बुधवार, २७ मे, २०२०

लेख सहावा "हिंदू साम्राज्य दिन"

🚩 "हिंदू साम्राज्य दिन"


उत्सादितां चिरतरं यवनै: प्रतिष्ठाम् ।
शोणाचलेशितुरयं विधिवद्विधाय ॥
श्रीमुष्णवृद्धगिरिरूक्मसभाधिपानां ।
पूजोत्सवान् प्रथयातिस्म सहात्मकीर्त्या ॥ ८० ॥

कृते म्लेच्छोच्छेदे भूवि निरविशेषं रविकुला ।
वतंसेनात्यर्थे यवनवचनैर्लुप्तसरणिम् ॥
नृपाव्याहारार्थे स तु विबुधभाषां वितनितुं ।
नियुक्तोsभूत् विद्वान्नृपवरशिवच्छत्रपतिना ॥ ८१ ॥

सोsयं शिवच्छ्त्रपतेरनुज्ञां ।
मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि ॥
अमात्यवर्यो रघुनाथनामा ।
करोति राजव्यवहारकोशम् ॥ ८२ ॥

उद्देशाय गृहीताsत्र म्लेच्छभाषा न दुष्यति ।
नापेक्षते किं रत्नानि खचितुं जतु जातुचित् ॥ ८३ ॥

विपश्चित्संमतस्यास्य किं स्यादशविडंबनै: ।
रोचते किं क्रमेलाय मधुरं कदलीफलम् ॥ ८४ ॥


       हे श्लोक रघुनाथ नारायण हणमंतेंनी लिहिलेल्या 'राजव्यवहारकोश' या ग्रंथाच्या प्रास्ताविकातील आहेत. कर्नाटकातल्या तिरूवेन्नामलाई येथे जे 'शोणाचलपती'चे पुरातन मंदीर होते ते पाडून म्लेंच्छांनी त्या जागेवर मस्जिद बांधली होती. शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून अमात्यांनी मंदीराच्या जागेवर असलेली मस्जिद तोडून त्याच जागेवर पुन्हा शोणाचलपतीचे मंदीर बांधले. शोणाचलपती हे जसे शंकराचे मंदीर आहे तसेच तिथे असलेल्या विष्णुच्या म्हणजे पेरामलच्या मंदीराच्या जागेवर असलेली मस्जिद पाडून त्या जागेवर सुध्दा महाराजांच्या आज्ञेवरून पुन्हा मंदीर बांधण्यात आलं. म्लेंच्छांच्या भितीने आजूबाजूच्या मंदीरांच्या ज्या पुजाअर्चा थांबल्या होत्या त्याही परत सुरू करण्यात आल्या. खरंतर अशी अजूनही काही उदाहरणं देता येतील पण त्यातला नार्वेचा सप्तकोटेश्वर आणि श्रीशैल्यचा मल्लिकार्जुन ही बर्‍याच जणांना माहिती असलेली उदाहरणं आहेत. महाराजांनी मस्जिदींना इनाम दिल्याचं एकही उदाहरण, अगदी वानवीदाखल सुद्धा सांगता येणार नाही पण मंदीरे, मठ, संत, शास्त्रार्थ करणारी मंडळी यांना इनामं दिल्याची शेकडो इनामपत्र, खुर्दखतं आज पहायला मिळतात. चिंचवडचे मोरया गोसावी, पाटगावचे मौनीबाबा, प्रतापगडची भवानी, पुण्यातला कसबा गणपती यांना इनाम दिल्याचे अस्सल दस्तऐवज आज उपलब्ध आहेत. नुसतं मंदीरांचच नाही तर नेतोजी पालकर आणि बजाजी निंबाळकर यांना सुद्धा त्यांनी शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतल्याचं आपल्याला पहायला मिळतं.
       मुसलमानी राजवट जवळजवळ पाचशे-सहाशे वर्षे राज्य करत असल्यामुळे साहजिकच फार्सी भाषेचा पगडा इथल्या बोली भाषेवर झालेला होता. त्याकाळात रोजच्या वापरात फार्सी शब्द आणि मुसलमानी कालगणना सर्वत्र प्रचलित होती. परकीय भाषेचा, कालगणनेचा वापर आपल्या रोजच्या वापरात असणं हे देखील एक पारतंत्र्यच आहे हे महाराजांनी पुरतं ओळखलेलं होतं म्हणूनच त्यांनी कालगणनेसाठी राज्याभिषेक शक आणि भाषाशुध्दीसाठी राज्यव्यवहार कोश तयार करून मराठी भाषेवर फार्सी भाषेचा असलेला पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी जिंकून घेतलेल्या भूभागातल्या शहरांची, किल्ल्यांची नावं बदलली हा सुध्दा एक मानसिकता बदलण्यासाठीच केलेल्या कामाचा एक भाग होता.
       मुसलमानांनी मंदीरं फोडून मस्जिदी बांधल्या तर त्याच मस्जिदी तोडून महाराजांनी पुन्हा त्याच जागेवर मंदीरं बांधली, मुसलमानांनी जबरदस्तीने धर्मांतरण केलं तर महाराजांनी पुन्हा त्यांना स्वधर्मात घेतलं. राज्याभिषेकापासून कार्यालयीन व्यवहारात देवनागरी शब्दांचा आणि हिंदू कालगणनेचा वापर करण्यास सुरूवात केली. इस्लामच्या बुरख्याआडून मुसलमानांनी जे जे अत्याचार हिंदूवर केले त्यांना अगदी जशासतसं उत्तर महाराजांनी दिलं. यावरून हेच स्पष्ट होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी 'हिंदूंसाठी हिंदवी स्वराज्याची' स्थापना केली आणि हेच त्यांचं प्रयोजन होतं. मला वाटतं आता तरी यावर कुणाचं दुमत नसावं.



लेख सहावा...


स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके ४२, मन्मथनाम संवत्सरे,
मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी, गुरूवासरे, क्षत्रियकुलावतंस
श्रीराजा शंभुछत्रपती स्वामी यांणी समस्त कार्यधुरंधर
विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडित अमात्य
हुकुमतपन्हा यांसी आज्ञा केली यैशी जे

🚩 "दिगंत विख्यात कीर्ति संपादिली! तें हें राज्य!"


       ज्या राज्यावर औरंगजेबासारिखा सबळ शत्रु चालोन आला असतां हतप्रभ होऊन गेला, ते हे राज्य, औरंगजेब याणें याराज्यानिमित्त आपला संपूर्ण पराक्रम व अर्थवैभवादि सर्व शक्ती वेचिली, तथापि श्रीकृपाकटाक्षवीक्षणें सकलहि निर्फळ होऊन परिणामीं हतोद्यम, हतोत्साह होत्साता पराङ्मुख होऊन यमालयास गेला. परंतु, औरंगजेब चौपन्न पातशाहीचा धनीं, सैन्यादि देशकोशविषयीं अद्वितीय बुद्धीमान, किंबहूना, या पृथ्वीतलाचे ठायीं 'दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा' यैसी ज्याची प्रख्यात आख्या, यैसे महाशत्रुशी संग्रामप्रसक्त जाहलियावर त्याचा पराजय विनाश्रम, स्वल्प सायासें होणें परम कठीण, तदनुरुपच परस्परे समर प्रसंगातिशयामुळें संपूर्ण राज्यांतील प्रजा पीडा पावली. कित्येक देश निराश्रयित जाहले. संपूर्ण मार्गावरोध होऊन इतर देश-द्विपांतरीहून वस्तुजात येणें राहिली, तैसेच सैनिक कितेक या दृढ बुद्धीनें शरीरावस्था न पाहतां स्वामिकार्यावरिं क्षात्रधर्में शाश्वतलोकाश्रयित जाहले. कितेक हतसैन्य होत्साते कुंठीत पराक्रम होऊन शत्रुस मिळोन गेले. कितेक स्वामी शत्रुसमरव्यसनासक्त पाहून दुर्बुद्धीतिमिरांधतेनें स्वाधीन केलीं देशदुर्गें स्वतंत्रवादें आक्रमुन बैसले. राजशासन स्वल्पतेमुळें स्थळोस्थळीं प्रत्यक प्रत्यक स्तोमें होऊन परस्परे कलहास प्रवर्तले. या विषम संधीमध्यें शामलादि क्षुद्रांस अवकाश पडून बद्धमुल जाहले. अवशिष्ट देश उदवस व दुर्गे सांग्रामिक सामग्रीविरहित जाहलीं. राजमर्यादा राहून गेली.

       पाहता येकेके प्रसंग अनर्थाचेच कारण, तथापि, श्रीस या राज्याचा व स्वामीचा पूर्ण अभिमान. पुढे प्रतिपश्चंद्रन्यायें दिनप्रतिदिनीं या राज्याची अभिवृद्धी व्हावी हे श्रीइच्छा बलवत्तर. तदनुरुप या संभावितवंशी स्वामींचा जन्म जाहला आहे. तीर्थरुप थोरले कैलासवासी स्वामी यांणी हे राज्य कोणें साहसे वा कोणें प्रतापे निर्माण केलें. याच वंशी आपण निर्माण जालों असतां पैसा विस्कळीत प्रसंग हे तो गोष्ट परम अनुचित.

       या अर्थें तीर्थरूप कैलासवासी महाराज साहेब यवनाश्रयें असतां त्यापासोन पुणें आदिकरून स्वल्प स्वास्ता स्वतंत्र मागोन घेऊन पंधरा वर्षांचें वय असतां त्या दिवसापासोन तितकेच स्वल्पमाचे स्वसत्तेवर उद्योग केला,

       तैसेच 'उद्योगिनं पुरूषसिंहमुपैति लक्ष्मी:' या दृढ बुद्धीने शरीरास्था न पाहतां केवळ अमानुष पराक्रम, जे आजपर्यंत कोण्हे केले नाहींत व पुढे कोण्हाच्याने कल्पवेना यैसे स्वांगें केले. मनुष्य-परीक्षेने नूतन सेवक नवाजून योग्यतेनुसार भार वाढवून महात्कार्यापयोगी करून दाखविले. येकास येक असाध्य असतां स्वसामर्थ्ये सकळांवरी दया करून येकाचा येकापासोन उपमर्द होऊ न देतां, येकरूपतने वर्तवून त्या हातून स्वामिकार्ये घेतलीं. दक्षिणप्रांते इदलशाही, कुतुबशाही, निजामशाही ही महापराक्रमी सकलार्थे समृद्धिवंत संस्थानें, तसेच मोगल येकेके सुभा लक्ष लक्ष स्वारांचा, याविरहित, शामल, फिरंगी, इंगरेज, जवार-रामनगरकर, पालेकर, सोंधे, बिदनूर, म्हैसूरवाले, त्रिचनापल्ली आदिकरून संस्थानिक तैसेच जागां जागां पुंड पाळेगार व चंद्रराव, सुरवे, सिर्के, सावंत, भालेराव, दळवी, वरघाटे, निंबाळकर, घाटगे, माने आदिकरून देशमुख कांटक सकलहि प्राक्रमी, सजुते, सामानपुर असतां बुद्धिवैभवें व पराक्रमें कोण्हाची गणना न धरितां, कोण्हावरी चालोन जाऊन तुंबळयुद्ध करून रणास आणिलें. कोण्हावरी छापे घातिले, कोण्हास परस्परे कलह लाऊन दिल्हे, कोणास मित्रभेद केले, कोण्हास परस्परें कलह दिल्हे, कोण्हाचे मित्रभेद केले, कोण्हाचे डेरियात शिरोन मारामारी केली, कोण्हासी येकांगी करून पराभविलें, कोण्हासि स्नेह केलें, कोण्हाचे दर्शनास आपण होऊन गेले, कोण्हास आपले दर्शनास आणिले, कोण्हास परस्परे दगे करविले, जे कोण्ही इतर प्रयत्ने नाकळेत त्यांचे देशांत जबरदस्तीने स्थळें बांधोन पराक्रमे करून आकळिले. जलदुर्गाश्रयित होते त्यांस नूतन जलदुर्गच निर्माण करून पराभविलें. दुर्घटस्थळीं नौकामार्गे प्रवेशले. यैसे ज्या ज्या उपायें जो जो शत्रु आकळावा तो तो शत्रु त्या त्या उपायें पादाक्रांत करून साल्हेरी अहिवंतापासून चंदी कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य शतावधी कोट किल्ले, तैसेचि जलदुर्ग व कितेक विषम स्थळें हस्तगत केलीं. चाळीस हजार पागा व साठ-सत्तर हजार सिलेदार व दोन लक्ष पदाती, कोट्यवधी खजाना तैसेच उत्तम जवाहीर सकळ वस्तुजात संपादिलें. शहाण्णवकुळीचे मराठ्यांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविलें. धर्मोद्धार करून देव-ब्राह्मण संस्थानीं स्थापून यंजन याजनादि षट्कर्म वर्णविभागें चालविलीं. तस्करादि अन्यायी यांचे नांव राज्यांत नाहींसे केलें. देशदुर्गादि सैन्याचे बंद नवेच निर्माण करून येकरूप अव्याहत शासन चालविलें. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारिखा महाशत्रु स्वप्रतापसागरीं निमग्र केला. दिगंत विख्यात कीर्ति संपादिली! तें हें राज्य!

🚩 संदर्भ -

१) आज्ञापत्र - रामचंद्र पंडित अमात्य लिखित
२) राजव्यवहारकोश - रघुनाथ पंडीत अमात्यकृत


       शिवशाहीतील राजनितीचे निरूपण करणारा 'आज्ञापत्र' हा एक मौलिक ग्रंथ म्हणावा लागेल. राजाराम महाराजांना राजसबाईंपासून झालेला मुलगा श्री राजा शंभुछत्रपती हा कोल्हापुरच्या गादीवर आल्यानंतर (१७१४) त्यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपन्हा यांनी आज्ञापत्र १७१५-१६ च्या सुमारास लिहिले. ज्यायोगे थोरल्या महाराजांनी साम्राज्य उभं केलं त्या 'राज्याचे सार ते दुर्ग' असा आज्ञापत्रकारांचा अंतीम निष्कर्ष आहे. गडकोटासंबंधीचे विवेचन त्यांनी अत्यंत बारकाईने केलेले आहे. आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे असे सांगून 'ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र' असे मार्मिकपणे नमूद केले आहे.

🚩 उपसंहार -

       शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी नेमकं काय केलं? तर पहिल्यांदा स्वतःमधे आणि नंतर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणला. आपल्याकडे एक म्हण आहे 'शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजाऱ्याच्या घरात', थोडक्यात असा विचार खुद्द महाराजांनी केला असता तर कविभुषणच्या म्हणण्याप्रमाणे 'सुनति होत सबकी' अशी परिस्थिती आज नक्कीच झाली असती. समाजात बदल व्हावा असं जर वाटत असेल तर आज प्रत्येकाने स्वतःमधे असलेल्या 'शिवाजी' ला पहिल्यांदा जागं करण्याची गरज आहे आणि प्रत्येकाने मनावर घेतलं तर असं नक्कीच होऊ शकतं.
       या लेखांचा विषय हिंदू संस्कृतीचा असल्याने यात आर्थिक, सामाजिक, परराष्ट्रीय धोरण, संरक्षण, व्यापार, करपद्धती अशा इतर विषयांबद्दल मुद्दामच काही लिहिलेलं नाही. महाराजांनी नेमकं काय केलं याची पुढील काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील.

१) संस्कृत मुद्रा.
२) मस्जिदी तोडून त्याच जागी पुन्हा मंदिरे बांधली.
३) धर्मवृध्दीसाठी धार्मिक स्थळे, मठ, संत-महंत, शास्त्रार्थ करणाऱ्या मंडळींना इनामं दिली.
४) गावांची, किल्ल्यांची नावे बदलली.
५) राजव्यवहारकोश लिहून भाषाशुद्धी केली आणि ती व्यवहारात आणली.
६) स्वदेशी चलन सुरू केले.
७) नवीन कालगणना सुरू केली.

       थोडक्यात जनमानसावर असलेली म्लेंच्छांबद्दलची भीती कमी केली, त्यांचा हिंदूवर असलेला वर्चस्वाचा पगडा कमी केला आणि त्या सोबतच हिंदूंचं मनोधैर्यही वाढवलं.

       आत्तापर्यंत पोस्ट केलेल्या सहा लेखात आपण काही अस्सल साधनांमधून शिवरायांचं हिंदवी स्वराज्याचं प्रयोजन नेमकं काय होतं हे पाहिलं. एक हिंदू म्हणून प्रत्येकाला ते अभिमानास्पदच आहे. खाली दिलेल्या काही साधनांव्यतिरिक्त अजूनही काही साधनांमधून या विषयीचे संदर्भ नक्कीच सापडू शकतात. हे ग्रंथ समकालीन लेखकांनी लिहून ठेवलेले आहेत त्यामुळे इतिहासाची आवड असणार्‍यांना यातून बरंच काही अस्सल आणि नवीन सापडेल.

१) राधामाधवविलासचंपू आणि पर्णालपर्वतग्रहण आख्यान - जयराम पिंड्ये
२) शिवभारत - कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर
३) शिवराजभुषण - कविभुषण
४) राजव्यवहारकोश - रघुनाथ नारायण हणमंते
५) सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद
६) आज्ञापत्र - रामचंद्र पंडीत अमात्य
७) बुधभुषण - छत्रपती संभाजी महाराज
८) नामदेवशास्त्री बाकरे दानपत्र - छत्रपती संभाजी महाराज
९) English Records On Shivaji / शिवकालीन पत्र-सार-संग्रह

       ०१ जूनपासून सुरू असलेल्या या लेखमालेचा आज समारोप करतो आहे. हे लेख केवळ राजकीय चष्म्यातून न पाहता शिवछत्रपतींना, शंभूराजांना आणि स्वातंत्र्यवीरांना अपेक्षित एक 'हिंदू' म्हणून पाहिल्यास कुणालाच काही आक्षेप नसावा. त्यामुळे सिंधुनदीपासुन ते सिंधुसागरापर्यंत पसरलेल्या या भुमीत राहणार्‍या प्रत्येकाला तो हिंदू असल्याचा अभिमानच वाटेल.
       शिवराज्याभिषेक दिन हा 'हिंदू साम्राज्य दिन' म्हणूनच का साजरा करावा यासाठी लिहिलेली ही लेखमाला आपल्या सर्वांना नक्कीच आवडली असेल. या लेखमालेत दिलेले सर्व पुरावे हे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष नसून एक 'हिंदूराष्ट्र'च होतं यावर विश्वास ठेवण्यास नक्कीच पुरेसं आहे. पुढे पेशवाईतही आपल्याला या संदर्भातले अनेक पुरावे मिळतात फक्त ते जगापुढे आणून स्वराज्य 'हिंदवी'च होतं हे दाखवून देण्याची आज गरज निर्माण झाली आहे आणि त्यासाठी एका व्रताप्रमाणे झिजूनच काम करावं लागेल. आपण सर्व हिंदूंनी यासाठी कायमच प्रयत्नशील असलं पाहिजे.
बहुत काय लिहिणें, आपण सुज्ञ असा.

       'उत्तम लेख लिहिता येणं' हे साध्य खरंच, पण तो लिहिताना आणि वाचतानाही त्याचा सर्वांगीण आस्वाद घेता आला, तर तो एकूण प्रवासच सुंदर होतो आणि गेल्या सहा दिवसांत माझ्यासोबत तुमचाही तो नक्कीच झाला असेल अशी आशा करतो.
       या लेखमालेतील लेख वाचून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी वाद हे तात्त्विक असावेत नाही का?
लेखनसीमा.

       या सहा भागांच्या लेखमालेचे पहिले सर्व भाग पुढे ओळीने दिलेल्या या धाग्यांवरून वाचता येतील...






समाप्त.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा