बुधवार, २७ मे, २०२०

लेख पाचवा "हिंदू साम्राज्य दिन"

🚩 "हिंदू साम्राज्य दिन"


फॕक्टरी रेकॉर्ड राजापुर
पृष्ठ १०९
फाल्गुन शुद्ध त्रयोदशी शके १५८१
१३ फेब्रुवारी १६५९/६०

हेन्री रेव्हिंग्टन ते शिवाजी

       राजापूर, हेन्री रेव्हिंग्टन --- शिवाजी हिंदूसेनाधिपती
       दंडाराजपूरप्रकरणीं आपल्याकरितां इंग्रजांनी किती दोस्तांचे वचन दिले आहे हे दोरोजी व इतर अधिकार्‍यांनी कळविलेच असेल. तुमचे लोकांकडून आम्हांला किती त्रास झाला आहे हे सांगता पुरवत नाहीं. परंतु कृपा करून इतकेंच लक्षांत घ्यावे कीं (राजापूर बंदरात असलेली गलबते मराठ्यांच्या ताब्यात देऊन) आमचे मित्रांचे शत्रुत्व आम्हीं पत्करले नाहीं एवढ्याकरितां एक दलाल आणि एक इंग्रज त्यांनी २५ दिवसांपर्यंत कैदेत ठेविले! दलाल सोडून दिला. परंतु इंग्रजाला खारेपाटणांत अडकवून ठेविला आहे ! आम्हांला यानें खेद होत असून इतर व्यापार्‍यांना सर्वत्र दहशद बसून व्यापाराला धक्का बसला आहे. आपण हुकूम पाठवून आमचा माल व मनुष्य परत द्याल अशाबद्दल खात्री असल्यामुळें धीर धरून आहोंत.



       अफजलखान स्वारीच्या वेळी त्याच्या एकूण तीन गलबतांपैकी दोन गलबते जैतापूरला तर एक गलबत राजापूरला इंग्रजांच्या ताब्यात होती. ती घेण्यासाठी राजापूरच्या सुभेदाराने जैतापूरला ५००-६०० तर राजापूरला २०० माणसे पाठवली होती. ती जहाजे इंग्रजांनी ताब्यात दिली नाहीत म्हणून शिवाजीच्या माणसांनी म्हणजे मराठ्यांनी गिफर्ड नावाचा एक इंग्रज आणि एक दलाल यांना पकडून खारेपाटणला नेलं. पुढे मराठ्यांनी त्या दलालाला सोडून दिलं पण गिफर्डला काही सोडलं नाही. त्यामुळं त्याच्या सुटकेसाठी हे पत्र हेन्री रेव्हिंगटनने शिवाजी महाराजांना लिहिलेलं आहे. याच आशयाची पत्रे त्याने सुरतेच्या इंग्रजांना, फाजलखानाला आणि रुस्तुमजमा यांना देखील लिहिलेली आहेत. आपल्या माणसाच्या सुटकेसाठी हे इंग्रज किती धडपड करत हेच यावरून दिसून येतं. महाराजांना पाठवलेल्या पत्रात तो महाराजांचा उल्लेख 'Sevagy, Generall of the Hendoo Forces.' असा करतो. पत्र पहिल्यापासून अगदी नीट वाचलं तर इंग्रज किती धोरणी होते ते लगेचच लक्षात येईल. खरंतर 'इंग्रजांचं पत्रलेखनकौशल्य' या विषयावर एक संपूर्ण लेख लिहिता येईल. त्यामुळे अशा प्रत्येक शब्द तोलूनमापून वापरणार्‍या इंग्रजांच्या या पत्रावरूनच शिवाजी महाराजांचं राज्य हे 'हिंदू राज्य' होतं हे अधिकच स्पष्ट होतं.



लेख पाचवा...


🚩 'शिवाजीराजांचे मिर्झाराजे जयसिंग यांना पत्र'


       हे श्रेष्ठ सरदारा, तुझ्यामुळे रजपुतांची मान उन्नत आहे. तुझ्यामुळे बाबरवंशाची राजलक्ष्मी अधिक प्रबळ झाली असून तुझे सहाय तिला मिळत आहे. हे प्रबल व प्रौढ जयशहा! ‘सेवाचा’ (शिवाजीचा) प्रणाम व आशिर्वाद स्वीकार. परमेश्वराने तुझे रक्षण करून तुला धर्माचा व न्यायाचा मार्ग दाखवावा. मी असे ऐकले आहे की, मजवर हल्ला करण्यासाठी व ‘दख्खण’ जिंकण्यासाठी तूं आला आहेस. हिंदूंचे हृदय व नेत्र यांच्या रक्तानें तू जगात यशस्वी होऊ पहात आहेस. पण तुझ्या हे लक्षात आले नाही की, याने तुझ्या तोंडास काळोखी फासली जात आहे. कारण, या कृत्याने देशावर व धर्मावर आपत्ती ओढवली आहे. जर तूं क्षणमात्र अंतर्मुख होऊन आपल्या हाताकडे व झग्याकडे विवेकदृष्टीने पाहशील तर हा रंग कोणाच्या रक्ताचा आहे व या रंगाचा रंग इहपरलोकी काय होणार हे तुला समजेल. जर तू आपणहुन दक्षिणदेश जिंकण्यास आला असतास तर माझे शीर वा डोळे तुझ्या रस्त्यावर बिछान्याप्रमाणे पसरले असते, मी तुझ्या घोड्याबरोबर मोठी सेना घेऊन आलो असतों आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची भूमि तुला जिंकून दिली असती. पण, तू सज्जनांना फसविणाऱ्या औरंगजेबाच्या थापांस भुलून इकडे आला आहेस. तेव्हा या वेळी तुझ्याशी कोणता डाव खेळावा हे मला समजेनासे झाले आहे. जर तुला सामील व्हावे तर त्यात मर्दपणा नाही, कारण मर्दलोक प्रसंगाची सेवा करीत नाहीत. सिंह कधी भित्रेपणा दाखवीत नाही. बरें, जर मी तलवार व कुऱ्हाड यांचा उपयोग केला, तर दोनहि बाजूंनी हिंदुंचीच हानी होणार. मोठ्या दु:खाची गोष्ट ही आहे की, मुसलमानांचे रक्त पिण्याखेरीज इतर कामासाठी माझ्या तरवारीस म्यानांतून बाहेर पडावे लागेल! जर या लढाईसाठी स्वत: तुर्क आला असता तर आम्हां वीरपुरुषांना घरबसल्या शिकार लाभल्यासारखे झाले असते. पण जेव्हा अफजलखां आणि शाईस्ताखां यांच्या हातून काम झेपत नाही असे दिसलें तेव्हा तुला आम्हांशी युध्द करण्याकरितां नेमलें आहे. कारण स्वत: औरंगजेब आमचा मारा सोसण्यास समर्थ नाही. हिंदुलोकात कोणी बलशाली राहू नये आणि सिंहानी आपसांत लढून घायाळ व शांत व्हावे आणि गिधाडांना जंगलाचे स्वामित्व प्राप्त व्हावे, अशी औरंगजेबाची इच्छा आहे. ही गूढ नीती तुझ्या ध्यानांत येत नाही. यावरून त्याच्या जादूने तुला भूल पाडली आहे असे प्रत्ययास येते. तू जगात बरे वाईट पुष्कळ प्रसंग पाहीले असशील, बागेत तू फुले व कंटक या दोहिंचाही संचय केला असशील, पण आम्हां लोकांशी युद्ध करून हिंदूंचे शीर धुळीत मिळवण्याचे काम मात्र तू करू नये. प्रौढ वयात अल्लडपणा न करता सादीच्या या वचनाचे स्मरण कर. “सर्व ठिकाणी घोडा फेकता येत नाही. कधी कधी ढाल फेकून पळून जाणे योग्य असते.” व्याघ्र मृगादि प्राण्यांवर व्याघ्रता करतो, पण सिंहाबरोबर गृहयुद्ध करण्यास प्रवृत्त होत नाही. जर तुझ्या तीक्ष तलवारीत पाणी असेल व घोड्यात दम असेल तर हिंदू धर्माच्या शत्रूंवर हल्ला करून इसलामाचे जड मूळ खोदून टाक. जर या देशाचे राज्य दारा शिकोह यांस मिळाले असते, तर आम्हां लोकांवर त्यांनी कृपा, अनुग्रह केला असता. पण तू जसवंतसिंगास दगा दिलास व उच्चनीच यांची पारख तुला करता आली नाही. आजवर किरकोळ शत्रूंशी गाठ पडल्यामुळे तुझा दम कायम राहिला आहे. पण तू आता सिंहाशी युद्ध करायची धिटाई करून आला आहेस. एवढ्या धावपळीने तुला काय मिळत आहे! तूं मृगजळाच्या मागे धावत आहेस. एखाद्याने फार परिश्रम करून एखादी सुंदरी हस्तगत करावी आणि ती आपल्या शत्रूच्या स्वाधीन करावी, अशा तुच्छ व्यक्तीसारखा तू आहेस! तू या नीचाच्या कृपेचा काय अभिमान धरतोस? जुझारसिंहाच्या कामाचा परिणाम काय तुझ्या लक्षांत येत नाही?

       कुमार छत्रसाल याच्यावर तो कशा प्रकारची आपत्ती आणू पहात होता, हे तू जाणतोस. या खेरीज इतर हिंदुलोकांवर या दुष्टाच्या हाताने काय काय अनर्थ झाले आहेत हेही तुला माहिती आहे. इष्ट हेतू साधण्यासाठी तो बापाचा वा भावांचा खून पाडण्यास भीत नाही. राजभक्तीची सबब सांगत असशील तर तू शहाजहानशी कसे वर्तन केलेस त्याचे स्मरण कर. जर विधात्याने तुला अकलेचा अंश दिला असेल व मर्दपणाची चाड असेल तर तू आपल्या जन्मभूमीच्या संतापात आपली तलवार तापीव व अत्याचाराच्या दु:खाने पडणाऱ्या आसवांनी तिला पाणी दे. हा प्रसंग आम्ही लोकांनी आपसांत लढण्याचा नाही. कारण हिंदूलोकांवर या वेळी मोठे कठीण कार्य येऊन पडले आहे. आमची पोरेबाळे, देश, धन, देव व पवित्र देवपुजक या सर्वांवर त्याच्यामुळे पराकाष्ठेचे दु:ख कोसळले आहे आणि हाच क्रम आणखी काही दिवस चालेल तर आम्हां हिंदुलोकांचे चिन्ह देखील पृथ्वीवर रहाणार नाही! मुठभर मुसलमानांनी आमच्या एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे प्रभुत्व त्यांच्या पराक्रमाचे फळ नव्हे. जर तुला अकलेचे डोळे असतील तर पहा. आम्हा बरोबर तो कशा गोड गोष्टी बोलतो, व चेहऱ्यावर कसकसे रंग आणितो, आमच्याच पायात आमचीच बेडी अडकवतो व आमच्याच तलवारीने आमची शिरे कशी कापतो ते लक्षात घ्या. आम्ही लोकांनी या वेळी हिंदू, हिंदुस्थान वा हिंदुधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. तरवारीस पाणी देऊन (जशास तसे या न्यायाने ) तुर्काचा जवाब तुर्कीतच दिला पाहिजे. जर तू मारवाडचा राजा जसवंतसिंग व मेवाडचा राजा राजसिंग यांच्याशी ऐक्य करतील तर फार मोठे काम होईल अशी आशा आहे. चोहीकडून उठावणी करून तुम्ही या सर्पाचे डोके दगडांनी ठेचून काढा म्हणजे काही काळ पर्यंत तरी त्याला दक्षिण प्रांतात त्याचे जाळे पसरता येणार नाही. तेवढ्यात मी वा माझे भालेबहाद्दर वीर विजापूर व गोवळकोंडा येथील दोनहि बादशाहांना जिंकतो. मेघासारखी गर्जना करणाऱ्या सैन्यानिशी मुसलमानांवर तलवारींचा पाउस पाडीन आणि सर्व दक्षिण देशांच्या पटावरून इस्लामाचे नांव किंवा चिन्ह धुवून टाकीन. त्या नंतर कार्यदक्ष वीर आणि भाला चालविणारे घोडेस्वार यांना बरोबर घेऊन प्रचंड लाटा वा कोलाहल माजविणाऱ्या नदीप्रमाणे दक्षिण देशांतील पहाडांतून बाहेर पडून मैदानात येईन आणि अत्यंत जलद गतीने तुम्हा लोकांच्या सेवेत हजर होईन व तुम्हांस हिशेब विचारीन. चोहींकडून भयंकर युद्ध उपस्थित करून रणांगणात दंगल माजवून आम्ही लोकं आमच्या सेनेच्या लाटा दिल्ली येथील त्यांच्या जर्जर झालेल्या घरात पोहोचवू, म्हणजे त्यांच्या नावाचे औरंगहि (राजसिंहासन) राहणार नाही व जेब (शोभा) हि राहणार नाही. तसेच त्यांची तलवार राहणार नाही व कपटाचे जाळेही राहणार नाही. शुद्ध रक्ताने भरलेली नदी वाहवून आम्ही आमच्या पितरांच्या आत्म्याचे तर्पण करू. हे काम काही फार कठीण नाही. फक्त हृदय व डोळे आणि हात याची आवश्यकता आहे. दोन अंत:करणे एक होतील तर पहाड तोडता येईल व मोठ्या सैन्याच्या समूहाच्या ठिकऱ्या उडवता येतील. या विषयासबंधी मला तुझ्याशी फार बोलणे चालणे करावयाचे आहे, ते पत्री लिहिणे सयुक्तिक नव्हे. तूं म्हणशील तर मी समक्ष तुझ्या भेटीस येईन, माझा बेत तुला कळवीन. तलवारीची शपथ, घोड्याची शपथ, देशाची शपथ व धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, असे करण्याने तुझ्यावर आपत्ती येणार नाही. अफजलखानाचा शेवट कसा झाला हे लक्षात आणून तू शंकीत होऊ नको. त्याने बाराशे लढवय्ये हबशी माझा घात करण्यासाठी ठेवले होते. त्याच्यावर मी प्रथमच हात चालवला नसता, तर या वेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते? मला तुझ्यापासून अशी भीती नाही. कारण, तुझ्या माझ्यात काही शत्रुत्व नाही. जर मला माझे उत्तर अनुकूल आले, तर रात्री मी एकटा तुझ्या भेटीस येईन. शाहिस्तेखानाच्या खिशांतून मी जे पत्र काढून घेतले आहे ते गुप्त पत्र मी तुला दाखवीन. तुझ्या डोळ्यांवर संशयाचे पाणी शिंपडून तुझी सुखनिद्रा नाहीशी करीन. तुझ्या स्वप्नाचा खरा खरा फलादेश करून नंतर तुझा जवाब घेईन. जर या पत्राचे उत्तर माझ्या मनाजोगे न येईल तर मी आणि माझी तीक्ष्ण तलवार आहे व तुझी सेना आहे. उद्या सूर्य आपले मुख संध्याकालांत लपवील तेव्हा माझा अर्धचंद्र (तरवार) म्यानांतून बाहेर पडेल. बस्स. कल्याण असो.

🚩 संदर्भ -

शिवकालीन पत्र-सार-संग्रह - खंड पहिला - पत्र क्रमांक ८०१ आणि १०४२.

🚩 फोटो स्त्रोत -

English Records On Shivaji(1659 - 1682).

       मागच्या लेखातले शंभूराजांनी रामसिंहला लिहिलेले आणि या लेखातले शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांना लिहिलेले अशी दोन्ही पत्रे जर का नीट वाचली तर त्या काळच्या मराठ्यांच्या मोगलांविरोधी राजकारणाची थोडक्यात कल्पना येते. दोन्ही पत्रांचा तर्जुमा साधारण सारखाच आहे. त्यामुळे संभाजीराजेही महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचाच कित्ता गिरवत होते हे लक्षात येईल. शिवाजीराजे आणि शंभूराजे या दोघांच्या एकत्रित काळात अपवाद वगळता मराठे आणि रजपुत हे दोनही हिंदू कधीही एकत्र आले नाहीत. इतिहासापासून धडा न घेतल्याने भारतात आलेल्या प्रत्येक आक्रमकाने हिंदूंमधल्या दुफळीचा कायमच फायदा घेतलेला दिसून येतो. आजही जर बघायला गेलं तर फार काही वेगळे चित्र पहायला मिळत नाही त्यामुळेच 'हिंदूंचा नेमका शत्रु कोण?' हे आजतागायत हिंदूंनाच समजलेले नाही असेच दु:खाने म्हणावे लागेल.
बहुत काय लिहिणें, आपण सुज्ञ असा.


या सहा भागांच्या लेखमालेचा पुढील भाग या धाग्यावरून वाचता येईल...
भाग सहावा


समाप्त.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा