बुधवार, २७ मे, २०२०

लेख तिसरा "हिंदू साम्राज्य दिन"

🚩 "हिंदू साम्राज्य दिन"


इन्द्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर ।
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं ॥
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर ।
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज है ॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर ।
भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं ॥
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर ।
त्यौं म्लेंच्छ बंस पर, सेर शिवराज हैं ॥


लेख तिसरा...


🚩 'सिवाजी न होते तो सुनति होत सबकी'


दुज कनौज कुल कस्यपी, रतनाकर सुत धीर ।
बसत त्रिविक्रमपुर सदा तरनि-तनूजा-तीर ॥ १॥
बीर बीरबरसे जहां उपजे कवि अरु भूप ।
देव विहारीश्वर जहां विश्वेश्वर तद्रूप ॥ २॥

       भारतात उत्तरेकडे असलेल्या कानपूर जिल्ह्यात यमुना नदीच्या काठावर त्रिविक्रमपूर नावाचे एक गाव आहे. या त्रिविक्रमपूरात रत्नाकर त्रिपाठी (तिवारी )(१) नावाचे कश्यप गोत्री ब्राह्मण रहात असत. हे रत्नाकर त्रिपाठी एक उत्तम कवी होते. त्यांना चिंतामणी, भूषण, मतिरा आणि नीलकंठ अशी चार मुलं होती. ही चारही मुलं सुद्धा उत्तम कवी होती. या चौघांपैकी कविभूषण हे त्यातल्यात्यात अजूनच नावाजलेले कवी. या भूषण कवींनी स्वतःविषयीची माहिती शिवराजभूषण या ग्रंथात दिलेली आहे.

       दक्षिणेतले दुर्गम किल्ले जिंकल्यामुळं शिवाजी महाराजांची किर्ती देशभर पसरलेली होती. इ.स. १६६७ साली कविभूषण महाराजांची किर्ती ऐकुन त्यांना भेटण्यासाठी आले. कविभूषणांनी आपल्या काव्य नायकाचं यथोचित वर्णन 'शिवराजभूषण' या ग्रंथात केलं आहे. या संपूर्ण ग्रंथात एकूण ४४२ छंद आहेत. शिवाजीराजांच्या पराक्रमांचे वर्णन कविभूषणांनी समकालीन असल्यामुळं प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणं लिहिलं आहे. राज्याभिषेकाच्या वेळी ते उत्तरेतून रायगडावर आले. राज्याभिषेकाच्या प्रसंगी त्यांनी दरबारांत निवडक ५२ छंद म्हणून दाखवले. त्या ५२ छंदांना 'शिवाबावनी' म्हणून ओळखलं जातं. शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर मुसलमानी आक्रमकांनी हिंदूंची आणि हिंदू धर्माची अतिशय दैना केली असती. देवता व देवालये यांचा मुसलमानांनी केलेला विध्वंस, जबरदस्तीने इस्लामी धर्माचा प्रसार करण्याची त्यांची महत्वाकांक्षा याचं वर्णन कविभूषणांनी योग्य पद्धतीनं शिवाबावनीत केलं आहे. शिवाजीराजांचा 'अवतार' झाल्यामुळं हिंदू धर्म कसा बचावला याचं यतार्थ वर्णन त्यांनी शिवाबावनीत केलं आहे.

देवल गिरावते फिरवते निसान अली ऐसे डूबे राव राने सबी गये लबकी ।
गौरा गनपति आप औरनकों देत ताप आपनी ही बार सब मारि गये दबकी ।
पीरा पयगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्धकी सिद्धाई गई रही बात रबकी ।
कासी हुकी कला जाती मथुरा मस्जित होती, सिवाजी न होते तो सुनति होत सबकी ॥ १९॥

       मुसलमानांकडून देवळे पाडली जात आहेत. मंदिरे उध्वस्त केली जात आहेत आणि त्यावर अलीचे झेंडे प्रस्थापित केले जात आहेत. अशा वेळी सर्व रावराणे निर्बल व पराभूत झाले आहेत. गौरी, गणपतीसारख्या देवता भक्तांनी आपली उपासना केली नाही म्हणून त्यांना त्रास देतांत पण त्यांच्यावर वेळ येताच त्यासुद्धा लपून बसल्या आहेत. हिंदू जनतेला तर अवलीया पर-पैगंबरामध्येच दिगंबर दत्त दिसू लागले होते. साधू व सिद्धांच्या रिद्धी-सिद्धी गेल्या फक्त रबचीच चर्चा सुरू झाली, अशावेळी जर शिवाजी राजांचा अवतार झाला नसता तर काशीची कळा गेली असती, मथूरेत मस्जिदी झाल्या असत्या आणि आपल्या सर्वांची तर सुंताच झाली असती.

साँच को न मानै देवी देवता न जानै अरू ऐसी उर आनै मै कहत बात जबकी ।
और पातसाहन के हूती चाह हिन्दून की, अक्कबर साहजहाँ कहै साखि तब की ।
बब्बर के तब्बर हुमायुँ हद्द बाँधि गये दोनो एक करी न कुरान बेद ढब की ।
कासी हुकी कला जाती मथुरा मस्जित होती, सिवाजी न होते तो सुनति होत सबकी ॥ २०॥

       कविभूषण म्हणतात लक्षपूर्वक ऐका, ज्यावेळी अन्य मुसलमानी बादशाह राज्य करीत होते त्यावेळी त्यांना हिंदूंविषयी थोडीशी सहानभूती तर होती याची साक्ष अकबर व शहाजहान होते. बाबरचा मुलगा हूमायून यानेदेखील हिंदूंची धर्म मर्यादा सांभाळली. कुराण आणि वेद यांची भिन्न असलेली तत्वे एक केली नाहीत. हा औरंगजेब पहा त्याला सत्याची चाड राहिली नाही. अशावेळी जर शिवाजी राजांचा अवतार झाला नसता तर काशीची कळा गेली असती, मथूरेत मस्जिदी झाल्या असत्या आणि आपल्या सर्वांची तर सुंताच झाली असती.

कुंभकन्न असुर औतारी अवरंगजेब किन्ही कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की ।
खोदी डारे देवी देव सहर महल्ला बाँके, लाखन तुरूक किन्हे छूटि गई तब की ।
भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ, और कौन गिनती में भूली गति भब की ।
चारों वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि, सिवाजी न होते तो सुनति होत सबकी ॥ २१॥

       कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब त्याने मथूरेत अनेक हिंदूंची कत्तल करून सर्व शहारांत इस्लामी रबची द्वाही फिरवली. शहरांतील गल्लोगलींतून असलेल्या उत्तम उत्तम देव, देवता, देवालये खणून काढली. लाखों हिंदूंना मुसलमान केले. इतकेच काय प्रत्यक्ष काशीपती विश्वनाथ भयभीत होऊन पळाले, महादेवाचींच जर इतकी त्रेधा उडाली की इतरांची काय कथा? अशावेळी जर शिवाजी राजांचा अवतार झाला नसता तर हिंदूंच्या चारही वर्णांना आपापली धर्मकर्तव्य सोडून नमाज पढावे लागले असते व आपल्या सर्वांची तर सुंताच झाली असती.

🚩 संदर्भ -

१) कान्यकुब्ज ब्राह्मणातील त्रिपाठी कुलशब्दाचा 'तिवारी' अपभ्रंश आहे.
२) शिवाबावनी - कविभूषण

       आपण सर्व हिंदूंनी मिळून हिंदू साम्राज्य दिन का साजरा करायला हवा याचं कारण या शिवाबावनीतून बऱ्यापैकी समजतं. एकूणच या ऐतिहासिक साधनांविषयी जर सांगायचं झालं तर दर्जानुसार प्रथम सनदा, पत्रे, महजर, करीने, शकावल्या, बखरी, पोवाडे आणि सरतेशेवटी काव्ये असा क्रमांक लागतो. इथे स्तुतिपर 'काव्य' हे जरी दुय्यम दर्जाचं असलं तरीसुद्धा कविभूषण हे महाराजांच्या समकालीन होते, एवढंच नाही तर ते राज्याभिषेकाच्या वेळी स्वतः उपस्थित होते त्यामुळं त्याच्या काव्यावर एक 'विशेष' म्हणून विश्वास ठेवावाच लागेल. त्यामुळे खरंच 'सिवाजी न होते तो सुनति होत सबकी' हे मान्य करावंच लागेल.
बहुत काय लिहिणे. आपण सुज्ञ असा.

या सहा भागांच्या लेखमालेचा पुढील भाग या धाग्यावरून वाचता येईल...

समाप्त.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा