शनिवार, २ मे, २०२०

भाग दुसरा "कालगणना"

"कालगणना"


भाग दुसरा


हिंदू कालगणनेचा पहिला भाग वाचायचा राहून गेला असेल तर तुम्ही इथून तो वाचू शकता.

ब) मुसलमानी कालगणना


       हिंदूस्थानावर अखंडीतपणे स्वाऱ्या करून अखेरीस राज्य स्थापलेल्या मुसलमानांची बोली भाषा फार्सी होती आणि या मुसलमानी राजवटी पुढे बरीच शतके हिंदुस्थानात नांदल्यामुळे साहजिकच इथल्या लोकांच्या बोलीभाषेवर मुसलमानी बोलीभाषेचा म्हणजेच फार्सीचा परिणाम झाला. बहुतेक सर्व मुसलमानी राजवटींचे दफ्तर फार्सीतच ठेवले जाई. इतकेच नाही तर फार्सी ही राजभाषा झाल्याने तिचा एकूणच व्यवहारात इतका उपयोग केला जाई की मराठी पत्रांत सुध्दा फार्सी शब्दांचा अर्ध्याहुन अधिक वापर केला जात असे. एवढंच काय आपण आज जे मराठी बोलतो त्यातही फार्सीवरूनच आलेले निम्मे शब्द बेमालूमपणे मिसळून गेले आहेत. मुसलमानी राजवटींच्या दैनंदिन कामकाजात नुसता भाषेचाच नाही तर मुसलमानी कालगणनेचा वापरही मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आज आपल्याला त्या काळातील कागदपत्रांचे किंवा तत्कालीन पत्रांचे वाचन आणि त्यांची सत्यता पडताळण्यासाठी कालगणना समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. या भागात आपण मुसलमानी कालगणनेबद्दल जाणून घेणार आहोत. तर अशा या मुसलमानी कालगणनेचे पुढील पाच प्रकार आपल्याला पहायला मिळतात.

१) हिजरी सन
२) फसली सन
३) शुहूर/ सुहूर सन
४) तेरीख-इ-इलाही
५) जुलूस

ब - १) हिजरी सन -


       इसवीसन २० जुलै ६२२ मधे मुस्लिम धर्मसंस्थापक मुहम्मद पैगंबर हा मक्केहून मदिनेला गेला तेव्हापासून या सनाची सुरूवात केली गेली. हिजरी कालगणना ही चांद्रमानावर आधारीत असल्याने हिजरी सन इसवीसनाच्या तुलनेत दरवर्षी १०-१२ दिवस पुढे सरकत जाते. हिजरी सनात अंदाजे ३२ ते ३३ वर्षांनी सौरमानाप्रमाणे चांद्रमानाच्या वर्षात संपूर्ण एक वर्षाचा फरक पडतो त्यामुळे हिजरी सनावरून इसवीसन नेमके गणित करूनच काढावे लागते.
       दक्षिणेत हिजरी सन देण्याचा प्रथम प्रघात होता पण सतराव्या शतकाच्या प्रारंभापूर्वीच सुहूर सन देण्याची पध्दत पडून गेली होती.

ब - २) फसली सन -


       फसली सन ही कालगणना सम्राट अकबराने सुरू केली. फसली सन हे सुर्यमानावर अवलंबून आहे. 'फसल' म्हणजे पिक तयार होण्याचा काळ. ही कालगणना सुर्याच्या मृग नक्षत्रातील प्रवेशाबरोबर सुरू होते. एखाद्या इसवीसनाचे फसली सन काढायचे असेल तर त्या इसवीसनातून ५९० वर्षे वजा करावीत, त्यानंतर मिळालेल्या वर्षाच्या २४ तारखेला ते फसली सन सुरू झालेले असते. फसली सन हे सौरमानानुसार असले तरीही त्यातील महिन्यांची गणना मात्र हिजरी सनाप्रमाणेच करतात. उत्तर हिंदुस्थानात मुख्यतः फसली सनच चालू होता. ऐतिहासिक कागदपत्रांत या सनाच्या जोडीला जुलूस सनही देण्यात येत असे.

ब - ३) शुहूर/ सुहूर सन -


       ही कालगणनाही फसली सनाप्रमाणेच सुर्यमानावर अवलंबून असल्याने ही कालगणना देखील मृग नक्षत्रापासून सुरू होते म्हणून याला मृगसाल असेही म्हणतात. तसेच या सनातील महिनेही फसली सनाप्रमाणे चांद्रमानानुसारच आहेत. सुहूर सनाच्या संख्येत ६०० मिळवल्यावर जी संख्या येते त्या संख्येच्या इसवीसनातील २३ मेला ते सुहूर सन संपलेले असते आणि त्याच्या आधीच्या इसवीसनातील २४ मेला सुरू झालेले असते. इंग्रजी किंवा मराठी कालगणना ज्याप्रमाणे आकड्यातून मांडण्याची पद्धत आहे तशी पध्दत ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख आलेल्या सुहूर सनाचा बाबतीत नाही. तर तो सन शब्दात लिहितात. उदाहरण सांगायचं तर 'शुहूर सन सल्लास सब्बैन व अलफ' असं सांगता येईल. हा शुहूर सन, सल्लास म्हणजे ०३, सब्बैन म्हणजे ७० व अलफ म्हणजे १००० आहे. म्हणजे शुहूर सन १०७३, म्हणजे शके १५९४ आणि इ.स. १६७२. एकक अंक पहिला घेऊन मग दशक, शतक आणि सर्वात शेवटी सहस्त्राचा शब्द लिहिलेला असतो. सुहूर सनाचे संख्यावाचक शब्द पुढीलप्रमाणे आहेत.

१ - इहीदे, १० - अशर, १०० - मया
२ - इसन्ने, २० - अशरीन, २०० - मयातैन
३ - सलास, ३० - सलासीन, ३०० - सलासमया
४ - आर्बा, ४० - अर्बैन, ४०० - आर्बामया
५ - खमस, ५० - खमसैन, ५०० - खमसमया
६ - सित, ६० - सितैन, ६०० - सीतमया
७ - सब्बा, ७० - सबैन, ७०० - सब्बामया
८ - समान, ८० - समानीन, ८०० - समानमया
९ - तीसा, ९० - तीसैन, ९०० तीसामया, १००० - अलफ

हे सुहूर सन १०३७ चा उल्लेख असलेले शहाजी राजांनी चिंचवडच्या मोरया गोसावींना दिलेले एक खुर्दखत आहे. खुर्दखतचा शब्दशः अर्थ होतो छोटे पत्र. आदिलशाही, निजामशाही आणि मराठेशाहीत इनामांच्या नुतनीकरणाच्या छोट्या पत्रांना खुर्दखत म्हणतात.

ब - ४) तेरीख-इ-इलाही -


       सम्राट अकबराने आपल्या राज्यप्राप्तीच्या २९ व्या वर्षी म्हणजेच इ.स. १५८४ मधे तेरीख-इ-इलाही ही कालगणना सुरू केली. अकबराच्या राज्यस्थापनेच्या काळापासून ही कालगणना मानली जाते. अकबराने त्याच्या जन्मापासून म्हणजेच इसवीसन १५५६ पासून इलाही सनाची सुरूवात केली. इलाही वर्षाचे इसवीसन काढण्यासाठी इलाही सनात १५५६ मिळवले की इसवीसन समजते. इलाही कालगणना ही सौरमानावर आधारीत असल्याने अकबराने बाराही महिन्यांची पुढील बारा नावे रूढ केली.

तेरीख-इ-इलाही सनाचे महिने (कंसात महिन्याचे दिवस) -

१) फर्वर्दिन (३१)
२) उर्दी बिहिश्त (३१)
३) खुर्दाद (३२)
४) तीर (३१)
५) अमुर्दाद (३१)
६) शहरीर (३१)
७) मिहर (३०)
८) आबान (३०)
९) आजर (२९)
१०) दै (२९)
११) बहेमन (३०)
१२) इस्फन्दार (३१)

ब - ५) जुलुस -


       'बैठक' या मराठी शब्दाला अरबी भाषेत जुलूस म्हणतात. जो मोंगल बादशाहा गादीवर बसेल तो गादीवर बसलेल्या दिवसापासून ही कालगणना सुरू करत असे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत चार बादशाहाच गादीवर बसले म्हणून चारच जुलूस माहिती आहेत. थोडक्यात शिवाजी महाराजांनी जसा राज्याभिषेक शक सुरू केला तसाच हा जुलूस. पुढे दिलेल्या पहिल्या तारखा राज्यारोहणाच्या आहेत तर नंतरच्या तारखा ज्या तारखेला फर्मान जारी केले गेले त्या तारखेच्या आहेत.

१) अकबर - राज्यारोहण १५५६, फर्मान जारी ११ मार्च १५५६.
२) जहांगीर - राज्यारोहण २४ ऑक्टोबर १६०५, फर्मान जारी
     ११ मार्च १६०६.
३) शाहजहान - राज्यारोहण ०४ फेब्रुवारी १६२८, फर्मान जारी
     २८ जानेवारी १६२८.
४) औंरगजेब - राज्यारोहण ०६ सप्टेंबर १६५७, फर्मान जारी
     २४ मे १६५८ आणि दुसर्‍यांदा ०५ जून १६५९.


हे पुरंदरच्या तहाच्या वेळचे औरंगजेबाने महाराजांना लिहिलेले पत्र आहे. या औरंगजेबाच्या पत्राच्या शेवटी '८ जुलूस' सन दिलेला आहे की जो १०७६ हिजरी सनाशी जुळणारा आहे.

# तेरीख-इ-इलाही ही कालगणना सोडून इतर कालगणनेचे मुसलमानी महिने (कंसात महिन्याचे दिवस) -

१) मोहरम (३०)
२) सफर (२९)
३) रविअ-उल-अव्वल ऊर्फ रबिलावल (३०)
४) रविअ-उल-आखर ऊर्फ रबिलाखर (२९)
५) जमादा-उल-अव्वल ऊर्फ जमादिलावल (३०)
६) जमादा-उल-आखर ऊर्फ जमादिलाखर (२९)
७) रज्जब (३०)
८) साबान ऊर्फ शाबान (२९)
९) रमजान (३०)
१०) सव्वाल किंवा शव्वाल (२९)
११) जि-अल-कादा ऊर्फ जिल्काद (३०)
१२) जि-अल-हिज्जा ऊर्फ जिल्हेज (३०)

# जुने फार्सी महिने (कंसात महिन्याचे दिवस) -

१) फरवरी (३१)
२) आर्दिबेहस्त (३१)
३) खुर्दाद (३१)
४) तीर (३१)
५) अमरदाद (३१)
६) शहरिअर (३१)
७) मेहेर (३०)
८) आबान (३०)
९) आजुर (३०)
१०) दय (२९)
११) बहमन (३०)
१२) इस्किंदार (३०)

# मुसलमानी पध्दतीप्रमाणे वारांची नावे -

१) रविवार - एकशंबा
२) सोमवार - दोशंबा
३) मंगळवार - सीशंबा
४) बुधवार - चहारशंबा
५) गुरूवार - पंजशंबा
६) शुक्रवार - जुम्मा किंवा आदिना
७) शनिवार - शंबा किंवा हत्फा

# शेवटच्या लेखात मुसलमानी कालगणनेची सध्या वापरात असलेल्या इसवीसनाबरोबर असलेल्या फरकाची थोडक्यात माहिती येईलच.

क्रमशः

ख्रिस्ती कालगणनेचा पुढील भाग तुम्हांला इथे टिचकी मारून वाचता येईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा