार - चंद्रवासर, इंदुवासर, अब्जवासर
३) मंगळवार - भौम्यवासर, कुंजवासर, अंगरकवासर
४) बुधवार - सौम्यवासर, विंदवासर
५) गुरूवार - बृहस्पतवासर, उष्णकवासर
६) शुक्रवार - भृगुवासर
७) शनिवार - मंदवासर, स्थिरवासर, पंगूवासर

# शेवटच्या लेखात हिंदू कालगणनेची सध्या वापरात असलेल्या इसवीसनाबरोबर असलेल्या फरकाची थोडक्यात माहिती येईलच. 

क्रमशः

वर दिलेल्या पत्राच्या शेवटी सुहूर सन मया व अलफच्या मोहरम महिन्यातल्या २७ व्या चंद्राचा (महिन्यातला दिवस) उल्लेख केलेला आहे हे म्हणजे नेमके काय हे जर समजून घ्यायचे असेल तर ते इथे टिचकी मारून वाचता येईल.

२ टिप्पण्या:

  1. विषय छान सोपा करून सांगितला आहे
    अशा स्वरूपाचे लेख,
    'उत्तम विषय प्रवेश ठरतात'
    भारतीय कालगणना केवढा व्यापक
    आणि परिपूर्ण विषय आहे,
    हे नववर्षाच्या निमीत्ताने वाचायला मिळणे
    एक रंजक अनूभव ठरला
    अ्रन्यथा आपल्याला सवय जडली आहे,
    पाश्चात्यांचे जे जे ते सर्वश्रेष्ठ!

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान वाटवे सर...! आपलl सांस्कृतीक ऐतिहासिक संदर्भ आणि दऱ्याखोऱ्यांत भटकंती प्रवासवर्णन नेहमीच रोमांचक असतं...!

    उत्तर द्याहटवा