🚩 "हिंदू साम्राज्य दिन"
काल ज्येष्ठ शुद्ध द्वादशी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची हिंदू कालगणनेनुसार जयंती. थोरल्या महाराजांनी आनंदवनभुवनी हिंदवी राज्याची जी मोठी मोहिम मांडली होती ती संभाजी महाराजांनी तितक्याच समर्थपणे किंवा कांकणभर सरसच राबवली असेच म्हणावे लागेल. कालच्या त्यांच्या जयंतीनिमित्त आज हा लेख खास त्यांच्यासाठी.
श्रीगणेशायनम:
श्री लक्ष्मी प्रसन्न ॥ स्वस्ति श्री नृपशाळीवाहन शके ॥
१६१० वर्ष । वर्तमान विभवनाम संवत्सर चैत्रशुद्ध
प्रतिपदा गुरुवासर गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश
क्षत्रियकुळावतंस राजा शंभुछत्रपति यांचे आज्ञानुव-
र्ती राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देशाधिकारी प्रां-
त मामले फोंडा याप्रति तिमनायकाचे पुत्र सा-
मनायक याहीं विनंती केलि जे पुर्विं मुसलमाना
च्या राज्यामध्यें तरि अनंतउर्जेसि लोकास आंगभा-
डें घेत नव्हते. तेणेंकरून व्यावहारीक लोके सुखें
येत. तेणेंकरून राजगृहिं हासिल होय. आता हे
हिंदुराज्य जाहालेपासोन आंगभाडे घेउं लागले तेणेंकरून राजगृहिं
हासिलासी धक्का बैसला. त्यासि ते कृपाळु होउन आंगभाडें उरपासि जाव
दुडुवा अर्धकोसी चौदा दुडु घेत आहेति मना करावे पण काहि राजा-
गृहिं आदाय होईल ऐसि विज्ञापना केलि ते प्रमाण जाणुन
भाणस्तरि व पारगावि व मांदुस कुडैचि येथिल आंगभाडें सोडी
लें. पुढें या प्रमाणें सकळांहि चालवावें सहसा धर्मकृत्यास नाश क
रूं नये करतिल त्यांसि महापातक आहे ॥ श्लोक ॥ श्वकृत वा परे
णापी धर्मकृत्यं कृतं नर: ॥ यो नश्यती पापात्मा स यती
नरकान् बहून् ॥ १ ॥ लोभान्मत्सरतो वापि धर्मकार्यस्य
दुस्यक: ॥ यो नर: स महापापी विष्ठायां जायते कृमि ॥ २ ॥
दानपाळनयोर्मध्ये दानात् स्त्रेयोनुपाळनं ॥ दानात् स्वर्गमवा
प्नोति पाळणादच्युतं पदं ॥ या धर्मकार्या समस्तिं मान देवावे
श्री लक्ष्मी प्रसन्न ॥ स्वस्ति श्री नृपशाळीवाहन शके ॥
१६१० वर्ष । वर्तमान विभवनाम संवत्सर चैत्रशुद्ध
प्रतिपदा गुरुवासर गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश
क्षत्रियकुळावतंस राजा शंभुछत्रपति यांचे आज्ञानुव-
र्ती राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देशाधिकारी प्रां-
त मामले फोंडा याप्रति तिमनायकाचे पुत्र सा-
मनायक याहीं विनंती केलि जे पुर्विं मुसलमाना
च्या राज्यामध्यें तरि अनंतउर्जेसि लोकास आंगभा-
डें घेत नव्हते. तेणेंकरून व्यावहारीक लोके सुखें
येत. तेणेंकरून राजगृहिं हासिल होय. आता हे
हिंदुराज्य जाहालेपासोन आंगभाडे घेउं लागले तेणेंकरून राजगृहिं
हासिलासी धक्का बैसला. त्यासि ते कृपाळु होउन आंगभाडें उरपासि जाव
दुडुवा अर्धकोसी चौदा दुडु घेत आहेति मना करावे पण काहि राजा-
गृहिं आदाय होईल ऐसि विज्ञापना केलि ते प्रमाण जाणुन
भाणस्तरि व पारगावि व मांदुस कुडैचि येथिल आंगभाडें सोडी
लें. पुढें या प्रमाणें सकळांहि चालवावें सहसा धर्मकृत्यास नाश क
रूं नये करतिल त्यांसि महापातक आहे ॥ श्लोक ॥ श्वकृत वा परे
णापी धर्मकृत्यं कृतं नर: ॥ यो नश्यती पापात्मा स यती
नरकान् बहून् ॥ १ ॥ लोभान्मत्सरतो वापि धर्मकार्यस्य
दुस्यक: ॥ यो नर: स महापापी विष्ठायां जायते कृमि ॥ २ ॥
दानपाळनयोर्मध्ये दानात् स्त्रेयोनुपाळनं ॥ दानात् स्वर्गमवा
प्नोति पाळणादच्युतं पदं ॥ या धर्मकार्या समस्तिं मान देवावे
पुर्वीच्या काळी पत्रातून कुणी लेखी अर्ज केला असेल तर उत्तरपत्राच्या सुरवातीला अर्ज काय केलाय ते लिहिलेले असते आणि नंतर त्यावर काय निर्णय झाला ते दिलेले असते. बहुतेक निवाडापत्रांत, इनामपत्रांत असाच शिष्टाचार पाळलेला दिसून येतो. सार्वजनिक हिताची पत्रं बरेचदा ठिकाणी शिलालेखात कोरलेली आढळून येतात. असाच इसवीसन १६८८ सालचा संभाजीराजांचा एक शिलालेख सध्याच्या गोवा राज्यातल्या हडकोळण येथे सापडलेला आहे. हा 'हडकोळण शिलालेख' गोवा राज्य संग्रहालय पणजी येथे ठेवला आहे, जो आजही पहायला मिळतो.
🚩 संभाजीराजांचा हडकोळण शिलालेखाचा अर्थ
श्री गणेशाय नम. श्री लक्ष्मी प्रसन्न. शालिवाहन शक १६१० विभवनाम संवत्सर गुरुवार चैत्र शुद्ध प्रतिपदा. गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश. व्यापार करताना बोटीने नदी ओलांडल्यावर पूर्वी मुसलमानी राजवटीत 'अंगभाडे' नावाचा कर घेतला जात नव्हता. आता हे हिंदूराज्य झाल्यापासून अश्याप्रकारचा कर घेतला जातोय. असे केल्याने मालाची ने-आण कमी झालेली आहे. त्यामुळे हा कर घेऊ नये असा अर्ज सामनायक नावाच्या व्यापार्याने क्षत्रियकुळावतंस छत्रपती शंभु महाराज यांचे मामले प्रांत फोंडा येथील मुख्यदेशाधिकारी धर्माजी नागनाथ यांना केला आहे.
याला अनुसरून आता हा कर घेतला जाणार नाही. अशाच प्रकारचे कर आता भाणस्तरि, पारगाव, मांदुस येथेही घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारचे कर माफ केल्यामुळे लोकांना दिलासा मिळतो आणि व्यापारवृद्धी होते. हा लेख देवनागरी, संस्कृत आणि मराठी भाषेत हा लेख कोरलेला आहे आणि जो जो धर्मकृत्याचा नाश करेल त्याला पाप लागेल. तसेच धर्मकृत्याचा नाश करणारा नरकात जाईल, विष्ठेमधील कृमि होईल. या धर्मकृत्याचा मान ठेवावा अशी शेवटची शापवाणी मात्र संस्कृतमधे लिहिलेली आहे.
लेख चौथा...
🚩 'शंभूराजांनी रामसिंहाला लिहिलेले पत्र'
संभाजीराजांनी इसवीसन १६८२ च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मिर्झाराजे जयसिंहाचा मुलगा रामसिंहाला पत्र लिहून दिल्लीची बादशाही फोडून यवनाधिपाला कारावासात घालण्याचा महामनसुबा रचला. त्यांनी 'दिल्लींद्रपदलिप्सवः' अशा वडिलांच्या प्रतिज्ञेची परिपूर्ती करण्याचा मनसुबा केलेला दिसतो.
अंबरचा राजा रामसिंह हा आग्र्याच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा रक्षक होता. औरंगजेबास जामीन राहून त्याने शिवाजीराजांचे आणि संभाजीराजांचे संरक्षण केले होते. दुंदुभीनाम संवत्सरात संभाजीराजांच्या पराक्रमाची दुंदुभी अवघ्या महाराष्ट्रात वाजत होती. साहस, शौर्य, कर्तुत्वावरील दृढ विश्वास आणि मनाची उत्तुंग झेप इत्यादी गुणांचा प्रत्यय रामसिंहाला पाठवलेल्या पत्रातून आल्यावाचून राहत नाही.
॥ श्री ॥
राम राम
राजमान्य महाराज रामसिंहवर्मा
श्रीविष्णुपादसेवापरायण अंतःकरण-प्रवृत्तीमुळे लाभलेले वैभव आणि भक्ती यांमुळे प्राप्त झालेल्या तेजोविशेषाने अलंकृत वर्णाश्रमधर्मावर घाला घालणार्या दुष्टप्रवृत्तीरूप सर्पांचा संहार करणार्या करारी गरूडाशी साम्य असणारे धीरोदत्त वीर ज्याने केलेल्या आक्रमणाचा प्रतिकार करणे कठीण, शत्रूचे पारिपत्य करणारे, भुमितलावर नि:संकोचपणे संचार करणार्या हत्तींचे गंडस्थळ फोडणारे, धारदार तलवारीप्रमाणे किंवा वाघनखासारखे संहारक, प्रचंड गर्जना करणार्या सिंहासारखे, विलक्षण सौजन्य आणि औदार्यामुळे ज्यांनी प्रतिष्ठित सज्जनांना आपलेसे केलेले आहे, मान्यताप्राप्त सज्जनांमध्ये श्रेष्ठ, स्वसंपादित अनेक गुणरत्नांची खाण असलेले महाशय यांसी-
'आपले स्नेहांकित श्रीशंभुराजे यांच्या सांगण्यावरून येथील कुशल निवेदन करणारे हे पत्र आपणाकडे पाठवण्यात येत आहे. आपल्या कुशलाचीही ते प्रतीक्षा करीत आहेत. आपण आपल्या मनातील भाव पत्राने कळविला की दिल्लीच्या बादशहाशी विरोध करू नये, त्यांचा मान राखावा, परिणामी कुमार कृष्णसिंहाची बादशहाच्या सांगण्यावरून कशी अवस्था झाली ती जाणून काही राजकार्याचा हेतू मनी धरून आमच्याकडे आदरपुर्वक पत्र पाठविले की, सुलतान अकबराला आपल्या संनिध सांभाळले हे उचितच केले. आपले म्हणणे आम्हालाही मान्य आहे. आपण हिंदू दुबळे, सत्वहीन झालो आहोत, आपल्या देवालयांची मोडतोड झाली तरी स्वधर्मरक्षण करण्यास असमर्थ आहोत, धर्माचरणशून्य आहोत अशी त्या यवन बादशहाची समजूत झाली आहे. त्याची भरभराट होत आहे. क्षत्रिय या पदवीला न शोभणारे वर्तन आपल्या हातून होत आहे अशी आपली भावना आहे. श्रुतिस्मृति-प्रतिपादित वर्णाश्रम धर्म आणि प्रजापालनाचा राजधर्म यांना पोहोचणारी हानी आपणांला सहन होत नाही. दुष्ट यवन बादशहाच्या विरोधासाठीच यवन बादशहाने सेनापती मारले. काहींना तुरूंगात टाकले. काहींच्याकडून खंडणी घेऊन त्यांना सोडून दिले. काहींना सामोपचाराने सोडले. काही आपणच सैनिकांना लाच देऊन पळून गेले. अशा प्रकारे त्याचे सैन्य दुबळे झाले. अशा वेळी त्या यवनाधिपतीला तुरूंगात डांबले पाहिजे. देवालयांची स्थापना करून सर्वत्र धर्माचे रक्षण केले पाहिजे असे मनांत आणून त्याप्रमाणे आचरण करावे असा आमचा हेतू आहे.
आपण सप्तराज्यसंपन्न आहात. धैर्य धरून आम्ही आरंभलेल्या मुसलमानांचे पारिपत्य करण्याच्या कामी आपण आम्हाला सहाय्य केले तर काय होणार नाही?अशा स्थितीत आपण आपले कर्तव्य विसरून स्वस्थ बसला आहात याचे आम्हाला आश्चर्य वाटते.
दुसरी गोष्ट अशी की, दुर्जनसिंह हाडाची मातबरी ती काय? त्याच्यापाशी पैसा किती आहे हे आपण जाणताच. आम्हालाही ठाऊक आहे. पण त्याने हे धाडस करून खजिन्याची लुट कशी केली ते आमच्या पत्रावरून कळले असेल. तसेच तो शेजाराला असल्यामुळे आपल्या कानांवर आले असेलच. त्या कामी आम्ही येथून जे करीत आहोत तेच तेथूनही करावे. आता अकबर आणि दुर्गादास यांना गुर्जर (गुजरात) देशात पाठवण्यात येत आहे. तर आपण धाडस करून जे कर्तव्य ते अवश्य करावे. पठाणाधिपती शहा अब्बासच्या नावे पत्र पाठवले की, त्याने अकबराला आश्रय द्यावा. तथापि यवनाला एवढे मोठेपण द्यावे हे अनुचित आहे. पुज्य श्री महाराजांनी (मिर्झाराजे जयसिंह) या दुष्ट यवनाला दिल्लीचा बादशहा करून लौकिक संपादिला. हे त्यांना वगळून तुम्ही आणि आम्ही मिळून अकबराला बादशहा करावे. त्यायोगे स्वधर्म-रक्षण होईल आणि महाराजा जयसिंहाप्रमाणे आपणांलाही लौकिक लाभेल.
अधिक तपशिल कवी कलशाच्या पत्रावरून तसेच जनार्दन पंडितांच्या पत्रावरून व प्रतापसिंहाचे तोंडून आणि हेरांकरवी समजेल. आपले कुशल निरंतर कळवीत असावे. सुज्ञास बहुत काय लिहणे.
🚩 छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून केशव पंडितांनी लिहिलेल्या 'राजारामचरितम्' ग्रंथात संभाजीराजांचे सार्थ वर्णन केले आहे ते असे -
महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् ।
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ॥ ५ ॥
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा' ।
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ॥ ६ ॥
अर्थ - सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.
🚩 संदर्भ -
१) ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे
२) महाराष्ट्रदेशा - श्री. पंकज समेळ
🚩 फोटो स्त्रोत -
१) कौस्तुभ कस्तुरे यांच्या ब्लॉगमधून साभार
२) 'महाराष्ट्रदेशा' या श्री. पंकज समेळ यांच्या ब्लॉगमधून साभार
संभाजी महाराजांच्या या राजकारणाला जर यश आलं असतं तर आज भारताचा इतिहास काही वेगळाच असता. पण इतिहासाला काही ही जरतरची भाषा समजतच नाही. मागे घडून गेलेला इतिहास बदलणं आपल्या कुणाच्याच हातात नाही, पण भूतकाळात झालेल्या चुकांमधून काही शिकून भविष्यात त्या चुका टाळणं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. नाही का?
बहुत काय लिहिणें. आपण सुज्ञ असा.
या सहा भागांच्या लेखमालेचा पुढील भाग या धाग्यावरून वाचता येईल...
समाप्त.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा