🚩 "हिंदू साम्राज्य दिन"
प्रतिपच्चंद्र
लेखेववर्धिष्णुर्वि
श्ववंदिता॥शाहसू
नोःशिवस्यैषामुद्रा
भद्रायराजतेl
प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता॥
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्राभद्राय राजते॥
या मुद्रेचा अर्थ असा आहे...
शुद्ध पक्षातील रोज रोज वाढत जाणारी (म्हणजेच या मुद्रेची सत्ता किंवा मराठी राज्य) चंद्रकोर जशी लोकपूजित होते, त्याचप्रमाणे शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा सुध्दा लोककल्याणार्थ सर्वमान्य होईल.
शहाजीराजांची मुद्रा फार्सी आहे पण शिवाजी महाराजांची मुद्रा मात्र संस्कृतमध्ये आहे. गेल्या सहाशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर 'बदलाची' खरी सुरूवात इथूनच झाली होती. ही मुद्रा शिवाजी महाराज कधीपासून वापरू लागले हे मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १५ मध्ये वि. का. राजवाड्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानूसार महाराजांनी प्रथम त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी ती वापरली. पण त्या पत्रावर तारीख नाही. परंतु त्याबद्दलचे विवेचन दत्तो वामन पोतदारांनी 'शिवचरित्रप्रदीप' मधल्या 'श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा' या प्रकरणात केलेले आहे. त्यानंतरची सुध्दा काही दोनचार तारीख नसलेली पत्रे उपलब्ध आहेत. तारीख उपलब्ध असलेला पहिल्या अस्सल पत्राचा उल्लेख रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केल्यावर त्याचे वतन त्याच्याच गोतातल्या एका व्यक्तीला दिल्याचा आहे. पत्रावर सुरवातीला बाबाजी गुजराकडुन वतन का काढून घेतलं याचं कारण दिलेलं आहे. त्यावेळी सोनजी बजाजी गुजर हे त्याच्याच गोतातील म्हणून त्यांनी विनंती केली की बावाजीस माझ्या हाती द्यावे. ती विनंती विचारात घेऊन बावाजीला तीनशे पादशाही होन दंड ठोठावला. तो दंड भरून सोनजी याने देऊन बावाजीस हाती घेतले. बावाजीस संतान नाही आणि सोनजी हा त्याच्याच कुळातला आहे म्हणून साहेबांनी मेहेरबान होऊन रांजे गावची मोकदमी सरकारात दोनशे पादशाही होन शुल्क जमा करून सोनजी बजाजी गुजर याच्या हवाली केली आहे. त्याला कोणी अडथळा करू नये. हे मूळ पत्र भोगवट्याकरिता त्याला परत द्यावे. रांझे हे गाव पुणे परगण्यातल्या कर्यात मावळात येतं. कर्यात मावळाच्या ३६ गावांचा मोकासा शिवाजीराजांच्या नावे होता. त्यामुळं साहजिकच या गावचा निवाडा महाराजांनी केलेला आहे. हेच ते पत्र.
🔸लेख दुसरा...
🚩 'या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह. मर्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट कांही सामान्य झाली नाहीं.'
शिवराज्याभिषेकाच्या दिवशी त्या सोहळ्याला स्वत: उपस्थित असलेला कृष्णाजी अनंत सभासद या सोहळ्याचं अगदी यतार्थ वर्णन आपल्या बखरीत करतो. तो म्हणतो...
सप्त महानदि यांची उदकें व थोर थोर नदियांची उदकें व समुद्रांची उदकें, तीर्थ क्षेत्र नामांकित तेथील तीर्थोदर्के आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्ट प्रधानांनी राजियास अभिषेक करावा असा निश्चय करुन, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला.
शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठमासी शुध्द १३ स मुहूर्त पाहिला. ते दिवशीं राजियांनी मंगल स्नाने करून श्रीमहादेव व श्रीभवानी कुलस्वामी, उपाध्ये प्रभाकर भटाचे पुत्र बाळंभट कुलगुरु व भट गोसावी, वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरुष अनुष्ठित, यांची सर्वांची पूजा यथाविधि अलंकार वस्त्रें देऊन [केली.] सर्वांस नमन करून अभिषेकास सुवर्ण-चौकीवर बसले. अष्ट प्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळचीं उदकें करून सुवर्ण कलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रें, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पुज्य मंडळीस नमस्कार करून सिंहासनावर बसले. कित्येक नवरत्नादिक सुवर्ण-कमळें व नाना सुवर्ण-फुलें, वस्त्रे उदंड दिधलीं. दानपद्धतीप्रमाणे षोडश महादानें इत्यादिक दानें केली. सिंहासनास अष्ट खांब जडित केले. त्या स्थानी अष्ट प्रधानांनी उभें राहावें. पूर्वी कृतायुगीं, त्रेतायुगीं, द्वापारीं, कलयुगाचे ठायीं पुण्यश्लोक राजे सिंहासनीं बैसले, त्या पध्दतीप्रमाणें शास्त्रोक्त सर्वही साहित्य सिध्द केलें. अष्टखांबी अष्टप्रधान उभे राहिले. त्यांची नांवे बितपशील.
१) मोरोपंत त्रिंबकपंताचे पुत्र, पेशवे, मुख्यप्रधान.
२) दत्ताजी त्रिंबक वाकनीस, यांचे नाव मंत्री.
३) नारो निळकंठ व रामचंद्र निळकंठ मुजुमदार, यांचे नाव अमात्य.
४) त्रिंबकजी सोनदेव डबीर यांचे पुत्र रामचंद्रपंत, सुमंत.
५) रावजी पण्डितराव होते त्यांचे पुत्रास रायाजीराज[?]
६) अणाजीपंत सुरनीस, यांचे नाव सचिव.
७) निराजी रावजी यांस न्यायाधिशी.
८) हंबीरराव मोहिते सेनापति.
येणेंप्रमाणे संस्कृत नांवे ठेविलीं. अष्ट प्रधानांची नांवे ठेविली ते स्थळें नेमून उभे केले. आपले स्थळी उभे राहिले. बाळ प्रभु चिटनीस व नीळ प्रभु पारसनीस वरकड अष्ट प्रधानांचे मुतालिक व हुजरे, प्रतिष्ठित सर्वही यथाकमें पध्दतीप्रमाणें सर्वही उभे राहिले. छत्र जडावाचें मोतीलग झालरीचे करून मस्तकावर धरिलें. छत्रपति असे नांव चालविलें. कागदी पत्रीं स्वस्तिश्री [राज्याभिषेक] शक, सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत चालविला. पन्नास सहस्त्र ब्राह्मण वैदिक मिळाले. या वेगळे तपोनिधि व सत्पुरूष, संन्यासी, अतिथि, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम नानाजाती मिळाले. तितक्यांस चार मास मिष्टान्न उलफे चालविले. निरोप देतां पात्र पाहून द्रव्य, अलंकार, भूषणें, वस्त्रें अमर्याद दिधलीं. गागाभट मुख्य अध्वर्यु त्यांस अपरमित द्रव्य दिलें. संपूर्ण खर्चाची संख्या एक क्रोड बेताळीस लक्ष होन झाले. अष्ट प्रधानांस लक्ष लक्ष होन बक्षीस दर असामीस, त्या खेरीज एक एक हत्ती, घोडा, वस्त्रें, अलंकार असें देणें दिलें. येणेंप्रमाणें राजे सिंहासनारूढ झाले. या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह. मर्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट कांही सामान्य झाली नाहीं.
🚩 संदर्भ -
🔸 सभासद बखर - कृष्णाजी अनंत विरचित (मुळ प्रतापगड प्रत)
🔸 शिवचरित्रप्रदीप - दत्तो वामन पोतदार
🚩 फोटो स्त्रोत -
🔸 श्री. कौस्तुभ कस्तुरे यांच्या ब्लॉगवरून साभार
शिवछत्रपतींचे हे चरित्र कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेले आहे ज्यालाच आपण सभासद बखर म्हणून ओळखतो. हे थोरले राजाराम महाराज यांच्या पदरी सभासद होते. थोरले महाराज म्हणजेच शिवाजीराजे यांचे आत्मचरित्र पहिल्यापासून लिहावे अशी राजाराम महाराजांनी आज्ञा केल्यावरून हे चरित्र तंजावर येथे कृष्णाजी अनंत यांनी लिहिले. हे चरित्र ज्यावेळी लिहिले गेले तो राजाराम महाराजांच्या वेळचा काळ अतिशय धामधुमीचा होता. साहजिकच हे शिवछत्रपतींचे चरित्र सभासदाला म्हणावे तसे खुलासेवार लिहिता आलेले नाही. शिवाजी महाराजांच्या पश्चात बारा-चौदा वर्षानंतरच हे चरित्र लिहिले गेल्यामुळे हे विशेष विश्वसनिय असे म्हणण्यास हरकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांकडून स्वराज्य स्थापनेसाठी काय मिळालं आणि त्यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात मागे काय ठेवलं? असं जर कुणी विचारलं तर कुणीही चटकन उत्तर देईल, 'त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि त्यांनी तयार केलेली माणसं'. पण अत्यंत विपरीत परिस्थितीत सुध्दा स्वराज्य आणि माणसांव्यतिरिक्त त्यांनी मागे ठेवलेली संपत्तीची मोजदाद पाहिल्यावर त्यांचं आर्थिक कसोटीवर कर्तुत्व अधिक स्पष्ट होतं. सद्य परिस्थितीत साधा एक फ्लॅट विकत घेण्यात पूर्ण आयुष्य निघून जातं तिथे महाराजांची कमावलेली संपत्ती पाहिल्यावर डोळे विस्फारले जातात. सभासदाने या सर्वाची नोंद सभासद बखरीत 'स्वराज्याची मोजदाद' या प्रकरणात करून ठेवलेली आहे. याबद्दल मी तीन लेख लिहिले होते. या विषयाबद्दल स्वारस्य असलेली मंडळी हे लेख इथे टिचकी मारून वाचू शकतात.
लेखनसीमा.
या सहा भागांच्या लेखमालेचा पुढील भाग या धाग्यावरून वाचता येईल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा